अभिनेता राजेश श्रृंगारपुरे सांगतोय मल्हारराव होळकरांची भूमिका साकारताना….!

अहिल्याबाई होळकरांचा जीवनप्रवास घरोघरी पोहोचवणाऱ्या या मालिकेतील मल्हाररावांची व्यक्तिरेखा अनेकांना प्रेमात पाडत आहे. आपणही त्याला अपवाद नसल्याचं राजेशनं 'नवराष्ट्र'शी खास बातचित करताना सांगितलं.

  मराठी-हिंदी मालिकांपासून चित्रपटांपर्यंत सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता राजेश श्रृंगारपुरे सध्या मल्हारराव होळकरांच्या भूमिकेत लक्ष वेधून घेत आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हीजनवर प्रसारीत होणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेत राजेश साकारत असलेल्या मल्हाररावांचं सर्वत्र कौतुक होत आहे. अहिल्याबाई होळकरांचा जीवनप्रवास घरोघरी पोहोचवणाऱ्या या मालिकेतील मल्हाररावांची व्यक्तिरेखा अनेकांना प्रेमात पाडत आहे. आपणही त्याला अपवाद नसल्याचं राजेशनं ‘नवराष्ट्र’शी खास बातचित करताना सांगितलं.

  राजेशनं आजवर नेहमीच विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आर्मी आॅफिसरपासून ऐतिहासिक मोरोपंत तांबेंपर्यंत राजेशनं साकारलेल्या बऱ्याच व्यक्तिरेखांचं कौतुक झालं आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’मध्ये राजेश साकारत असलेल्या मल्हारराव होळकरांनी रसिकांच्या मनात घर केलं आहे. याबाबत तो म्हणाला की, मला जेव्हा या मालिकेची आॅफर आली, तेव्हा खरंच आतून एक आवाज आला. अंतर्मनानं सांगितलं की हा रोल आपल्यालाच मिळणार आणि आपणच करणार. त्यावेळी खूप प्राथमिक बोलणी सुरू होती. मल्हाररावांची भूमिका मीच करावी अशी प्रोडक्शन हाऊसचीही इच्छा होती. फेब्रुवारी २०२०ला आमची भेट झाली, पण मार्चमध्ये लॅाकडाऊन झालं आणि सहा महिने अडकलो. लॅाकडाऊनमध्ये मी दाढी वाढवली होती. ८ जूनला अनलॅाकची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर आम्ही पुन्हा भेटलो. मला पाहिल्यावर ते भारावून गेले. माझ्या दाढीतील जबरदस्त लुकवर ते खुश झाले आणि मल्हाररावांच्या भूमिकेसाठी माझ्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं.

  मल्हारराव साकारण्यासाठी केलेल्या तयारीबाबत राजेश म्हणाला की, मालिका सुरू होण्यापूर्वीपासून मी लेखक शिरीष लाटकर यांच्याकडून बरीच माहिती घेत होतो. लाटकरांना पहिल्यापासून ओळखत असल्यानं त्यांच्याकडून मिळालेल्या इनपुटचा चांगला फायदा झाला. अहिल्याबाई आणि मल्हारराव यांचं नातं इतिहासात अजरामर असलं तरी व्हिज्युअल मीडियममध्ये कुठे आलेलं नाही. ते आपल्याला चांगल्याप्रकारे फुलवता येईल असा विश्वास होता. त्या काळातील वास्तविकता मांडण्याचं ठरलं आणि मालिकेला सुरुवात केली. स्टोरीबोर्ड ऐकून मलाही मजा आली. कारण मल्हाररावांबद्दल आमच्या पिढीला बऱ्यापैकी माहित आहे, पण आजच्या जनरेशनला कितपत माहित आहे हा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दलची माहिती जगविख्यात आहे, पण मल्हारराव होळकर म्हणा किंवा तानाजी मालुसरेंसारखे बरेच योद्धे झाले ज्यांच्याबद्दल फारसं ठाऊक नाही. इतिहासाच्या पुस्तकातही संक्षिप्त रुपातच असल्यानं कलाकार म्हणून एक चांगलं औचित्य साधू शकू याची जाणीव झाली. मल्हाररावांची व्यक्तिरेखा जर मी ताकदीनिशी साकारली तर ते दररोज घराघरात पोहोचतील याची खात्री पटली. एकदा तुमचं कॅरेक्टर आवडायला लागलं की कुतूहल जागं होतं. आज नेमकं तेच झाल्यानं सिरीयल करूनही आत्मिक समाधान लाभतंय. नॅार्मली हे समाधान चित्रपटांमध्ये मिळतं. इथं लोकांचं जे प्रेम मिळतंय, प्रतिसाद मिळतोय त्यामुळं मनाला बरं वाटतंय.

  दूरदृष्टी असलेला राजा
  मल्हारराव खूपच संवेदनशील, भावूक, हुषार होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती आणि ते एक उत्तम शासकही होते. ते स्वत: खूपच सामान्य परिवारातून आलेले होते. त्यामुळं त्यांना सर्व गोष्टींची जाण होती. त्यांच्या कर्तृत्वावर पेशव्यांनी त्यांना सुभेदारपद दिलं. ते हुषार, निडर आणि मोठे योद्धेसुद्धा होते. अटकेपार अफगाण-काबूलपर्यंत जाऊन जिंकून आले होते. सर्वगुणसंपन्न माणूस मल्हारराव होळकरांसारखा असावा असं मी म्हणेन. मी या कॅरेक्टरच्या खूप प्रेमात आहे. आजवर इतकी कॅरेक्टर्स केली आहेत, पण यांच्यासारखी व्यक्तिरेखा पाहिली नाही. मी भगतसिंगही केलेत आणि अर्जुनही साकारलाय, पण मल्हाररावांच्या प्रेमात आहे. १२ तास शूट करतोय, पण इतर १२ मी कुठेतरी त्यांच्या गुणांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यातला एखादा तरी गुण अंगीभूत करण्याचा प्रयत्न करण्याइतपत मल्हारराव नसानसात भिनले आहेत.

  मल्हाररावांची सर्वात लहानगी फॅन
  युएईमधून मला एका भारतीय महिलेचा फोन आला होता. त्या मला म्हणाल्या की, तुमचे जगभर बरेच फॅन्स असतील, पण माझी दीड वर्षांची मुलगी ही जगातील तुमची सर्वात छोटी फॅन आहे. ती नुकतीच चालायला लागली असल्यानं घरभर फिरत असते. आमचं पाच-सहा रुम्सचं मोठं घर आहे. मला तिला जेवण भरवताना खूप त्रास होतो. मग मी तुमची ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही सिरीयल सुरू करते. तुमचा आवाज ऐकू येताच ती स्तब्ध होते आणि हळूच टीव्ही असलेल्या लिव्हींग रुममध्ये येते आणि तुम्हाला शांत उभी राहून पहात असते. मग तिला भरवायला सोपं जातं. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.

  अदितीमध्ये शिकण्याची वृत्ती आहे
  अदिती लहान असली तरी अॅक्टर म्हणून खूप मॅच्युअर आहे. कुठल्या सीनला कसे इमोशन्स काढायचे हे तिला चांगलं ठाऊक आहे. तिला फार काही सांगावं लागत नाही. एखाद्या ठिकाणी आणखी चांगलं व्हायला हवं वाटतं तिथे मी नक्कीच सांगतो. कारण तो सीन तितक्या चांगल्या प्रकारे खुलायला हवा. बऱ्याचदा बाल कलाकारांना थोड्या वेगळ्या प्रकारे सांगावं लागतं, पण अदितीच्या बाबतीत तसं नाही. कधी कधी त्यांचा मूड नसतो, सतत शूट करून कंटाळलेले असतात, पण ही १२ तास त्या कॅरेक्टरमध्ये असते. तिला कंटाळा आलेला मी अजूनपर्यंत तरी पाहिलेला नाही. हे आमच्या प्रोजेक्टच्या अगदी पथ्यावर पडलं आहे. दोन मेन व्यक्तिरेखा छान रुळल्या आहेत. तिच्याकडे निरीक्षण करण्याची कला असून, शिकण्याची वृत्ती आहे.

  मल्हाररावांकडून हे घ्यायला हवं
  अहिल्याबाईंकडून समाजसेवा, मल्हाररावांकडून दूरदृष्टी, समाजसेवा, संवेदनशीलता घ्यायला हवी. स्वत:चं व्यक्तिमत्त्व घडवायचं असेल, तर या सर्व गोष्टी खूप गरजेच्या आहेत. एखाद्या गोष्टीनं लोकांचा फायदा होणार असं वाटत असेल तर त्या करायला हव्यात. वर्तमानात कदाचित त्या गोष्टी लोकांना पटणार नाहीत, पण भविष्यावर नजर ठेवून समाजाच्या विरोधात जाऊनही काही गोष्टी कराव्या लागतात. त्या कठोर असू शकतात, पण पुढे त्याचा फायदा होत असेल, पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होणार असेल तर करायला हव्यात. या दोघांनीही समाजाच्या विरोधात जाऊनही निर्णय घेतलेले आहेत. सती जाण्याची प्रथा मोडीत काढणं असो, वा मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा असो… त्याकाळी अहिल्याबाईंना शिकण्याची इच्छा असल्यानं समाजाच्या विरोधात जाऊन त्यांना पाठींबा दिला. समाजानं टोकाचा विरोध केला, पण स्त्री-पुरुष समानता गाठायची असेल तर या गोष्टी करायला हव्यात हे त्यांना ठाऊक होतं. हा एक मोठा संदेश आहे.