wagle-ki-duniya

मध्यमवर्गीय कुटुंबांतील रोजच्या जगण्याचे पदर उलगडताना मनोरंजनातून मार्मिक भाष्य करणारी ९०च्या दशकातील ‘वागळे की दुनिया’ लवकरच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अवतरणार आहे. सर्वसामान्यांच्या घरात पदार्पण करणाऱ्या टीव्ही संचावरील सुरुवातीच्या काळातील लोकप्रिय मालिकांमध्ये हमखास उल्लेख होणारी ही मालिका आता नव्या ढंगात आणि नव्या पिढीच्या रूपातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे.

प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या कल्पनेतून साकारलेला ‘कॉमन मॅन’, कुंदन शाह यांच्यासारखा प्रतिभावंत दिग्दर्शक आणि दूरदर्शन हे माध्यम या तिन्हींच्या एकत्रित प्रयत्नातून १९८८ साली ‘वागळे की दुनिया’ जन्माला आली. पहिल्यांदा सहा भागांसाठीच आलेल्या या मालिकेला अमाप लोकप्रियता मिळाली. मध्यमवर्गीयांचा प्रतिनिधी म्हणून आर.के . लक्ष्मण यांचा वागळे अजरामर झाला आहे. वागळेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अंजन श्रीवास्तव यांना ‘मिस्टर वागळे’ ही प्रतिमा कायमची चिकटली. ‘आजही ती ओळख पुसता आलेली नाही,’ असे सांगणारे अंजन श्रीवास्तव ३२ वर्षांनी पुन्हा एकदा वागळेची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘सोनी सब’ वाहिनीवर निर्माता-दिग्दर्शक जे. डी. मजेठिया हे ‘वागले की दुनिया- नई पिढी, नये किस्से’ ही मालिका नव्या वर्षांत घेऊन येणार आहेत.

नव्या मालिकेत श्रीनिवास आणि राधिका या दाम्पत्याची दोन्ही मुले मनोज आणि राजू मोठी झाली आहेत. एक परदेशात आहे, तर दुसरा मुंबईत नोकरी करतो आहे. ही कथा प्रामुख्याने वागळेंच्या मुलाभोवती फिरणार असून अभिनेता सुमीत राघवन चिरंजीव वागळेच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘कथा वागळेंच्या मुलाची असली तरी मूळ मालिकेतील वागळे दाम्पत्य हे या मालिकेचे मुख्य आकर्षण असणारच, ते नसतील तर लोकांना ‘वागळे की दुनिया’ रुचणार नाही,’ असे स्पष्ट मत अंजन श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. त्यामुळेच नव्या मालिकेत अंजन श्रीवास्तव आणि भारती आचरेकर हे सुरुवातीला झळकणार आहेत.