ए. आर. रेहमान निर्मित पहिला वहिला चित्रपट होणार ओटीटीवर प्रदर्शित, तीन भाषांमध्ये रसिक प्रेक्षकांना घेता येणार अनुभव!

आता नेटफ्लिक्सवर हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही उपलब्ध आहे. ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी रेहमाननं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली होती.

    संगीताच्या दुनियेतील जादूगार अशी ओळख असलेला आॅस्कर विजेता संगीतकार ए. आर. रेहमान चित्रपट निर्माता बनला असल्याचं एव्हाना सर्वांनाच ठाऊक झालं आहे. ‘९९ साँग्ज’ या आगामी चित्रपटाची निर्मिती रेहमाननं केली असून, तो या सिनेमाचा सहलेखकही आहे. खरं तर हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता, पण सध्याची परिस्थिती पाहता ते शक्य नाही.

    याच कारणामुळं हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेत, नेटफ्लीक्सवर ‘९९ साँग्ज’ प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १६ एप्रिल रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. आता नेटफ्लिक्सवर हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही उपलब्ध आहे. ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी रेहमाननं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली होती.

    आजवर जाहिरातींचं दिग्दर्शन करणाऱ्या नवोदित दिग्दर्शक विश्वेष कृष्णमूर्ती यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, इहान भट आणि एडिल्सी वर्गस ही नवी कोरी जोडी या चित्रपटात आहे. दक्षिण कोरीयातील बूसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर करण्यात आला आहे.