जेव्हा गौरीला ‘ब्लँकेट’साठी सिग्नलवर भीक मागायला लागली तेव्हा, सांगतेय तिच्या चॅलेंजिंग भूमिकेविषयी…

'ब्लँकेट'मध्ये काम करण्याचा अनुभव रोमांचक आणि बरंच काही शिकवणारा असल्याचं गौरीनं 'नवराष्ट्र'शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना सांगितलं.

    आपल्याला नेहमीच काहीतरी वेगळं आणि आव्हानात्मक करण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. काहींसाठी ही संधी चालून येते, तर काहींना योगायोगानं मिळते. ‘पुष्पक विमान’ या चित्रपटानंतर सध्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत सोयराबाईंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या गौरी किरणलाही योगायोगानं एक चॅलेंजींग भूमिका मिळाली जी साकारण्यासाठी तिनं जीवाचं रान केलं. ‘ब्लँकेट’ या आगामी चित्रपटात पुन्हा वास्तववादी चित्र रेखाटणाऱ्या राज गोरडे या तरुण दिग्दर्शकानं गौरीला ओळखू न येणाऱ्या रूपात सादर केलं आहे. ‘ब्लँकेट’मध्ये काम करण्याचा अनुभव रोमांचक आणि बरंच काही शिकवणारा असल्याचं गौरीनं ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना सांगितलं.

    ‘पुष्पक विमान’मध्ये सुबोध भावेसोबत जोडी जमवणाऱ्या गौरी किरणनं ‘ब्लँकेट’ या चित्रपटात एक आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. मध्यंतरीच्या काळात तिनं काही चित्रपटांमध्ये अभिनय केला; परंतु काही कारणास्तव ते अद्याप प्रदर्शित झाले नाहीत. ‘ब्लँकेट’बाबत ती म्हणाली की, ‘पुष्पक विमान’नंतर बऱ्याच चित्रपटांच्या आॅफर्स आल्या, पण काही गोष्टी वर्कआऊट झाल्या नाहीत. राजसरांनी या चित्रपटासाठी संपर्क साधल्यानंतर इतर जमवाजमव करण्यासाठी त्यांचा बराच वेळ गेला. मुळशीच्या कचरा डेपोत शूटसाठी परवानगी घेण्यापासून इतर गोष्टींची जुळवाजुळव करण्यासाठी खूप दिवस लागले. पुण्यात आॅडीशनला जाईपर्यंत मी सेकंड लीड करणार असल्याचं मला ठाऊक होतं, पण तिथे गेल्यावर माझी लीडसाठी लुक टेस्ट घेतली गेली. कचरा डेपोमध्ये राहणाऱ्या मानसिकदृष्ट्या संतुलन ढासळलेल्या स्त्रीची ही व्यक्तिरेखा आहे. मागील कित्येक वर्षे आंघोळही न केलेल्या स्त्रीची मी लुक टेस्ट दिली. ही भूमिका साकारणं ही केवढी मोठी जबाबदारी असल्याची जाणीव लुक टेस्ट करतानाच मला झाली होती. लुक टेस्टमध्ये पास झाले आणि एक ट्रिकी रोल करण्याची खूप मोठी जबाबदारी माझ्याकडे आली.

    ‘ब्लँकेट’च्या टीमबाबत गौरी म्हणाली की, या चित्रपटाची टेक्निकल टीम खूप स्ट्राँग आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते साऊंड रेकॅार्डिस्ट महावीर साबन्नावर आणि डीओपी योगेश कोळी आहेत. त्यांच्या ‘कासव’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला असल्यानं एका चांगल्या टीमसोबत काम करायला मिळणार याचं समाधान होतं. माझ्यासोबत वैष्णवी शिंदे या मुलीनं खूप छान काम केलं आहे. सायली जाधव आणि मी ‘स्वराज्यजननी जिजामाता’मध्येही एकत्र काम करतोय. याशिवाय शाश्वती खन्ना, सुभाष यादव, राज गोरडे यांच्याही यात भूमिका आहेत. माय स्कायस्टार एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली निर्माते आकाश शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथा राजचीच असून, नितीन सुपेकर यांनी पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. मेकअप रसिका रावडेंनी केला असून, सिद्धी गोहील यांनी कॅास्च्युमची जबाबदारी सांभाळली आहे.

    डायलॅाग होते, पण बोलले नाही
    हे कॅरेक्टर साकारताना डोळ्यांसमोर कोणतीही इमेज नव्हती. लेखक नितीन सुपेकरांनी कॅरेक्टर खूप चांगल्या प्रकारे लिहीलं आहे. त्यांनी काही ठिकाणी या कॅरेक्टरला संवाद दिले होते, पण भूमिका साकारताना मला संवादांची गरज भासली नाही. अभिनयातूनच सारं काही सांगावंसं वाटत होतं. मी ते कॅरेक्टर तसंच साकारत राहिले. लेखकांनी लिहिलेला एकही संवाद बोलले नाही. त्यांनाही ते खूप आवडलं. इतकं ते ट्रान्सफॅार्मेशन होत गेलं. ती व्यक्तिरेखा साकारत असताना खऱ्या अर्थानं मला ती स्त्री भेटली आणि मी ती सादर करत गेले. तिची व्यथा, तिचं जगणं बोलून सांगण्यासारखं नव्हतं. ते व्हिज्युअली जास्त चांगल्या प्रकारे सादर करायचं होतं. त्यामुळं ही व्यक्तिरेखा साकारताना मला वाक्यांची किंवा शब्दांची गरजच भासली नाही.

    आंघोळी न लगे तोंड धुवावे…
    कोकणातील मंडणगडमधील वेरळ गावी मी लहानाची मोठी झाले आहे. कोकणात कुठेही कचरा नसतो, पण कचरा डेपोमध्ये कचऱ्याचंच साम्राज्य होतं. ते पाहिल्यावर आता मागे पहायचं नाही असं ठरवलं. आपल्याला आर्टिफिशीअल कचरा नको असं राज यांनी अगोदरच सांगितलं होतं. आपण जे काही करणार ते रिअल असेल. तुला खऱ्याखु्ऱ्या कचऱ्यात बसावं लागेल, तिथेच झोपावं, खावं लागेल. मी तुझ्यासाठी साधी पिशवीसुद्धा बाहेरून आणणार नाही. ही तयारी असेल तर तू हो म्हण असं राजसरांनी अगोदरच स्पष्ट सांगितलं होतं. ‘घाट’प्रमाणेच ‘ब्लँकेट’मध्येही त्यांना सारं नैसर्गिक दाखवायचं होतं. जेव्हा आपण खरं दाखवू तेव्हाच कथानकाला खरा न्याय मिळेल असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर पुढील १२ दिवस मी नखंही साफ केली नाहीत. केसांमधील अंबर पावडरही काढली नाही. आंघोळही स्वच्छ केली नाही. तिथेच मातीत बसायचे. त्यामुळे मला दोन वेळा युरीन इन्फेक्शनही झालं. माझे केस विगमध्ये मिक्स करून टाकायचे. शूटनंतर जेव्हा मी मुंबईला आले आणि फॅन लावला तेव्हा माझे तुटलेले केस उभे राहिले होते.

    भीक मागताना कोणीही ओळखलं नाही
    या चित्रपटातील सीनसाठी मी पिंपरी-चिंचवडच्या सिग्लनवर खरोखर भीकही मागितली आहे. शूट करताना कॅमेरा लपवून ठेवण्यात आला होता. मी अॅक्टर आहे हे लोकांना माहीत नव्हतं. सराईत भिकाऱ्यांप्रमाणे मी लोकांच्या बॅगा वगैरे धरून भीक मागितली. त्यानंतर आपण कसं भिकाऱ्याला इग्नोअर करतो तसे लोक मला करायचे. लोकांनी माझ्याकडे पाहून तोंडं वळवली आहेत. यामागे सारं काही नॅचरल करण्याचा हेतू होता. कुठेही काहीही कृत्रिम किंवा ओढूनताणून करायचं नव्हतं. हा नवीन अनुभव खूप काही शिकवणारा होता. एखादी व्यक्तिरेखा सजीव करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात त्याची जाणीव मला त्यावेळी झाली.

    वन टेक ओके
    बरेचसे सीन वन टेक झाले. माझं कानाचं आॅपरेशन झाल्यावर लगेचच शूटिंग शेड्यूल लागलं होतं. कानाचं आॅपरेशन झाल्यानं मोठ्यानं ओरडायचं नाही असं डॅाक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे सरांना सांगितलं की, मी ही भूमिका साकारेन, पण शक्यतो मला पुन: पुन्हा ओरडावं लागू नये असं काहीतरी करूया. या कारणामुळे माझे बरेचसे सीन्स वन टेक केले आहेत. राजसरांनी मला खूप वेळ दिला. माझ्याकडून मोजक्याच गोष्टी करून घेतल्या. सुहास भोसले यांनी मदत केली. डीओपींनी प्रत्येक सीनचा नीट अभ्यास केल्यानं कठीण गोष्टीही सोप्या झाल्या. हा चित्रपट स्त्री भ्रूण हत्येवर आधारीत आहेच, पण यातील इतर पैलूही खूप महत्त्वाचे आहेत. स्त्रीभ्रूण हत्यांचा परिणाम काय होतो याचं चित्रण यात आहे. स्त्री करियरबाबत जागरुक असते, पण तिला वात्सल्यही हवं असतं. ती लिंग भेद करत नाही, पण समाजव्यवस्थेचा बळी मात्र ठरते.