अभिनेता एजाज खान एनसीबीच्या ताब्यात, आठ तासाच्या चौकशीनंतर केली अटक!

मंगळवारी राजस्थानहून मुंबई विमानतळावर उतरताच एजाज याला एनसीबी पथकाने ताब्यात घेतलं. त्याच्याकडे एनसीबीच्या विभागीय कार्यालयात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

    अभिनेता एजाज खानला केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणी मंगळवारी विमानतळावरून एजाज खानला ताब्यात घेण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात एनसीबीने शादाब शेख उर्फ शादाब बटाटा या अंमलीपदार्थ विक्रेत्याला अटक केली होती. चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींना मागणीप्रमाणे विविध अंमलीपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी शादाब प्रसिद्ध होता.

    मंगळवारी राजस्थानहून मुंबई विमानतळावर उतरताच एजाज याला एनसीबी पथकाने ताब्यात घेतलं. त्याच्याकडे एनसीबीच्या विभागीय कार्यालयात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. यानंतर त्याला अटक करण्यात आली. आठ तास चौकशी केल्यानंतर एजाज खानला अटक करण्यात आल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. फारुख बटाटा याची देखील याप्रकरणी आठ तास चौकशी करण्यात आली होती. त्याचा मुलगा शादाब याला मात्र गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती.

    ड्रग्ज प्रकरणात अभिनेता एजाज खानचं नाव येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१८ मध्ये बिग बॉसचा स्पर्धक राहिलेल्या एजाज खानना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबईतील एका हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्याकडे अमली पदार्थ सापडले होते.