मायारूपी प्रतिक्षाच्या ‘इश्काचा नादखुळा’, ‘नवराष्ट्र’सोबत शेअर केला अनुभव!

'तुझ्या इश्काचा नादखुळा'मधील माया ही खलनायकी व्यक्तिरेखा साकारतानाच्या भावना प्रतीक्षानं 'नवराष्ट्र'सोबत शेअर केल्या.

  काही मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा रसिकांच्या मनावर कायम आपल्या खुणा उमटवून जातात. झी मराठी वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या ‘देवमाणूस’ या मालिकेतील मंजू अशाच प्रकारे आपल्या आठवणी मागे ठेवून गेली आहे. मंजूची भूमिका यशस्वीपणे साकारणारी प्रतीक्षा जाधव आता स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेत माया बनून रसिकांसमोर परतली आहे. नुकतीच या मालिकेत मायाची एंट्री झाली आहे. ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’मधील माया ही खलनायकी व्यक्तिरेखा साकारतानाच्या भावना प्रतीक्षानं ‘नवराष्ट्र’सोबत शेअर केल्या.

  १६-१७ वर्षांची असल्यापासून सिनेमांमध्ये काम करणारी प्रतीक्षा मध्यंतरीच्या काळात शिक्षणामुळे अभिनयापासून काहीशी दूर गेली होती. ‘अरे देवा’, ‘भूताचा हनीमून’, ‘तात्या विंचू लगे रहो’ या चित्रपटांसोबत तिनं महेश मांजरेकरांच्या ‘करून गेलो गाव’ आणि ‘मी शाहरुख मांजरसुंभेकर’ या नाटकांमध्ये काम केलं आहे. ‘मोलकरीणबाई’ आणि ‘छोटी मालकीण’ या मालिकांमध्ये लक्ष वेधून घेणाऱ्या भूमिका साकारल्यानंतर आता ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’मध्ये एंट्री झाल्याबाबत प्रतीक्षा म्हणाली की, यापूर्वी ‘मोलकरीण बाई’मध्ये निगेटीव्ह कॅरेक्टर साकारलं होतं, पण ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’मधील व्यक्तिरेखा त्यापेक्षा खूप वेगळी आहे. ‘छोटी मालकीण’मध्ये ग्रे शेडेड कॅरेक्टर होतं. ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ ही सिरीयल लव्ह स्टोरीवर आधारीत आहे. यातील नायक भाई स्टाईलचा आहे. त्याचं नायिकेवर प्रेम असतं, पण सुरुवातीला नायिकेचं त्याच्यावर प्रेम नसतं. आता माझी एंट्री झाल्यानं मालिकेत बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. मी त्याच्याकडून काही गोष्टी करून घेते. त्यामुळं दोघांच्या प्रेमी जीवनावर कसा परिणाम होतो ते पुढे पहायला मिळेल. याबाबत जास्त काही बोलता येणार नाही.

  या मालिकेत प्रतीक्षानं माया नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. मंजू आणि मायाबाबत ती म्हणाली की, यामध्ये मी साकारत असलेली माया निगेटीव्ह आहे. ‘देवमाणूस’मध्ये साकारलेली मंजू लोकांना खूप आवडली. ती अत्यंत पॅाझिटीव्ह होती. ही मात्र निगेटीव्ह आहे. माया खूप ग्लॅमरस आहे. हिला आणखी चांगल्या प्रकारे सादर करण्यासाठी सध्या माझे प्रयत्न सुरू आहेत. ही एका डॅानची आयटम आहे. डॅानला सर्व माहिती पुरवत असते. थोडक्यात काय तर टीपर असते. तिची या घरात एंट्री होते. या मालिकेतील मकरंद मला इथे बोलवतो असं दाखवण्यात आलं आहे. नायक-नायिकेच्या प्रेमाची घडी विस्कटून टाकण्यासाठी तो मायाला बोलावतो. यासाठी तो दोन लाख रुपये देणार असतो. माया पैशांवर खूप प्रेम करणारी आहे. पैसा हेच तिचं सर्वस्व असतं. पैशांसाठी ती काहीही करायला तयार असते. मग नाती, प्रेम, भावना याच्याशी तिचं काही देणं-घेणं नसतं. इथलं वैभव पाहिल्यावर मायाची नियत फिरते. इथे खूप पैसे आहेत, मोठा बंगला असल्याचं पाहून तिच्या मनात लोभ निर्माण होतो. ती आणखी काही लोकांना ब्लॅकमेल करू लागते. चक्क हिरोलाही ब्लॅकमेल करते. नायकाशीच लग्न करून कायमचं तिथेच राहण्याचा मायाचा प्लॅन असतो.

  रिअल नव्हे काल्पनिक कॅरेक्टर
  रिअल लाईफमध्ये मायासारखं कॅरेक्टर मी पाहिलेलं नाही. पैशांवर प्रेम करणारं, पैशांसाठी काही करायला तयार होणारं असं माझ्या पाहण्यात अद्याप कोणी आलेलं नाही. त्यामुळं हे कॅरेक्टर साकारणं थोडं अवघड जात आहे. मायासाठी आवश्यक असलेला निर्लज्जपणा, कोडगेपणा, धूर्तपणा त्यात आणण्याचा प्रयत्न करतेय. तिचा तकीया कलाम काय असू शकतो याबाबतही विचार करतेय. जसजशी ही व्यक्तिरेखा मालिकेच्या कथानकात एकरूप होईल तसतसा तिच्यात बराच बदल झालेलाही प्रेक्षकांना जाणवेल. हिचा लुकही खूप वेगळा आहे. सुरुवातीला वेस्टर्न आऊटफिटमध्ये हॅाट कपडे घालणारी असावी याबाबत विचार केला, पण नंतर बदलला. यासाठी बऱ्याच लुक टेस्ट केल्यानंतर साडीमध्येच माया सादर करायचं ठरलं. डार्क मेकअप, डार्क लिपस्टीक, गजरा घालणारी असा मायाचा लुक आहे. हिच्याकडे घेण्यासारखा एकही चांगला गुण नाही. मंजूकडून चांगले गुण घ्यावेत. ब्लॅकमेल करणाऱ्या स्त्रीकडून कोणत्या चांगल्या गुणांची अपेक्षा करणार.

  मंजूनं लावली सकारात्मकतेची गोडी
  मला अगोदर निगेटीव्ह भूमिका साकारायला आवडायच्या, पण ‘देवमाणूस’मध्ये मंजू साकारल्यापासून लोकांची सहानुभूती मिळवणाऱ्या व्यक्तिरेखांच्या मी प्रेमात पडले. ‘देवमाणूस’नंतर ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’मध्ये पुन्हा खलनायकी भूमिकाच वाट्याला आली. व्यक्तिरेखेचा पोत वेगळा आहे, अद्याप अशा प्रकारची डार्क खलनायिका साकारली नाही आणि कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारी असल्यानं माया साकारण्याचं आव्हान स्वीकारलं. यापूर्वी साकारलेल्या खलनायिकांमध्ये इतके पैलू नव्हते. हिची लेव्हल खूप वेगळीच आहे. नायिकांमध्ये मला आजच्या काळातील विद्या बालन, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण या अभिनेत्री आवडतात. अगोदर मला माझा फेस निगेटीव्ह व्यक्तिरेखांना न्याय देणारा असल्यासारखं वाटायचं, पण मंजूनं माझा गैरसमज दूर केला. मला सहानुभूती मिळवणारं, प्रेमानं वागणारं, साध्या स्वभावाचं कॅरेक्टरही चांगल्या प्रकारे साकारता येतं याची जाणीव झाली. त्यामुळं भविष्यात पुन्हा एकदा अशा प्रकारचं कॅरेक्टर करायला नक्कीच आवडेल.

  मंजूनं दूर केला गैरसमज
  या मालिकेत अक्षया हिंदळकर, संचित चौधरी, पूजा नायक, ज्ञानेश्वरी दत्तात्रया, सिद्धेश नागवेकर आदी सहकलाकारांसोबत काम करताना सेटवर खूप एन्जॅाय करत आहे. सर्व टीम खूप छान असून, आमची चांगली गट्टी जमली आहे. दिग्दर्शक केऊर पारेख या मालिकेसाठी खूप मेहनत घेत आहेत. कॅरेक्टरचा टोन सेट करतानाही त्यांनी खूप मदत केली. माझ्याकडून वेगवेगळ्या पद्धतीनं टोन्स करून घेतले. त्यांनी बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास केला आहे. आई-वडीलांपेक्षा पैशांवर जास्त प्रेम करणारी माया पैसे समोर आल्यावर कशा प्रकारे रिअॅक्ट करेल हेसुद्धा दिग्दर्शकांनी खूप बारकाईनं सादर केलं आहे. एका वेब सिरीजची आॅफर आली आहे. ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’चं शूट सांभाळून कसं करता येईल ते पहायचं आहे. खरं तर मी सिरीयल लव्हर असल्यानं चित्रपटांपेक्षा मालिकांमध्ये काम करायला आवडतं.