‘नाना- माझ्या यशाचं गुपित, माझे लढण्याचे बळ……’, अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, फेसबुकवरील पोस्टने चाहत्यांच्या डोळ्यात तरळलं पाणी!

“नाना- माझ्या यशाचं गुपित, माझे लढण्याचे बळ, माझे मार्गदर्शक, माझी ताकद, माझा पाठीराखा, माझा बापमाणूस” अशा शब्दात अश्विनीने वडिलांचे वर्णन केलं आहे.

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्यावरही दुःखद प्रसंग ओढावला. कोरोनाशी झुंज देताना अश्विनीचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे निधन झाले. “कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला” अशा शब्दात अश्विनीने फेसबुकवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे.

    “कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला… कधी कधी स्वतःचे फाटलेले असले तरी शेवटपर्यंत लोकांसाठी करत राहिले आणि मलाही तेच शिकवले. गेले १५ दिवस कोरोनाशी वाघासारखे लढले, पण अखेरीस ही झुंज अपयशी ठरली. काळाने घाला घातला आणि आम्हाला पोरके केले. काल जाता जाता एक सांगून गेले, समाजासाठी काही केले नाही, तर आपले आयुष्य निरर्थक” “नाना- माझ्या यशाचं गुपित, माझे लढण्याचे बळ, माझे मार्गदर्शक, माझी ताकद, माझा पाठीराखा, माझा बापमाणूस” अशा शब्दात अश्विनीने वडिलांचे वर्णन केलं आहे.

    अभिनेत्री अश्विनी महांगडेने रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान नावाने सेवाभावी संस्थाही ती चालवते. या संस्थेअंतर्गत आजवर तिने अनेक उपक्रम राबवले आहेत. अश्विनीने आपल्या संस्थेमार्फत महाराष्ट्रभर विनामूल्य जेवणाची व्यवस्था सुरु केली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही तिने नागरिकांना मदत केली होती. आजही ती कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी तप्तरतेने काम करते.