यंदा वारी नाही म्हणे, आँ खरंय का?

वारकऱ्यांसोबतच जणू विठ्ठलाच्याही मनातील भावना शब्दबद्ध करणाऱ्या संकर्षणनं आषाढी वारीच्या निमित्तानं 'नवराष्ट्र'शी संवाद साधत आपल्या मनातील भाव व्यक्त केला.

    आज देवशयनी एकादशी म्हणजेच पंढरपूरच्या पांडुरंगाची आषाढी वारी… वारी आणि चित्रपटांचं खूप जुनं नातं आहे. वारकरी परंपरेनं नेहमीच दिग्दर्शकांना भुरळ घातली आहे, पण कवी मनाचा अभिनेता असलेल्या संकर्षण कऱ्हाडेनं रचलेल्या पांडुरंगावरील कवितेनं सर्वांनाच मोहिनी घातली. वारकऱ्यांसोबतच जणू विठ्ठलाच्याही मनातील भावना शब्दबद्ध करणाऱ्या संकर्षणनं आषाढी वारीच्या निमित्तानं ‘नवराष्ट्र’शी संवाद साधत आपल्या मनातील भाव व्यक्त केला.

    संकर्षण कऱ्हाडे या नावाला आता कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज राहिलेली नाही. चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये त्यानं साकारलेल्या व्यक्तिरेखांनी त्याला जितकी लोकप्रियता मिळवून दिली नाही, त्यापेक्षा कांकणभर जास्त लोकप्रियता त्यानं वारी आणि पांडुरंगावर रचलेल्या ‘पंढरीच्या विठूराया कसं काय रे बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, आं खरंय का?…’ या काव्यानं मिळवून दिली आहे. पांडुंरगाबाबतचा हा जिव्हाळा काव्यात व्यक्त करण्याबाबत संकर्षण म्हणाला की, मी मूळचा परभणीचा आहे. आमच्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण आहे. माझ्या आईचे आई-वडील म्हणजे माझी आजी सरोजिनी आवंढेकर-देशपांडे आणि आजोबा उत्तमराव देशपांडे वर्षानुवर्षे वारी करायचे. वारीची ही परंपरा पुढल्या पिढीनं सुरू ठेवायची म्हणून बाबांनी गोविंदराव कऱ्हाडे यांनी जावई असूनही आपल्या सासू-सासऱ्यांची वारीची परंपरा सुरू ठेवली आहे. ही माझ्या घरातील वारीची परंपरा. महाराष्ट्रात आपण कोणत्याही गोष्टीकडं खूप इमोशनली पहातो. घरी इतक्या वर्षांची वारी असल्यानं माझ्या मनावर बालपणापासून वारकरी संस्कार होत गेले. लहानपणापासून घरी हरिपाठ म्हटला जातो. पंढरपूरमध्ये ज्या काळी पांडुरंगाची महापूजा व्हायची त्या काळी आमच्या कुटुंबानं महापूजाही केली आहे. मी आजी-आजोबांसोबत विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यामध्ये गेलेलो आहे. त्यामुळं ते कनेक्शन कुठेतरी होतं. दरवर्षी जरी स्वत: वारीत गेलो नाही, तरी त्याविषयी जी आपली धारणा असते, ऐकून असतो, रिंगण पहातो, तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी फोटोत पहातो. त्यामुळं तुम्ही वारीला न जाताही नकळत त्याविषयी अॅटॅचमेंट असते.

    कविता लिहीण्याबाबत संकर्षण म्हणाला की, परभणीला श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये अकरावी-बारावीला असल्यापासून मी काही ना काही लेखन करण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा फक्त यमक जुळूवून लिहायची सवय होती ती पुढे वृद्धींगत होत गेली. आता खऱ्या अर्थानं त्याला प्रगल्भता आल्याचं दिसत आहे. त्यावेळी सतत काहीतरी मांडावं असं वाटायचं म्हणून लिहायचो. त्यात फार काही आशय नसायचा. मूळात मी खूप सेन्सेटीव्ह माणूस असल्यानं सर्व गोष्टींकडे थोडं इमोशनली पहातो. अरेरे वारी नाही झाली का… वाईट झालं. लहानपणापासून लिखाणाची आवड होती, पण गेल्या काही वर्षांमध्ये ती खूप वाढली. हे काव्य लिहीताना एक बेसिक थॅाट मनात होता की, इतकी वर्षे वारी केल्यानंतर जर वारी केली नाही, तर जेवढं वारकऱ्यांना वाईट वाटलं नाही तेवढं पांडुरंगालाही वाईट वाटत असेल ना. असा खूप छोटासा विचार मनात आला आणि त्यावर लेखन केलं. खरं तर ते आशिर्वादामुळंच माझ्या लेखणीतून अवतरलं असावं आणि याच कारणामुळं ते तळागाळातील प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचलं असावं. या काव्याची निर्मिती होण्यासाठी घरातील पवित्र वातावरण कारणीभूत ठरलं आहे. हरीपाठ, रामरक्षा, शुभंकरोती, विष्णुसहस्त्रनाम, गणपती अर्थवशीर्ष हे ऐकतच मोठा झालो आहे. हा सर्व माझ्या सभोवतालच्या वातावरणाचा झालेला परिणाम आहे. त्यामुळं आपल्या भावना शब्दांत मांडता येणं इतकाच विषय शिल्लक रहातो. जर माझी कविता ऐकून लोकांच्या डोळ्यांत पाणी येणार असेल तर तेसुद्धा त्याच ओलाव्यानं जगताहेत. फक्त मी ते मांडलेलं आहे इतकाच फरक आहे.

    लस ग्यानबा-तुकाराम नामाची…

    खरं सांगायचं तर आज प्रत्येकाच्या मनात भीती आहे. माझ्याही मनात ती होती. त्या भीतीपोटीच ‘तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कोणता संसर्गच ठेवू नको, संसर्ग भक्तीचा अन् स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची… नी या सगळयावर मग एकच लसा ग्यानबा-तुकाराम नामाची…’ मागील आपलं संपूर्ण वर्ष स्वच्छता आणि सॅनिटायझरवरच गेलं आहे. प्रसार थांबवण्यातच गेलं आहे. त्यामुळं या सर्वांच्या पलीकडं एक भावनिक संसर्ग आहे, प्रेमाचा संसर्ग आहे तो व्हावा ही भावना मनात होती. त्यामुळं त्या सर्वांशी मी कुठेतरी रिलेट केलं. खरं तर भीतीतून देवाला साकडं घालण्याचा प्रयत्न केला की, बाबा हे निस्तरून ने सगळं. परत पुढच्या वर्षी भेटूच… अशी भावना त्यात होती.

    वारी पुन्हा सुरू होईल

    मागच्या वर्षाप्रमाणं या वर्षीही चित्र बदललेलं नाही. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांसह सर्व संतांच्या पालख्या एसटीनं पंढरपूरात पोहोचल्या आहेत. यंदाही वारी नाही. त्यामुळं जगातील अनेकांसारखा मी देखील आता क्लूलेस झालोय. हे कुठं नेणार आहे, कधी संपणार याचा कोणालाच काही अंदाज नाही, पण अजूनही कुठेही आत्मविश्वास ढळलेला नाही. आता सर्व संपलंय असं कुठेही वाटत नाही. असं कसं संपेल बरं. इतकं आपण काही वाईट केलेलं नाही. ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहेच. याचं कधी ना कधी, कुठे ना कुठे त्याचं आकलन होईल. अचानक हल्ला झाल्यानं त्यातून सावरणं कठीण झालं होतं. दुष्मनाचा गेम प्लॅन जसा कळायला वेळ लागतो, तसा कोरोनाचं पुढं नेमकं काय होणार याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांपासून सर्वांनाचा थोडा वेळ लागणार आहे. तो वेळ गेल्यावर आपण त्याच्याशी डील करायला शिकू. हे सर्व मानवनिर्मित असल्यानं यावर तोडगाही मानवच शोधून काढेल. त्यानंतर पुन्हा सर्व नक्कीच पॅाझिटीव्हली सुरू होईल.

    विठूराया ममतेनं भक्ताकडं पहातो

    वारकरी संप्रदायाबाबत माझ्या मनात प्रचंड आदर आहे. यामागं तसं पाहिलं तर सायंटिफीक रिझन आणि सश्रद्ध भावनाही आहे. कुठलाही जात-पंत, धर्म, उंच-नीच असा कुठलाही भेदभाव वारीत नाही, त्या पांडुरंगाच्या चरणाशी नाही. फक्त पांढरे कपडे घालायचे, डोक्यावर टोपी घालायची, तुळशी वृंदावन घ्यायचं आणि वारीला निघायचं. माऊलींनी हरिपाठामध्येही हेच सर्व अगदी सोप्या शब्दांत लिहून ठेवलं आहे. ‘रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप…’ किंवा ‘तपेंवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे…’ किंवा ‘बहुत सुकृताची जोडी। म्हणूनी विठ्ठली आवडी…’ हे इतकं मनात भरून उरलंय की शब्द अपुरे पडतील. विठ्ठल आवडण्यासाठी पूर्व पुण्याचं संचित असावं लागतं. यातील निस्वार्थी भावना महत्त्वाची वाटते. पांडुरंगाजवळ लक्ष्मी, धन, संपदा हे काहीच नाही. तो शेतकऱ्यांसारखाच भोळा, भाबडा आणि गरीब देव असं मला नेहमी वाटतं. त्याच्याकडं वेगळं असं देण्यासारखं काही नाही. तो फक्त ममतेनं तुमच्याकडं पहातो. त्यानं आपल्याकडं बघावं म्हणून सश्रद्ध भावनेनं लाखो लोक जातात त्यांच्या भावनेचं मला विशेष कौतुक वाटतं.

    बाबा चंद्रभागेच्या वाळवंटात झोपतात

    शेतकरी आपली शेतीची कामं आटोपून वारी करतात, पण मोठमोठी लोकंही वारीत पायी चालतात. माझे बाबा बँकेत मॅनेजर होते. आता रिटायर झाले. तेसुद्धा वारीला जाताना एका पिशवीमध्ये लुंगी, बनियान, चड्डी, टॅावेल आणि अंथरायला एक चादर नेतात. अक्षरश: चंद्रभागेच्या वाळवंटात झोपतात. याचाच अर्थ वारीत कोणताही भेदभाव नसतो इतकंच मला सांगायचं आहे. वारी सर्व समावेशक आहे. त्यामुळं माझ्या मनात वारीविषयी आणि वारकऱ्यांविषयी नितांत आदराची भावना आहे. मीसुद्धा वारीला नक्कीच जाणार आहे. आता कष्ट करायचं वय असल्यानं कामाला प्राधान्य देतोय. इथून पुढं जरी योग आला तरी पुढील काही वर्षं कामालाच प्राधान्य देईन. यात मी उगाच बडेजावपणाचा आव आणून खोटं बोलणार नाही. पांडुरंगाविषयी ओढ, असक्ती, प्रेमभाव आहे. त्यामुळंच भविष्यात मी वारीला शंभर टक्के जाईन. ते सुद्धा थोडं चाललं आणि परत आलं असं करणार नाही. मला पूर्ण वारी करायची आहे. भविष्यात जेव्हा सर्व जुळून येईन तेव्हा नक्की जाईन.

    वाट पाहे उभा भेटीची आवडी…

    मूळात जी माणसं उद्योग, कामधंदा, कुटुंब सर्व सोडून पायी चालत पंढरपूरला जातात त्यांच्यात संयम ठासून भरलेला आहे. त्यामुळं वारकऱ्यांना काही सांगण्याची गरज नाही आणि लहान तोंडी मोठा घास घेण्याची माझी पात्रता नाही. त्यांच्याकडे भरपूर संयम आहे. या नंतर जेव्हा वारी होईल, तेव्हा दुपटीनं लोक जातील आणि पांडुरंगाला भेटतील. फक्त निरोगी रहा, आनंदी रहा इतकंच सांगायचं आहे. पांडुरंगाच्या कमरेवरचे हात हेच सांगण्यासाठी आहेत की चंद्रभागेचं पाणी कमरेइतकंच आहे. तुला ते बुडवणार नाही. तू माझ्या भेटीला ये. हे संकटही तसंच आहे. सर्व गोष्टी पुन्हा जुळून येतील. तोपर्यंत थोडी कळ सोसावी इतकंच सांगणं आहे.