abhishek banerjee

हिंदी सिनेसृष्टीत कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम करताना अभिनयातही यशस्वी झालेला अभिषेक बॅनर्जी ‘रश्मी रॅाकेट’ या चित्रपटामुळं लाइमलाईटमध्ये आला आहे. ‘हेल्मेट’ मागोमाग अभिषेकचा ‘रश्मी रॅाकेट’(Rashmi Rocket) हा चित्रपटही ओटीटीवर रिलीज होणार आहे. याचं औचित्य साधत अभिषेकनं ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह (Abhishek banerjee Exclusive Interview)बातचित केली.

  तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला ‘रश्मी रॅाकेट’ १५ ऑक्टोबरला झी५वर प्रदर्शित होणार आहे. यात अभिषेक महत्त्वपूर्ण रोलमध्ये आहे. या चित्रपटाबाबत अभिषेक म्हणाला की, ‘रश्मी रॅाकेट’ची कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. हा चित्रपट एका अशा मुद्द्यावर भाष्य करतो, ज्याकडं आजवर आपलं दुर्लक्ष झालं आहे. हा एक असा कायदा आहे ज्याबाबत सर्वसामान्य माणसाला माहितच नाही. खेळजगताशी संबंधित असलेला हा एक प्रॅाब्लेम आहे, जो आजवर आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. हा अतिशय गहन मुद्दा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जेव्हा एखादा चित्रपट बनतो, तेव्हा कमीत कमी त्या विषयावर चर्चा तरी सुरू होते. बेसिकली एका ॲथलिटच्या जीवनात कशा प्रकारे संघर्ष सुरू असतो. अत्यंत कठिण परिस्थितीचा सामना करत स्वत:ला सिद्ध केल्यानंतर कशा प्रकारे जुन्या आणि युजलेस लॅाचा वापर करून तिच्या करियरमध्ये अडथळा निर्माण केला जातो त्याची कथा ‘रश्मी रॅाकेट’मध्ये आहे.

  एखादा कायदा एखाद्या खेळाडूच्या जीवनात कसा बंधनं टाकतो त्याचं वास्तव हा चित्रपट दाखवतो. मेडल जिंकणाऱ्या स्पोर्टसमनविषयी जेव्हा आपण बोलतो, तेव्हा या मुद्द्यांचा विचार केला जात नाही. खेळाडूंच्या कथा प्रेरणादायी वाटतात, पण त्यांच्या समस्यांकडं कोणाचं लक्ष जात नाही. आजही डेव्हलपमेंट सुरू असलेल्या भारतासारख्या देशात कशा परिस्थितीत स्पोर्टसमन जागतिक पातळीवर पराक्रम गाजवून, आपलं सर्वस्व पणाला लावून मेडल घेऊन येतो ते कोणाच्याही नजरेस पडत नाही. काही गोष्टींमध्ये बदल करून खेळाडूंचा मार्ग अधिक सुखकर करणं गरजेचं आहे. हा चित्रपट त्या गोष्टींवर प्रकाश टाकतो. खेळाडूंना सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे.

  रिलेटेबल स्टोरीलाईन
  ‘रश्मी रॅाकेट’ हा चित्रपट इतर स्पोर्ट्स ड्रामांपेक्षा खूपच वेगळा आहे. कारण ही एका व्यक्तीचीही लढाई आहे. ही केवळ खेळाची लढाई नसून, ह्युमन राईट्सचीही आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हक्कांची लढाई सुरू होते, तेव्हा ती इतरांसाठीही खूप रिलेटेबल बनते. कारण एखाद्या स्पोर्टसमनच्या जय किंवा पराजयाकडं आपण आश्चर्यचकीत नजरेनं पाहिलं जातं. त्याकडं एका फँटॅसीसारखं बघितलं जातं. तो क्रिकेटर खूप चांगला खेळायचा, फुटबॅालपटू चमत्कारीक गोल करायचा, त्यानं अशा प्रकारे वर्ल्डकप जिंकून दिला अशा खेळाडूंबाबतच्या बऱ्याच गोष्टींची चर्चा होते. एखाद्या अशा खेळाडूची कथा ऐकता, जो जिंकू शकला असता, पण एका कायद्यामुळं जिंकू शकला नाही ज्याचा काही अर्थच नाही. एक असा कायदा जो खूप जुना असून, खूप वर्षांपूर्वी वेगळ्या कारणांसाठी बनवण्यात आला होता.

  खेळ व कायद्याचा अचूक ताळमेळ
  आज आपण लहानसहान हक्कांबाबत कदाचित विसरून गेलो आहोत. अशा एखाद्या कॅरेक्टरला आपण पहातो, जे एका मोठ्या प्लॅटफॅार्मवर अशा प्रकारच्या कायद्याविरोधात लढतानाच आपल्या खेळातही पुढे जातं हे पहाणं आपल्या जीवनातही एक लर्निंग लेसन देणारं ठरतं. ‘रश्मी रॅाकेट’मध्ये खेळ आणि कायद्याची लढाई कशा प्रकारे दाखवण्यात येणार आहे याची झलक ट्रेलरमध्ये नक्कीच पहायला मिळते. खेळ आणि कायदा यांचा अचूक ताळमेळ या चित्रपटात साधण्यात आला आहे. जितकं महत्त्व स्पोर्टसला देण्यात आलं आहे, तितकंच कोर्ट रूम ड्रामालाही आहे. एका इंटरेस्टिंग कथेवर बनलेला हा चित्रपट तितकाच इंटरेस्टिंग असल्यानं प्रेक्षकांना हा पाहताना नक्कीच मजा येईल अशी आशा आहे.

  पहिल्यांदाच वकील
  प्रथमच वकीलाचं कॅरेक्टर साकारलं असून, याचं नाव इशित आहे. यापूर्वी कधी रंगभूमीवरही वकील साकारलेला नाही. ‘रश्मी रॅाकेट’नं पहिल्यांदा वकीली पेशात सादर केलं आहे. नाटक आणि चित्रपटांमध्ये वकीलांचं कॅरेक्टर खूप इंटरेस्टींग असतं. वकीलाच्या कॅरेक्टरला खूप छान डायलॅाग्ज मिळतात. या कॅरेक्टरमध्ये करण्यासारखं खूप काही असतं. त्यामुळं वकीलाची भूमिका साकारताना कलाकारांचा नेहमी कस लागतो, जो या चित्रपटातही लागला आहे. खूप छान लाईन्स माझ्या वाट्याला आल्या आहेत. खूप मोनोलॅाग्ज, कोर्ट इंटोरोगेशन्स सीन्स आहेत. मी यात नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. कोर्टरूममधील परफॅार्मेटीव्ह ड्रामाही तितकाच उत्कंठावर्धक राहील याची काळजी घेतली आहे. प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो ते पहायचं आहे. अमिताभ बच्चन आणि सनी देओल यांनी साकारलेले वकील कधीही विसरता येणारे नाहीत. या दोघांनी वकीलांच्या भूमिकेत आपली वेगळी छाप सोडली आहे. राजकुमार रावनंही खूप प्रभावित केलं आहे.

  तत्त्वनिष्ठ इशित
  कोणतंही कॅरेक्टर अगोदर माणूस असतं, त्यानंतर पेशा येतो. मी वकीलाची व्यक्तिरेखा साकारत असल्यानं त्याबाबतच बोललं जातंय, पण तो आधी माणूस आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं अगोदर त्याच्या भावना महत्त्वाच्या आणि नंतर त्याच्याकडं येणाऱ्या केसेस. मी एका वकील मित्राशी गप्पा मारत होतो, तेव्हा त्यानं सांगितलं की, बरेच लॅायर्स असतात, जे अशा प्रकारच्या केसेस शोधत असतात. काही वकील मीडिया अटेंशनसाठी शोधतात, पण काही वकील तत्त्वांची जपणूक करत न्याय मिळवून देण्यासाठी अशा केसेस शोधतात. इशित हा एक असा माणूस आहे, ज्यानं आपला कम्फर्ट स्पेस सोडून रश्मीला शोधलंय. रश्मीला तो हिंमत देण्याचं काम करतो. हा खटला कायदेशीर मार्गानं लढला जाऊ शकतो हे तिला समजावून सांगतो.

  ही गोष्ट युनिक वाटली
  आपण कोणकोणत्या लिगल केसेस लढू शकतो हे सर्वसामान्यांना माहितच नाही. हे समजावून सांगणंही लॅायर्सचं काम असतं. इशितच्या कॅरेक्टरमधील ही गोष्ट मला खूप युनिक वाटली. अशा प्रकारची लोकं खऱ्या अर्थानं बदल घडवतात. या कॅरेक्टरमध्ये मला खूप हिंमत, दृढ निश्चय, चिकाटी दिसली. इशित हा माणूस म्हणून काहिसा निराळा आहे. कोर्टामध्ये खूप वेगळा आहे. कोर्टाबाहेर त्याच्याकडून चुका होतात, तो नर्व्हसही होतो. मोठ्या वकीलासमोर लढत असल्यानं त्याचा कॅान्फिडन्सही हरवलाय. या कॅरेक्टरला बरेच पैलू आहेत. हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की, एखादी गोष्ट तुम्ही माणूस असण्याच्या तुमच्या हक्काशी मॅच करत नसेल तर ती कशा प्रकारे हाताळायला हवी. हा चित्रपट समस्यांविरोधात लढण्याची ताकद देणारा आहे. इशित लढत असलेला खटला हजारो रश्मींसाठी आहे, ज्या कधी या कायद्याविरोधात आवाज उठवण्यासाठी पुढे आल्या नाहीत. त्यांच्यासाठी उदाहरण आहे की, तुम्हीसुद्धा हे करू शकता.

  ऊर्जावान तापसी
  तापसी पन्नूकडे एक वेगळीच ऊर्जा आहे. त्यामुळं तिच्यासोबत काम करताना आपल्यातही ती एनर्जी येते. अगदी मनापासून आणि हसतखेळत काम करते. ती आपल्या कामाप्रती खूप प्रामाणिक आहे. कमिटेट, पॅशनेट आणि डेडीकेटेड असणाऱ्या सर्व ॲक्ट्रेस यशस्वी झाल्या आहेत. तापसीमध्येही हे गुण सहज पहायला मिळतात. तापसीची मला आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे ती अत्यंत क्लिअर आहे. तिच्या विचारांमध्ये, वागणुकीमध्ये क्लॅरिटी आहे. तिला काय करायचंय, कशा प्रकारची कॅरेक्टर्स करायची आहेत, कोणते चित्रपट करायचे आहेत आणि आपल्या कामाद्वारे तिला काय सांगायचंय याबाबत ती अत्यंत क्लीअर आहे. त्यामुळं तिच्याकडून आमच्यासारख्या अनेकांना प्रेरणाही मिळते.

  सिंपल डायरेक्टर
  आकाश खूप सिंपल डायरेक्टर असून, त्यांनी ‘रश्मी रॅाकेट’च्या रूपात एक साधा आणि सरळ चित्रपट बनवला आहे. कुठेही गुंतागुंत केलेली नाही. आपल्यासमोर असे काही प्रश्न ठेवले, जे मूळात समोर होते, पण आपण पाहू शकत नव्हतो. त्यांचं व्हिजन खूप क्लीअर असल्यानं काम करताना उत्साह असतो. रंगभूमीवरही काम केलं असल्यानं ॲक्टर्सना सांभाळणं त्यांना चांगलं जमतं. त्यांना आपला टोन माहित आहे. शॅाट घेण्यापूर्वी रिहर्सल झाल्यावर कॅमेरा लावतात. त्यामुळं सर्व ब्लॅाकिंग्ज समजतात. विचारपूर्वक चित्रपट बनवणारे दिग्दर्शक असल्यानं साधेपणा त्यांच्या चित्रपटांमध्ये दिसतो. ‘कारवां’मध्ये याची प्रचिती आली आहे. तशाच प्रकारे ‘रश्मी रॅाकेट’मध्येही त्यांनी कथा सांगितलीय. या चित्रपटात त्यांनी एनर्जी लेव्हल वाढवली आहे.