चित्रपटांनंतर अश्विनीचं ‘उसासून आलंय मन’!

'उसासून आलंय मन' या अल्बमच्या निमित्तानं 'नवराष्ट्र'शी बातचित करताना अश्विनीनं आपल्या आजवरच्या प्रवासाबाबतही सांगितलं.

  चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर पिकल म्युझिकच्या ‘उसासून आलंय मन’द्वारे अश्विनी बागलनं अल्बम क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. कौटुंबिक समस्यांवर मात करत अश्विनीनं अखेर पुन्हा एकदा स्वत:चं करियर सुरू केलं आहे. ‘उसासून आलंय मन’ या अल्बमच्या निमित्तानं ‘नवराष्ट्र’शी बातचित करताना अश्विनीनं आपल्या आजवरच्या प्रवासाबाबतही सांगितलं.

  अश्विनीची भूमिका असलेले ‘भिरकीट’ आणि ‘का रे देवा’ हे दोन चित्रपट तयार आहेत. लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता ती ‘उसासून आलंय मन’ या गाण्याद्वारे अल्बमद्वारे रसिकांच्या भेटीला आली आहे. अभिनयातील आजवरच्या प्रवासाबाबत अश्विनी म्हणाली की, अगोदर मी मॅाडेलिंग करत होते. वडीलांचं छत्र हरवल्यानंतर मी अभिनयात करियर करावं अशी माझ्या मम्मीची इच्छा होती. अचानक मम्मीही आजारी पडली आणि तिला कॅन्सर असल्याचं निदान झालं. तो मोनालिसा आणि मला खूप मोठा धक्का होता. आईच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, तिच्यावर उपचार व्हावेत यासाठी मी मॅाडेलिंग आणि अभिनयापासून दूर राहिले. आईची सेवा करण्यातच माझा सर्व वेळ घालवला. मोनालिसाचं करियर नुकतंच सुरू झालं होतं आणि या सर्व गोष्टींचं टेन्शन मला मोनाला द्यायचं नव्हतं. आईच्या आजारपणाचं टेन्शन तिला झालं असतं तर त्याचा परिणाम तिच्या करियरवर झाला असता. तिचं काम सुरळीत सुरू रहावं असंच मला कायम वाटत होतं. त्यामुळं जवळपास पाच वर्षे सर्व कामं बंद करून आईची देखभाल करण्यासाठी घरीच थांबले. अखेर २०१९ मध्ये मम्मी आम्हाला सोडून गेली. मम्मीच्या जाण्यानं मी पूर्णपणे खचून गेले. ती माझा खूप मोठा आधार होती. वडीलांच्या पश्चात तिनं मला आणि मोनाला खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं होतं. मम्मी गेल्यानं खचले. त्यानंतर माझे गुरू, दिग्दर्शक अनुप जगदाळे आणि मोना यांनी मला समजावलं. मी अभिनय करावा ही आईची इच्छा असल्याची दोघांनीही जाणीव करून दिली. तू जर खचून गेलीस आणि करियर अर्ध्यावर सोडून दिलंस तिला दु:ख होईल. आजही ती कुठे गेली नसून, तू केलेला अभिय पाहण्याची वाट पहात असल्याचं मला सांगितलं. अनुपसर आणि मोनाच्या आधारानं पुन्हा उभी राहिले आहे. आता ‘उसासून आलंय मन’ हा माझा पहिलाच अल्बम प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी मी कधीच अल्बममध्ये काम केला नसल्यानं नवीन अनुभव मिळाला. यासाठी काही गोष्टी शिकले, काहींचं अनुकरण केलं आणि पुन्हा करियर सुरू केलं.

  तेव्हाच ठरवलं अभिनय करायचा
  सातारा जिल्ह्यातील खटाव हे आमचं गाव आहे. माझं आणि मोनाचं शिक्षण मुंबईतच झालं आहे. त्यानंतरचं आमचं शिक्षण लोणावळ्यात झालं. आम्ही गावी जातो, पण जन्म मुंबईचाच आहे. बालपणापासूनच मला अभिनयाची आवड होती. टीव्हीवर सिरीयल्स पहायचे तेव्हा मीसुद्धा अभिनय केला पाहिजे असं वाटायचं. आम्हाला भाऊ नसल्यानं सर्वजण पप्पा-मम्मीला म्हणायचे की, तुम्हाला मुलगा नाही. दोन मुलीच आहेत. त्या काय करणार? ते ऐकल्यावर आपण आपल्या आई-वडीलांचं नाव खूप मोठं करायचं अशी मनाशी खूणगाठ बांधली. तेव्हापासूनच आपण अभिनयात काहीतरी करू असं वाटत होतं.

  प्रेक्षकांचं प्रोत्साहन
  समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांची पिकल म्युझिक आणि शशिकांत पवार यांची प्रस्तुती असलेल्या ‘उसासून आलंय मन’ हे गाणं मला अतिशय आवडलं आहे. या अल्बमध्ये माझ्यासोबत रोहन भोसले हा नवोदित अभिनेता आहे. या गाण्याला रसिकांचं खूप प्रेम मिळत आहे. मला खूप मेसेज आणि कॅाल्स येत आहेत. टीझर प्रदर्शित झाला आणि एका दिवसात चार हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले. पोस्टरलाही खूप चांगला प्रतिसाद लाभला. गाणंही लोकांना खूप आवडत आहे. प्रेक्षकांकडून खूप प्रोत्साहन मिळत असल्यानं काहीतरी पहिल्यांदाच केलं आणि त्याचं अॅप्रिसिएशन मिळत असल्याचा वेगळा आनंद आहे. महाराष्ट्रानं जसं मोनाला प्रेम दिलं, तसंच मलाही द्यावं हीच अपेक्षा आहे.

  गावच्या मातीचा सुगंध
  या अल्बममध्ये मला गावाकडच्या मुलीचा टच दिल्याबद्दल बोलायचं तर मी स्वत: सातारकडची असल्यानं गावच्या मातीचा सुगंध आपल्या रक्तात भिनलेला असतो असं मला नेहमी वाटतं. जेव्हा कधी मी अल्बमच्या माध्यमातून रसिकांसमोर येईन, तेव्हा गावरान टचमध्येच येईन हे खरं तर मी हे खूप अगोदरच ठरवलं होतं. गावरान रूपात मला लोकांसमोर यायला आवडेल. यापूर्वी मी केलेल्या चित्रपटातही गावच्या लुकमध्ये दिसेन. कारण मला माझ्या गावच्या मातीविषयी खूप प्रेम आहे. जिथून आपण आलो ते मूळ विसरता कामा नये असं मला वाटतं.

  मेढ्यातील तरुणाचा पहिला प्रयत्न
  वैभव भिलारे या तरुण संगीतकारानं ‘उसासून आलंय मन’ला संगीत दिलं आहे. साताऱ्यातील मेढे या छोट्याशा गावातील हा तरुण आहे. सर्वसामान्य कुटुंबातील या तरुणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. गाण्याचा ट्रॅक बनवून तो मला भेटायला आला. मला हे गाणं तुमच्यासोबत करायचं असल्याचं तो म्हणाला. मी त्याला म्हणाले की, मी अद्याप अल्बम केलेला नाही, पण एखादं गाणं मला आवडलं तर मी अल्बम करण्याचा विचार नक्की करेन असं त्याला म्हणाले. त्यानंतर वैभवनं या गाण्यावर तीन महिने मेहनत घेतली. मी त्यावेळी शूटिंगसाठी कराडला होते. तिथे तो सेटवर येऊन भेटला. त्यानं केलेलं गाणं आवडल्यानं अल्बम बनवण्याचा निर्णय घेतला. हे गाणं वैभवनं विकी सक्सेनाच्या साथीनं संगीतबद्ध केलं आहे. वैभवनं स्वत:च हे गाणं गायलंही आहे. पंकज चव्हाणनं या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. सिनेमॅटोग्राफी सूर्यकांत घोरपडेंची आहे.

  हे आहेत ड्रीम रोल्स
  दहावीनंतर कॅाम्प्युटर हार्डवेअर डिप्लोमा केला आहे. त्यानंतर दोन-तीन वर्षे लोणावळ्यात शॅापही चालवलं. भविष्यामध्ये साधं सरळ कॅरेक्टर करायला आवडेल. हिस्टॅारिकल कॅरेक्टर साकारायचं आहे. चॅलेंजींग रोल्स करायचे आहेत. आता गावाकडच्या भूमिका साकारल्या आहेत, ज्या लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळतील. त्यामुळं पूर्वी साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळ्या व्यक्तिरेखा साकारत आपल्यातील अभिनेत्रीमधील विविध पैलू जगासमोर सादर करण्याची इच्छा आहे. मला नेहमी स्वत:ला चॅलेंज द्यायला आवडतात. अभिनय करतानाही तशा प्रकारची आव्हानं असली की काम करायला मजा येते.