‘त्या’ वादग्रस्त विधानामुळे अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ , कोर्टाचा मोठा धक्का ; अटकेची टांगती तलवार

प्रत्येक मुद्द्यांवर केतकी सोशल मीडियावरून तिचं मत मांडताना दिसून येते. तिच्या खळबळजनक विधानामुळं अनेकदा तिला ट्रोल देखील करण्यात आलं आहे.

    मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेच्या वादग्रस्त विधानामुळे आता पुन्हा एकदा अडचणीत वाढ झाली आहे. केतकी चितळेला अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका जुन्या प्रकरणात केतकी अडकली होती. तसेच, या प्रकरणी ठाणे कोर्टानं तिचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला आहे. प्रत्येक मुद्द्यांवर केतकी सोशल मीडियावरून तिचं मत मांडताना दिसून येते. तिच्या खळबळजनक विधानामुळं अनेकदा तिला ट्रोल देखील करण्यात आलं आहे.

    शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असो किंवा सोशल मीडियावरून शिवीगाळ करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणं, अनेक कारणांमुळे केतकी चितळे चर्चेत आली होती. नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी! ? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो, असं केतकीनं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलेल होतं.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ६ डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नसून ते मुंबई दर्शनासाठी येतात, या त्यांच्या विधानावरून हा समाज फुकटा आहे आणि त्या महामानवाचा आदर करत नाहीत हे स्पष्ट होत आहे. केतकी चितळेच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तसेच दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे तिच्यावर ॲट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.