बाजीप्रभूंसाठी अजिंक्यनं दिली केसांची आहुती!

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेत ते बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत दिसणार आहेत. या भूमिकेसाठी प्रथमच टक्कल करणाऱ्या अजिंक्यनं 'नवराष्ट्र'शी एक्सक्लुझीव्ह बातचित केली.

  आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘सर्जा’सारख्या गाजलेल्या चित्रपटात ऐतिहासिक भूमिका साकारून करणारे अजिंक्य देव पुन्हा एकदा शिवकालीन इतिहासात रमले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत ते बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत दिसणार आहेत. या भूमिकेसाठी प्रथमच टक्कल करणाऱ्या अजिंक्यनं ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह बातचित केली.

  सर्जा, वासुदेव बळवंत फडके, तात्या टोपे, ‘तान्हाजी’मध्ये पिसाळ ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय सादर करण्यासाठी अजिंक्य आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत अवतरणार आहेत. याबद्दल अजिंक्य म्हणाले की, मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो. कारण माझ्या करियरची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत झाली. त्यानंतर मी इतिहासात घुसत गेलो. माझ्या वाट्याला खूप छान कॅरेक्टर्स आली. तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके ही इतिहासातील खूप मोठी नावं आहेत. अशा व्यक्तिरेखा साकारणं नशीबी असावं लागतं. नशीबात होत्या म्हणून त्या मला मिळाल्या. ‘तान्हाजी’मधील पिसाळ हे कॅरेक्टरही खूप मोठं होतं. आता जेव्हा सतिश राजवाडे आणि स्टार प्रवाह यांनी बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका आॅफर केली, तेव्हा मला प्रचंड आनंद झाला. त्यावेळी भीतीही वाटली. कारण हे खूप मोठं कॅरेक्टर आहे. महाराजांना वाचवण्यासाठी आपली शकलं पडल्यानंतरही लढणारे बाजीप्रभू साकारण्यासाठी होकार दिल्यावरही थोडा कचरलो. आपण कुठेतरी तसे वाटावे यासाठी पडेल ती मेहनत घेण्याचा विचार पक्का केला. देवाच्या कृपेनं प्रोमो लोकांना खूप आवडल्यानं ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी उत्सुक आहे.

  बाजीप्रभूंच्या भूमिकेसाठी विशेष तयारी करण्याबाबत अजिंक्य म्हणाले की, विवेक आपटे यांनी याचं लेखन केलं आहे. त्याचा इतिहासावर खूप अभ्यास असल्यानं त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून ही भूमिका साकारत आहे. मी माझा स्वत:चा वेगळा अभ्यास करतच आहे. शीर धडापासून वेगळं झाल्यानंतर जो माणूस दहा ते वीस मोघलांना मारू शकतो याचं महाराजांवरचं प्रेम किती दृढ असेल हा अँगल पकडून अभ्यास करतोय. त्यांच्यासाठी दुसरं कोणतं दैवतच नव्हतं. त्यांचं एकमेव दैवत होतं ते म्हणजे शिवाजी महाराज. हाच धागा पकडून मी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. प्रोमोमध्येही मी त्यांना थांबवतोय आणि हक्कानं जायला सांगतोय. अगोदर आर्जव करतोय आणि नंतर हक्काच्या भाषेत जायला सांगतोय. खरं तर हा आदेश देणं नाही. महाराजांना आपण आदेश देऊ शकत नाही. त्यांच्यावरील प्रेमापोटी आलेला तो एक राग आहे. ‘मी इथं सांभाळतोय, तुम्ही निघा.’ कारण महाराष्ट्राला, देशाला तुमची गरज आहे. या सर्व गोष्टींचा आराखडा घालून मी काम करतोय.

  यासाठी केला गोटा
  शारीरिकदृष्ट्या मी तंदुरुस्त आहेच. घरीच व्यायाम सुरू आहे. हे कॅरेक्टर कुठेही खोटं वाटू नये. त्यातील खरेपणा बारीकसारीक गोष्टींद्वारे सादर व्हावा यासाठी आयुष्यात प्रथमच मी टक्कल केलं आहे. मला कोणीही गोटा करायला सांगितलं नाही. हा निर्णय स्वत:हून घेतला आहे. यामुळं मला एक-दोन सिनेमे सोडावे लागतील, पण या कॅरेक्टरला मला पूर्ण जस्टीस द्यायचा आहे. कारण इतिहासात अजरामर झालेलं हे खूप मोठं कॅरेक्टर आहे. आपल्याकडून त्यात काही कमी राहता कामा नये हा हेतू आहे. मी गोटा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘तू कर’ अशीच कुटुंबियांचीही प्रतिक्रिया होती. माझ्या वडीलांनी तर ही गोष्ट फारच मनावर घेतली. ते म्हणाले, ‘अजिंक्य, तू गोटा कर’. बाबा ज्या प्रकारचे कलावंत आहेत ते पाहता त्यांचं हेच म्हणणं होतं की, ‘जस्ट गो अँड डू इट’. प्रॅास्थेटिक्स लावून कोणीही काम केलं असतं, पण आपल्या वाट्याला हिमालयाइतका मोठा रोल आला, त्यापुढे केसांचं काय महत्त्व हा विचार केला. महाराजांसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या बाजीप्रभूंसाठी आपण केसांची आहुती द्यावा हा प्रामाणिक विचार होता. दोन नवीन प्रोजेक्टस आहेत, पण त्यासाठी विग वगैरे बनवून घेईन.

  असे असावेत बाजीप्रभू
  बाजीप्रभूंबद्दल सांगायचं तर प्रचंड बलदंड माणूस. हिमालयाची शक्ती अंगामध्ये असणारं व्यक्तिमत्त्व. एकच निष्ठा आणि प्रेम ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यासाठी काहीही करायची तयारी. त्या काळातील बरीचशी माणसं अशीच होती; परंतु हे व्यक्तिमत्त्वच काहीतरी अचाट होतं. यांनी महाराजांसाठी केवळ आपले प्राणच पणाला लावले नाहीत, तर महाराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा आवाज कानी येईपर्यंत घोडखिंड लढवून ठेवली. त्यांच्या रक्तानं पावन झाल्यानं पुढं ही खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. माझ्या मते हा माणूस प्रचंड मायाळू असणार. यांच्या मनात आईचं प्रेम असणार. त्याचबरोबर प्रचंड ताकद आणि हृदयातील महाराजांचं प्रेम या दोन गोष्टी एकवटल्या आणि त्यातून बाजीप्रभू देशपांडे निर्माण झाले असावेत.

  हे गरजेचं होतं
  ‘तान्हजी’ केल्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’मध्ये अजय देवगण, काजोल, ओम राऊत आणि मी प्रमोशनसाठी एकत्र गेलो होतो. त्यावेळी मी अजयला सांगितलं होतं की, महाराष्ट्रात हा चित्रपट नक्कीच चालणार. आॅल ओव्हर भारतातून या चित्रपटाला तूफान प्रतिसाद मिळाला. हे चित्र पाहता महाराजांच्या शिलेदारांवर चित्रपट बनले तर लोकांना ते नक्कीच आवडतील. ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेच्या माध्यमातून स्टार प्रवाहनं तेच काम हाती घेतलं आहे. महाराजांच्या प्रत्येक शिलेदारांवर ४० ते ५० एपिसोडस होऊ शकतात. लोकांना हे पहायचं आहे, पण ते कोणी दाखवत नाही. हे काम आमची मालिका करणार आहे. यासाठी नितीन वैद्य, सतिश राजवाडे यांचा आभारी आहे.

  अजयसोबत घरोब्याचं नातं
  अजय आणि मी तीन चित्रपट एकत्र केले आहेत. यापैकी ‘गैर’ लागला नाही. अजय आणि मी सिनेसृष्टीत येण्यापूर्वी एकाच जिममध्ये वर्कआऊट करायचो. त्याचे वडील आणि माझ्या बाबांनी खूप एकत्र काम केलंय. त्यामुळं आमचं तसं घरोब्याचं नातं होतं. तो खूप छान माणूस आहे. आजच्या स्टार्सपैकी कधीही स्वत:ला असुरक्षित न समजणारा हा अॅक्टर आहे. त्याला कसल्याही प्रकारची इनसिक्युरीटी नाही. याचं जास्त होतंय तर कापूया असं त्याला कधीच वाटत नाही. तो आपल्या परीनं जातो आणि परफॅार्म करतो. त्यामुळंच आज सर्व स्टार्समध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करत त्यानं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘तान्हाजी’च्या निमित्तानं प्रथमच ओमसोबत काम केलं. ‘आदिपुरुष’मध्ये माझ्यासाठी एखादा रोल येणार होता, पण अद्याप तरी आलेला नाही. भविष्यात पुन्हा कधीतरी एकत्र काम करूच.

  यासाठी मुलांनी नक्की पहा
  मी आजच्या पिढीतील मुलांना सांगेन की, केवळ एकनिष्ठ कसं रहायचं, आपली महत्त्वाकांक्षा ठरवल्यावर, स्वत:साठी मार्ग निवडल्यानंतर कुठेही राईट-लेफ्ट न जाता एकच लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवायला हवं. आपलं आयुष्य बाणासारखं असायला हवं. एकदा धनुष्यातून बाण सुटला की तो जिथं जाऊन लागेल ते तुमचं डेस्टिनेशन असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला जी माणसं होती ती प्रचंड एकनिष्ठ होती. त्यांनी अखेरपर्यंत महाराजांवरची आपली निष्ठा ढळू दिली नाही. सेवा करून इतके मोठे झाले. आजच्या यंग जनरेशनला याचीच खरी गरज आहे. आजची जनरेशन कुठेतरी मानसिकदृष्ट्या हललेली आहे. एकाच वेळी बऱ्याच गोष्टी जरी समोर आल्या तरी विचलीत न होता कशाप्रकारे फोकस करायला हवा हे जाणण्यासाठी ही मालिका पहायला हवी.