राघोबानंतर नेतोजींच्या ऐतिहासिक भूमिकेत कश्यप परुळेकर!

कश्यप स्टार प्रवाह वाहिनीवरील 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेद्वारे पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला आहे. या मालिकेत नेतोजी पालकर साकारण्याबाबत कश्यपनं 'नवराष्ट्र'शी संवाद साधला.

    २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांच्या ‘पानिपत’ या हिंदी चित्रपटामध्ये रघुनाथरावांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यानं चर्चेत आलेला मराठमोळा अभिनेता कश्यप परुळेकर आता नेतोजी पालकरांच्या भूमिकेत दिसणार असल्यानं पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आला आहे. मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही यशस्वी अभिनय करणारा कश्यप स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेद्वारे पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला आहे. या मालिकेत नेतोजी पालकर साकारण्याबाबत कश्यपनं ‘नवराष्ट्र’शी संवाद साधला.

    ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा कश्यप परुळेकर ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेद्वारे पुन्हा एकदा घरोघरी पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेच्या आॅफरबाबत कश्यप म्हणाला की, ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत नेतोजी पालकर या भूमिकेसाठी जेव्हा विचारलं गेलं, तेव्हा मला सर्व समजावून सांगण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांच्या शौर्यगाथा सांगणारी ही मालिका आहे. ही गोष्ट मला खूप भावली. कारण आजवर अशा प्रकारचा प्रयत्नच कधी झालेला नाही. त्यात नेतोजी पालकरांसारख्या निष्ठावंत मावळ्याची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यानं नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. नेतोजींचा इतिहास सर्वसामान्यांना फार कमी माहित आहे. त्यांची महाराजांवरील निष्ठा, महाराजांच्या एका शब्दावर शत्रूच्या गोटात सामील होऊन त्यांचं तिथं राहणं, पुढे त्यांचं धर्मांतर करणं, नंतर पुन्हा हिंदू धर्मात येणं हा त्यांचा इतिहासच मूळात खूप उत्सुकता वाढवणारा आहे. त्यामुळं असं कॅरेक्टर साकारायला मिळणं फार चॅलेंजिंग आहे. प्रत्येक गोष्ट समजावून सांगता आली पाहिजे. हिंदवी स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणारा एक मावळा पुढे जाऊन धर्मांतर करतो असं तेव्हा काय घडलं असेल? या प्रश्नाचं उत्तर या मालिकेत मिळेल.

    ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका आणि आपली टीम खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी कटीबद्ध असल्याचं सांगत कश्यप म्हणाला की, दशमी क्रिएशनची क्रिएटीव्ह टीम यांच्यासोबत सल्लामसलत केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं हे कॅरेक्टर डिझाइन केलं ते खूप रोमांचक वाटलं. यात स्टार प्रवाह वाहिनीसोबतच दिग्दर्शक-लेखकांचाही खूप मोठा वाटा आहे. संवाद खूप छान आहेत. त्यात काही अॅडीशन करण्याची गरज भासत नाही. या भूमिकेसाठी विचारलं गेल्यावर मी सोशल मीडियावर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण मालिकेच्या क्रिएटीव्ह टीमनं नेतोजींचा सखोल अभ्यास केला आहे. कारण इतिहास आपल्या मनाप्रमाणे दाखवू शकत नाही. प्रेक्षकांमधील कोणीही प्रश्न करू शकतो, पुरावे मागू शकतो. त्यामुळं इतिहासाची तोडमोड करण्याचं पाप आमच्याकडून होणार नाही. ट्रीटमेंटवाईज थोडं वेगळेपण आणण्याचा प्रयत्न असेल. इतिहासांच्या दाखल्यांबाबत छेडछाड केली जाणार नाही. त्यांचं नाव नेताजी नसून, नेतोजीच होतं याबाबतचे दाखले असल्यानंच तसा उल्लेख करण्यात येत आहे. पुढे त्याचा अपभ्रंश झाला आणि नेताजी असा उल्लेख होऊ लागला. या मालिकेची स्क्रीप्ट पूर्णत: तयार असून, अगोदरच लिहीलेली आहे. दैनंदिन मालिकांप्रमाणे आॅन द स्पॅाट देण्यात येत नसल्यानं पुढे काय घडणार हे आधीच ठाऊक असतं. ते खूप इंटरेस्टींग असतं.

    याचा फायदा नेतोजी साकारतान होतोय
    यापूर्वी मी आशुतोष गोवारीकरांच्या ‘पानिपत’ या बिग बजेट हिंदी चित्रपटात रघुनाथराव म्हणजेच राघोबा साकारले होते. ती माझी ऐतिहासिक पहिली भूमिका होती. त्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’मध्ये नेतोजींच्या माध्यमातून दुसऱ्यांदा ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारतोय. दोन्ही भूमिका वॅारीयरच्या मिळाल्याचा अभिनेता म्हणून खूप आनंद आहे. तलवारबाजी, घोडेस्वारी मी ‘पानिपत’च्या वेळीच शिकलेलो होतो. त्याचा फायदा नेतोजी साकारताना होत आहे. घोडेस्वारी पाहताना जरी सोपं वाटत असलं तरी मूळात खूप कठीण असल्याचं तेव्हा ट्रेनिंग घेताना जाणवलं. नेतोजी साकारताना घोडेस्वारीची वेगळं प्रशिक्षण घेण्याची गरज भासली नाही. फक्त एखादा सीन करण्यापूर्वी तालिमीवर तालिमी होतात. त्यामुळं कॅमेऱ्यासमोर कुठेही अडचण येत नाही.

    बोलीभाषेसाठी विशेष प्रयत्न
    नेतोजी साकारताना त्यांची चाल, हातवारे आणि एकूणच देहबोली आजच्या काळातील वाटता कामा नये, याचं भान राखावं लागत आहे. एका योद्ध्याची चाल असली तरी त्या काळातील असणं आवश्यक आहे. या मालिकेत बरेच अॅक्शन सीन्स आहेत. निे:शस्त्र होऊन हाणामारी करण्याचे काही सीन्स आहेत. त्यासाठी फ्लेक्सिब्लिटी ठेवावी लागत आहे. नेतोजींची बोलीभाषा आज आपण बोलतोय तशी नसून, रांगडी आहे. हाय पिचवर बोलणं असायचं. त्या काळातील माणसं मोठ्यानं बोलायची. त्यामुळं वरच्या स्वरात संवादफेक करावी लागत आहे. मी मूळचा मुंबईचाच आहे. नेतोजी खालापूरजवळील तांदळी गावचे होते. त्यामुळं त्यांची घाटावरची भाषाशैली होती. त्यामुळं पुणे-कोल्हापूरसारखी रांगडी बोलीभाषा यात वापरण्यात आली आहे. अशा प्रकारची भाषा बोलण्याचा प्रयत्नही कधी केला नव्हता, की कॅरेक्टरही केलं नव्हतं. हासुद्धा पहिलाच अनुभव आहे.

    स्वराज्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर
    महाराजांच्या खूप शिलेदारांपैकी एक नेतोजी पालकर इतकंच मला यापूर्वी माहित होतं. चौथीच्या पुस्तकात जेवढा उल्लेख झाला होता तोच काय तो लक्षात राहिला होता. त्या पलिकडे जाऊन त्यांनी धर्मांतर केलं हे ठाऊक होतं, पण ते का केलं? कशासाठी केलं? नेमकं तेव्हा काय घडलं होतं? पन्हाळगड्याचा इतिहास वगैरे मला फार ठाऊक नव्हता. भूमिका साकारण्यासाठी जेव्हा अभ्यास सुरू झाला, तेव्हा हे खूप जबरदस्त आणि चॅलेंजिंग असल्याचं जाणवलं. नेतोजी एक तर उतावीळ स्वभावाचे असतील. याचा अर्थ समोर कोणताही प्रसंग आला की, लगेच एक घाव दोन तुकडे करायचे. हातघाईवर यायचं, टोकाची भूमिका घ्यायची हा त्यांचा मूळ स्वभाव होता असं जाणवलं. इमोशनल होते म्हणून सतत टोकाची भूमिका घ्यायचे. महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न हे आपलंच स्वप्न असून त्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर अशा प्रकारचा त्यांचा अॅटीट्यूड होता ही गोष्ट मला ते साकारताना नव्यानं समजली.

    २६ जुलैपासून येणार भेटीला
    महाराजांवर सर्वांचीच निष्ठा आणि प्रेम आहे. स्वराज्याची स्थापना करून ते टिकवण्याच्या कामात त्यांच्या शिलेदारांनी किती महत्त्वाची भूमिका बजावली याबाबत आपल्याला फार कमी ठाऊक आहे. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांसारखी काही नावं सर्वांच्याच लक्षात आहेत; परंतु नेतोजींसारख्या बरेच शिलेदार फार कमी लोकांना ठाऊक आहेत. या योद्ध्यांनी महाराजांच्या एका आदेशावर काय काय केलं हे जाणून घेण्यासाठी ही मालिका पहायला हवी. तुम्ही शिवरायाचे खरे भक्त असाल तर हा इतिहास पहाणं गरजेचं आहे. आज वाचनसंस्कृती लोप पावत असताना मालिकेसारख्या प्रभावी माध्यमाद्वारे स्टार प्रवाहाच्या माध्यमातून हा इतिहास घराघरात पोहोचणार असल्याचा आनंद आहे. रात्री १० वाजता ही मालिका प्रसारीत होणार असल्यानं लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच रिलॅक्स मूडमध्ये पाहता येईल. महाराज केवळ लढवय्ये नव्हते, तर माणसं सांभाळणं, जनतेचा सांभाळ करणं, न्यायनिवाडा करणं या त्यांच्या गोष्टी समजणार आहेतच, पण त्यांची युद्धनीती आणि बुद्धीचातुर्याचंही दर्शनही घडणार आहे. त्यांनी बांधलेले गड-किल्ले आजही मजबूत आणि अभेद्य आहेत. ते उत्तम आर्किटेक्ट होते या आणि यांसारख्या गोष्टींचा उलगडाही या मालिकेद्वारे होणार आहे. शिलेदारांची शौर्यगाथा दाखवताना महाराजांचं योगदानही समजणार आहे.