‘उडू उडू’मध्ये प्राजक्ताची स्टाइल स्टेटमेंट!

प्राजक्ता परब झी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या 'मन उडू उडू झालं' या मालिकेत एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आली आहे. या निमित्तानं प्राजक्तानं 'नवराष्ट्र'शी मारलेल्या खास गप्पा...

  एखाद्या व्यक्तीची आवड त्याला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. एखाद्या क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर स्वत:ची आवड जोपासत दुसऱ्या क्षेत्रात यशस्वी होणं हे काम सोपं नाही. असा निर्णय घेण्यासाठीही धाडस असावं लागतं. असंच धाडस दाखवत मुंबईतील पंचतारांकीत हॅाटेलमधील गलेलठ्ठ पगाराचा जॅाब सोडून अभिनयाकडे वळलेली प्राजक्ता परब झी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आली आहे. या निमित्तानं प्राजक्तानं ‘नवराष्ट्र’शी मारलेल्या खास गप्पा…

  गिरणगावातील कुटुंबात वाढलेल्या प्राजक्तानं आई-वडीलांसोबतच स्वत:चंही स्वप्न साकार करत मुंबईतील आघाडीच्या पंचतारांकीत हॅाटेल्समध्ये जॅाब केला, पण अभिनयात करियर करण्याची सुप्त इच्छा तिला गप्प बसू देत नव्हती. दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतसह नाना पाटेकर यांसारख्या बड्या अभिनेत्यांशी ओळख असूनही प्राजक्तानं स्ट्रगल करत स्वत:च्या मेहनतीनं करियर करण्याचा निश्चय केला. यासाठी तिनं आपल्या बाबांकडून काही काळ मागितला. या काळात तिनं अशी काही मेहनत घेतली की, बऱ्याच जाहिराती आणि मालिकाही तिच्या खात्यावर जमा झाल्या. आजवर प्राजक्तानं कार्तिक आर्यनसोबत अँगेज डिओ, सेंटर फ्रेश, महाराष्ट्र सरकारची ‘वेस्ट नो मोअर’ अशा बऱ्याच जाहिराती केल्या आहेत. ‘ललित २०५’, ‘आॅल मोस्ट सुफळ संपूर्ण’ या दोन मालिकांसोबत ‘माझ्या मित्राची गर्लफ्रेंड’ या वेब सिरीजमध्येही तिनं काम केलं आहे. तिचा एक चित्रपट पूर्ण झाला आहे. ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेबाबत प्राजक्ता म्हणाली की, मागील बऱ्याच दिवसांपासून मी जाहिरातींमध्ये बिझी होते. त्यामुळं मालिका वगैरे करण्याचा विचार नव्हता, पण मंदार देवस्थळी सरांच्या कामाची शैली आवडत असल्यानं त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यांच्यासोबत काम करणं हे माझ्या अॅफरमेशन लिस्टमध्ये होतं. कारण मंदारसर प्रत्येक व्यक्तिरेखेत जीव ओततात. रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीकडूनही अभिनय करवून घेऊ शकतात अशी त्यांची ख्याती ऐकली होती. मध्यंतरीच्या काळात ते मालिकांपासून दूर गेले, पण त्यांनी पुन्हा काम सुरू करावं असं मला मनोमन वाटत होतं. त्यांच्या मालिकेत मला संधी मिळेल हे मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं.

  असा जुळला योगायोग
  एक दिवस मला कास्टिंग डायरेक्टर सुयोग शिंदेचा कॅाल आला. या कार्यक्रमाच्या निर्मात्या सजोल यांच्याकडून सुयोगला माझा नंबर मिळाला होता. सुयोगनं मला तीन-चार आॅडीशन्स करायला सांगितल्या. अंकुश सध्या ‘ती परत आलीये’च्या शूटिंगसाठी कर्जतला असल्यानं फक्त जाहिराती करण्याऐवजी मालिकाही करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चार-पाच आॅडीशन्स दिल्या. काही रिप्लाय न आल्यानं सुयोगला फोन केल्यावर समजलं की त्यानं अगोदर माझ्या आॅडीशन्स वेगळ्या शोसाठी घेतल्या होत्या, पण सजोलमॅडमनी माझी आॅडीशन ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील नायकाच्या बहिणीच्या रोलसाठी घ्यायला त्याला सांगितली. अशा प्रकारे माझी ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत एंट्री झाली.

  कॅालेज गोईंग मुक्ता
  या मालिकेत हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत ही मुख्य जोडी आहे. यात नायक साकारत असलेल्या अजिंक्यच्या आॅनस्क्रीन बहिण मुक्ताची भूमिका मी या मालिकेत साकारत आहे. ही कॅालेजमध्ये जाणारी, चंचल, आपल्याच मस्तीत रमणारी आहे. आॅनलाईन पार्सल मागवणारी आहे. थोडक्यात काय ती एक धमाल स्टाईल स्टेटमेंट आहे. तिला पाहून लोकांना तशी स्टाईल करावीशी वाटेल. एकूणच एक हॅपी गो लकी असं हे कॅरेक्टर आहे. तिचं आपल्या भावासोबत खूप जिव्हाळ्याचं नातं आहे. कुटुंबात खूप लाडकी आहे. तिला नवीन गोष्टींची एक्साइटमेंट आहे. तिचा भाऊ पैसेवाला असून, नेहमी गिफ्ट देत असतो. खरं तर मला हा रोल मिळाला नसता, पण माझ्या अॅफरमेशनमध्ये असल्यानं मिळाला असावा असं मला वाटतं. आपण जेव्हा एखादी गोष्ट युनिव्हर्सला सांगतो, तेव्हा ती गोष्ट आपल्यापर्यंत येते.

  सेटवरील सुगरण
  अजिंक्य आणि हृतासोबत काम करताना खूप मजा येतेय. यापूर्वी कधीही काम केलेलं नसलं तरी खूप जुनी मैत्री असल्यासारखं वाटतंय. हृतासोबत काम करण्याची संधी यापूर्वीही मला आली होती, पण काही कारणांमुळं शक्य झालं नाही. त्यानंतर या सिरीयलची आॅफर आली. हृताला मी ही गोष्ट सांगितली, तेव्हा ती म्हणाली की, हे जग खूप छोटं आहे. सध्या हृतासोबत जास्त शूट होत नाही, पण अजिंक्यसोबत बरेच सीन्स आहेत. अजिंक्यसोबत माझं खूप छान बाँडिंग झालं आहे. खरं तर अध्यात्मामुळं आमचं चांगलं ट्युनिंग जुळलं आहे. त्यानं अगोदर विठ्ठलाची भूमिका साकारल्यानं आम्हा दोघांना एकमेकांच्या भावना समजतात. मी सेटवर सर्वांसाठी जेवणाचा डबा घेऊन येते. त्यामुळं सर्वांनी मला सुगरण हे नाव ठेवलं आहे. अजिंक्यसोबत रिहर्सल करताना आमच्या बऱ्याच गोष्टी कॅमेऱ्यासमोर जाण्यापूर्वीच डन झालेल्या असतात.

  लव्ह स्टोरी विथ फॅमिली
  मंदारसरांसोबत काम करण्याची लेव्हल खूपच वेगळी आहे. अगोदर मी माझा शॅाट झाल्यावर मेकअप रुममध्ये जायचे, पण आता दिवसभर मॅानिटरजवळ बसलेली असते. कारण मंदारसर आपल्या अॅक्टरला इतकं सांगत असतात की ते एखाद्या इन्स्टिट्यूटमध्येही शिकवलं जात नसेल. मग हृता असो किंवा अजिंक्य असो. प्रत्येकाला ते जीव तोडून समजावून सांगत असतात. त्यांचं म्हणणं जरी ऐकलं तरी एखादा सुजाण कलाकार घडू शकतो. हि लव्ह स्टोरी आहे, पण फॅमिलीसोबत. आज टीव्हीवर खूप लव्ह स्टोरीज पहायला मिळतील, पण ही खूप वेगळी आहे. आजच्या काळात फॅमिली किती महत्त्वाची आहे हे या लव्ह स्टोरीमध्ये सांगण्यात आलं आहे. या मालिकेत पुढे प्रेक्षकांना सस्पेन्सचाही अनुभव घेता येईल. यातील प्रत्येक कॅरेक्टर व्यवस्थित सादर केलं आहे. प्रत्येकाचं एकमेकांशी काही ना काही कनेक्शन आहे. या मालिकेचं शूटिंग ठाण्यात सुरू आहे.