स्वामी आहेत म्हणून…अक्षय मुदवाडकरने शेअर केला स्वामी साकारतानाचा अनुभव!

स्वामी ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय मुदवाडकर तर अल्पावधीतच प्रेक्षकांचा आदरस्थान झाला. त्याचा चाहतावर्ग आज मोठा आहे. अक्षयचा अक्षय ते स्वामी असा प्रवास त्याने ‘नवराष्ट्र’ बरोबर शेअर केला आहे.

  मोठ्या प्रमाणावर मिळणारा प्रेक्षकवर्ग बघता ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर आधारित  मालिकांची निर्मिती सातत्याने होताना दिसते. अशीच सहा महिन्यांपूर्वी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर आधारित ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका कलर्स मराठी या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिकेच्या प्रोमोपासून या मालिकेची उत्सुकता निर्माण झाली आणि अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली. या मालिकेतील स्वामी ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय मुदवाडकर तर अल्पावधीतच प्रेक्षकांचा आदरस्थान झाला. त्याचा चाहतावर्ग आज मोठा आहे. अक्षयचा अक्षय ते स्वामी असा प्रवास त्याने ‘नवराष्ट्र’ बरोबर शेअर केला आहे.  

  अक्षय मूळचा नाशिककर. अक्षयने आपलं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटमधून पूर्ण केलं आहे. तर ‘मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट’ या विषयात त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्याने  १० वर्ष नोकरी केली. २०१८ च्या  डिसेंबरमध्ये नोकरीला कायमचा रामराम केला आणि अभिनय क्षेत्राकडे वळाला. सर्वसामान्य कलाकाराचा प्रवास जसा रंगभूमीवरून सुरू होतो, तसाच अक्षयचा अभिनय प्रवास सुरू झाला. नाशिकला महाविद्यालयात शिकत असताना राज्यनाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. व्यावसायिक रंगभूमीवर अक्षयने ‘गांधी हत्या आणि मी’ आणि ‘द लास्ट व्हॉइसरॉय’ या नाटकात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यानंतर ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेतही तो झळकला. मात्र अक्षयला खरी ओळख दिली ती ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने.  एक अभिनेता म्हणून त्याला लोकप्रियता मिळाली ती स्वामींच्या भूमिकेमुळे.

  स्वामी साकारताना…

  एक दिवस संध्याकाळी मला प्रॉडक्शनमधून फोन आला आणि त्याला स्वामींची भूमिका करशील का?  अशी थेट विचारणा करण्यात आली. मी स्वत: कट्टर स्वामीभक्त असल्याने नाही म्हणायला कुठे जागाच नव्हती. कारण ज्यांचे तुम्ही जन्मापासून भक्त आहात आणि त्यांचीच भूमिका करायला मिळणं हे ऐकल्यावरच अंगावर काटा आला. त्यांनंतर अनेक ऑडिशन्स झाल्या, लूक टेस्ट झाली. कारण या व्यक्तीरेखेसाठी लूक टेस्ट हा फर महत्त्वाचा भाग आहे. स्वामी रूपात मला लोकांसमोर यायाचं होतं. स्वामींच्या जवळपास तरी मला दिसायचं होतं. दोन- ते तीनवेळा लूक टेस्ट झाल्यानंतरच मालिकेच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. स्वामींबद्दल जितक्या गोष्टी जाणून घेता येतील तितका मी प्रयत्न केला. त्यातही स्वामींचा स्वभाव. जो खूप अनप्रेडीक्टेबल आहे. कोणीच सांगू शकत नाही कुठल्या गोष्टीला स्वामी काय रिअक्ट करतील. त्या त्या बारीक गोष्टी, त्यांच्या लिला या सगळ्याचा अभ्यास केला. तस लहानपणापासून मी स्वामींबद्दल ऐकतच मोठा झालो आहे. पण भूमिका करताना त्याचा डिटेल्टमध्ये अभ्यास करणं महत्त्वाचं होता. स्वामींविषयी लिहिल्या गेलेल्या जुन्या ग्रंथांचा,पोथ्यांचा अभ्यास केला.त्यातून स्वामींच्या स्वभावाचे निरनिराळे पैलू उलगडत गेले. अजूनही अभ्यास सुरूच आहे आणि तो शेवटपर्यंत सुरू राहील. त्याचप्रमाणे माझी शरीरयष्टी भूमिकेसाठी योग्य नव्हती. त्यामुळे मालिका सुरू होण्याआधी स्वामींच्या भूमिके नुसार शरीरयष्टी तयार केली. स्वामींचे पोट पुढे असल्याने चमचमीत पदार्थांवर ताव मारून तशी शरीरयष्टी तयार केली.

  भूमिकेच दडपण वाटलं नाही

  स्वामींची भूमिका स्वीकारल्यावर मला कोणतंच दडपण नव्हतं. असंख्य साधकांचे श्रद्धास्थान असलेले स्वामी, त्यांची भूमिका लीलया पेलायची जबाबदारी आपल्यावर आहे याच विचाराने मी काम सुरू केलं होते. आजही मी त्याच धारणेतून ही भूमिका करतो आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पेलण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजपर्यंत स्वामी समर्थांच्या जीवनावर अनेक चित्रपट, मालिका येऊन गेल्या आहेत. त्यामुळे आपली भूमिका आणि आपलं काम इतकं चोख हवं हा निर्धार मी केला होता आणि आज मालिकेला मिळणारी, भूमिकेला मिळणारी लोकप्रियता मी या परिक्षेत खरा उतरलो आहे असच वाटतं.

  आजीसाठी सर्वोच्च आनंद

  मला स्वामींची भूमिका मिळाली आहे हे समजल्यावर घरच्यां सगळ्यांनाच प्रचंड आनंद झाला. त्यांचा आनंद शब्द न सांगता येण्यासारखा आहे. मी स्वामींची भूमिका करतोय ही बातमी मी सगळ्यात आधी आजीला दिली होती. तिच्या दृष्टीने मी स्वामींची भूमिका करणं हा तिच्यासाठी आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा आनंद होता. ती मालिका दररोज न चुकता बघतेच शिवाय सगळे रिपीट टेलीकास्टही बघते. कधी कधी मलाच फोन करून आता पुढे काय होणार हे विचारते. त्यामुळे सगळ्यात जास्त आनंद हा आजीला झाला आहे.

   

  आदिमाया रूपातले स्वामी

  स्वामींची भूमिका साकारताना रोजच्या रोज रंगभूषेवरही तेवढीच मेहनत घ्यावी लागते. मला स्वामी रुपात तयार व्हायला कमीतकमी एक तास जातो. एप्रिल महिन्यात मला एका प्रसंगासाठी आदिमाया रुपात तयार केलं होतं. मी स्वत: या रूपासाठी पहिल्या दिवसापासून खूप उत्सूक होतो. आदिमाया रुप साकारण्यासाठी तयार व्हायला मला अडीच तासांचा अवधी लागला होता. तो दिवस आणि ती रंगभूषा लक्षात राहण्यासारखी आहे. मला या रूपाची खूपच उत्सुकता होती. माझ्या इतकी प्रेक्षकांनाही याबाबत खूप उत्सुकता होती. संपूर्ण दिवसभर आम्ही हे शूट केलं. संपूर्ण टीम त्या दिवशी एका वेगळ्याच उत्साहात काम करत होती. तो भाग प्रसारीत झाल्यानंतर प्रेक्षकांनाही तो प्रचंड आवडला. खूप चांगल्या प्रतिक्रीया या भागानंतर मिळाल्या.

  लहानमुलांचा चाहतावर्ग मोठा

  स्वामींची भूमिका ही लहानमुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय झाली. मला या मुलांच्या पालकांचे मेसेज, फोटो, व्हिडीओ समाजमाध्यमांवर खूप बघायला मिळतात. शीर्षक गीतात तल्लीन होणारी मुलं बघून समाजाच्या हिताची भूमिका स्वीकारल्याचे समाधान मिळतं. तुमच्या मालिकेमुळे येणाऱ्या नवीन पिढीवर खूप चांगले संस्कार होणार आहेत, असा मेसेज मला एका प्रेक्षकाने केला होता. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट वाटली. कारण आपल्या कामातून काही अंशीत जरी आपण संस्कार करत असलो तरी ही किती मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर मालिकेतून अनेक अनुत्तरित प्रश्नांची अचूक उत्तरं आम्हाला मिळतात अशा स्वरूपाचे मेसेजही येतात. शेवटी स्वामी पाठीशी आहेत म्हणूनच आज हे काम करू शकतोय.

   

  स्वामी दत्ताचा अवतार

  लवकरच मालिकेत चोळप्पांना समजणार आहे की स्वामी दत्ताचा अवतार आहेत. हे पारायणातून समजणार आहेत. त्याचबरोबर गिरगावच्या मठात स्वामींच्या पादूका आहेत. त्या ठाकूर दासांना स्वामींनी दिल्या होत्या. ही गोष्ट आता मालिकेत सुरू झाली आहे. हे दोन भाग लवकरच प्रदर्शित होणार आहेत. हे दोन्हीही भाग खूपच सुंदर शूट झाले आहेत. हे करताना खूप समाधान मिळालं.