नातेसंबंधांमध्ये बदल घडवेल सिद्धार्थचा ‘जून’!

जून या चित्रपटाचं दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती या नवोदित दिग्दर्शकांनी केलं आहे. या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळेल ते सिद्धार्थनं 'नवराष्ट्र'शी बोलताना सांगितलं.

  जून महिना अर्ध्यावर आला असून, ‘जून’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी आतूर झाला आहे. सिद्धर्थ मेनन आणि नेहा पेंडसे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती या नवोदित दिग्दर्शकांनी केलं आहे. या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळेल ते सिद्धार्थनं ‘नवराष्ट्र’शी बोलताना सांगितलं.

  ‘पोपट’, ‘हॅपी जर्नी’, ‘राजवाडे अँड सन्स’, ‘पोश्टर गर्ल’, ‘अँड जरा हटके’ या निवडक मराठी चित्रपटांसोबत ‘करीब करीब सिंगल’, ‘कारवां’, ‘मेड इन हेवन’, ‘छप्पड फाड के’, ‘बेताल’ हे हिंदी आणि ‘अलादीन’ या इंग्रजी चित्रपटात झळकलेला सिद्धार्थ मेनन ‘जून’ या आगामी चित्रपटात आणखी एका वेगळ्या रूपात भेटणार आहे. या चित्रपटाबाबत सिद्धार्थ म्हणाला की, आम्ही जेव्हा नोव्हेंबर २०१९मध्ये या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं, तेव्हापासूनच सर्वजण विचारू लागले की, ‘जून’ जूनमध्ये येणार आहे ना… पुढे लॅाकडाऊनमुळे सिनेमाच पूर्ण करता आला नाही. लॅाकडाऊनमध्ये टेक्निशियन्सनी झूम कॅालवरून काम पूर्ण केलं. त्यामुळं हा चित्रपट नेमका केव्हा प्रदर्शित होणार हे ठाऊक नव्हतं, पण योगायोगानं आता हा चित्रपट जून महिन्यातच प्रदर्शित होत असल्याचा आनंद आहे. युनिव्हर्सनं जणू सर्वांनी केलेली प्रार्थना पूर्ण केली असं म्हणायला हरकत नाही. न्यूयॅार्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘जून’ प्रदर्शित झाला आहे. यात मला बेस्ट अॅक्टरचा पुरस्कारही मिळाला आहे. आता हा चित्रपट जेव्हा प्लॅनेट मराठीवर रिलीज होईल, तेव्हा प्रेक्षकांचंही भरभरून प्रेम मिळेल अशी आशा आहे.

  न्यूयॅार्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘जून’ला बेस्ट अॅक्टरसोबतच बेस्ट फिल्मसाठीही नामांकन मिळालं होतं. या चित्रपटात साकारलेल्या व्यक्तिरेखेबाबत सिद्धार्थ म्हणाला की, मी साकारलेला नील औरंगाबादमधील इंजिनीयरींगचा विद्यार्थी आहे. स्वत:ला व्हलनरेबल समजणारा आहे. खरं तर व्हलनेबल होणं हे खूप अवघड असतं. मग ते रागाच्या, प्रेमाच्या किंवा दु:खाच्या माध्यमातून असो… त्याच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यांनी त्याला पूर्णत: हादरवून टाकलं आहे. औरंगाबादमध्ये राहणाऱ्या नीलला या शहराच्या पलीकडे जायचं आहे, पण कसं ते त्याला ठाऊक नाही. कित्येकदा आपण ज्या ठिकाणाहून असतो त्याबद्दल मनात राग असतो, तसा राग त्याच्याही मनात आहे. याचं वडीलांसोबत एक वेगळं नातं आहे. बाप-लेकामध्ये बऱ्याचदा खटके उडतात. हे नातं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाबा…’ या गाण्यात पहायला मिळतं. आजवर साकारलेल्या कॅरेक्टर्सपेक्षा नील खूप वेगळा आहे. या सिनेमाच्या निमित्तानं एकदम डार्क स्पेसिंगमध्ये मला जावं लागलं. असं यापूर्वी कोणत्याच मराठी चित्रपटासाठी करायला मिळालं नाही.

  रसिकांना घडणार औरंगाबादची सफर
  ‘जून’चा नायक नील औरंगाबादकर असल्यानं रसिकांना यात औरंगाबाद दर्शन घडणार आहे. औरंगाबाद या शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि वारसा आहे. अजंठा-वेरुळ लेणी, दौलताबादचा किल्ला, मंदिरं आणि ऐतिहासिक दरवाजे आहेत. एक टुरिस्ट शहर असल्यामुळं तिथं राहण्यात एक वेगळेपण आहे. तिथल्या मातीत आपलेपण आहे. इथे हिस्ट्री आहे, पोटेंशियल फ्युचर आहे आणि प्रेझेंटही आहे. अशा तीनही काळात तटस्थ उभं असलेलं हे शहर लोकांना खुणावत असतं. आम्ही बीबी का मकबरा, रंगीन दरवाजा, चेतना नगर सोसायटी आणि बऱ्याच खाण्याच्या फेमस ठिकाणी शूट केलं आहे. संपूर्ण शहरभर शूट केलं आहे. या चित्रपटात फँटसीचा एलिमेंट नाही. रिअल सिनेमा आहे. या सिनेमाचा फिल अनुभवण्यासाठी तो पहावा लागेल.

  नेहाच्या करियरला कलाटणी देणारं कॅरेक्टर
  नेहासोबत यापूर्वी काम केलं नव्हतं. नेहाला तुम्ही यापूर्वी अशा रूपात कधीच पाहिलेलं नसेल. इतकंच काय तिनंही कधी स्वत:ला या रूपात इमॅजिन केलं नसेल. नेहा नसती तर माझा परफॅार्मंस तितक्या चांगल्याप्रकारे समोर आला नसता. कारण नील आणि नेहानं साकारलेलं कॅरेक्टर हे ‘जून’चे दोन पिलर्स आहेत. नेहानं ज्या प्रकारे तिचं कॅरेक्टर सादर केलंय, तसं ते केलं नसतं तर माझं कॅरेक्टरच नव्हे तर सिनेमाही वेगळ्याच ट्रॅकवर गेला असता. त्यामुळं मी साकारलेल्या नील इतकीच नेहानं सादर केलेली नायिकाही ‘जून’ला यशस्वी करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरली आहे. माझ्या मते नेहानं या चित्रपटात साकारलेली व्यक्तिरेखा तिच्या करियरला कलाटणी देणारी ठरणार आहे.

  दिग्दर्शक सुहृद-वैभवची जोडी
  सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती हे दिग्दर्शक बनल्याचा मला सर्वात जास्त आनंद आहे. सुहृदला मी फार पूर्वीपासून म्हणजे त्याची बहीण मृण्मयीसोबत नाटकात काम करत होतो तेव्हापासून ओळखतो. ‘हॅपी जर्नी’ आणि ‘राजवाडे अँड सन्स’साठी असिस्टंट दिग्दर्शक असल्यापासून वैभवचं काम पाहीलं आहे. वैभव जेव्हा दिग्दर्शनात उतरेल, तेव्हा खूप भारी काम करेल असं नेहमीच वाटायचं. वैभव आणि सुहृद दिग्दर्शन करणार असल्याचं जेव्हा मला समजलं, तेव्हा खूप आनंद झाला. त्यांनी आपल्याला त्यांच्या सिनेमात घ्यावं अशी इच्छा होती, जी आपोआपच पूर्ण झाली. दोघांनाही सिनेमा या माध्यमाची समज असून, व्हिजन क्लीयर आहे. या सिनेमात खूप वेळा ते मला सोडून द्यायचे आणि हलकेच धक्के द्यायचे. त्यातून चांगलं काम झालं. कधीही दोन दिग्दर्शक असल्याचं वाटलं नाही. एकमेकांविषयी त्यांच्या मनात रिस्पेक्ट आहे. त्यांच्या पहिल्या सिनेमात प्रमुख भूमिका साकारायला मिळाल्याचा आनंद आहे.

  बदल करायला भाग पाडेल
  कधी कधी रिअॅलिटीसोबत जगणं खूप अवघड असतं. रिअॅलिटी हँडल करणं कठीण असतं. न्यूयॅार्कमध्ये बेस्ट अॅक्टर मिळाल्याची बातमी समजल्यानंतर आनंदही झाला, पण तितकंच प्रेशरही आलं. आता जबाबदारी आणखी वाढली आहे. सिनेमा रिलीजला असल्याचं दडपण वेगळं आहे. हा सिनेमा जगभर फिरून आलाय, पण हा महाराष्ट्राचा सिनेमा आहे. त्यामुळं मराठी प्रेक्षकांसोबतच अमराठी सिनेप्रेमींनीही पहायला हवा. ही माणसांची गोष्ट आहे. हा चित्रपट पाहिल्यावर तुमच्या वागणूकीत नक्कीच काहीतरी बदल होईल. हा चित्रपट आपल्याविषयी, आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी आणि आपण कसं जगतोय याविषयी विचार करायला भाग पाडेल.