प्रसिद्ध अभिनेता जिमी शेरगिलला पोलिसांनी लुधियानात केली अटक, ‘हे’ आहे त्यामागचं कारण!

मंगळवारी उशिरा पोलिसांना रात्रीच्या कर्फ्यू दरम्यान शूटिंग सुरू असल्याची माहिती मिळाली आणि सेटवर जवळपास दीडशे लोक उपस्थित होते.

    अभिनेता जिमी शेरगिल याला पंजाबी पोलिसांनी अटक केलीये. कोरोना गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्याबद्दल अभिनेत्याला अटक करण्यात आलीये. या आधी मंगळवारी नियमांचे उल्लंघन करत चित्रीकरण केल्याप्रकरणी त्याच्यासह संपूर्ण टीमचे चलान कापण्यात आले होते. पण तरीही बुधवारी या अभिनेत्याने सोशल डिस्टन्सिंग आणि नियमांचे उल्लंघन करत चित्रीकरण सुरूच ठेवले.

    पंजाबच्या लुधियाना येथील आर्या शाळेत अनेक वाहने दिसली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. अभिनेता जिमी शेरगिल आपल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी येथे येणार होता. आर्या स्कूलमध्ये लुधियाना सत्र न्यायालयाचा एक सेट बांधला गेला होता. यानंतर पोलिसांना ही बातमी समजताच एसीपी वरीयम सिंग स्वत: घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रथम शूटिंग थांबवलं. त्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने त्यांना चित्रपटाच्या शूटिंगसाठी मान्यतापत्रे दाखवली. यानंतर तेथे सामाजिक अंतर न पाळणाऱ्या दिग्दर्शकांसह दोन हजार लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे.

    मंगळवारी उशिरा पोलिसांना रात्रीच्या कर्फ्यू दरम्यान शूटिंग सुरू असल्याची माहिती मिळाली आणि सेटवर जवळपास दीडशे लोक उपस्थित होते. पोलिसांनी पुन्हा छापा टाकला तेव्हा हे आरोप योग्य असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जिमी शेरगिलसह ४ जणांना अटक केली.

    पंजाबमध्ये कोरोनाचा कहर सतत वाढत आहे. ज्यामुळे सरकारने कर्फ्यू लादला आहे. राज्यात दररोज संध्याकाळी पाच वाजता दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशासह, शनिवार व रविवार लॉकडाउनही लागू करण्यात आला आहे.