ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी ‘सुपर डान्सर ४’ च्या मंचावर जून्या आठवणींना दिला उजाळा!

अनीशच्या तो ऊर्जेने सळसळणारा परफॉर्मन्स पाहून तनुजा थक्क झाली होती. इतक्या लहान वयात तो ज्या सराईतपणे नाचतो हे पाहून तिला खूप आश्चर्य वाटले.

    सुपर डान्सर सत्र ४ मध्ये या वीकएंडला सर्व छोटे स्पर्धक अभिनेत्री तनुजाच्या गाजलेल्या गाण्यांवर आपल्या शैलीत डान्स परफॉर्म करून तिला मानवंदना देणार आहेत.  स्पर्धक अनीश तट्टीकोटा आणि त्याचा सुपर गुरु आकाश शेट्टी यांनी तनुजाच्या मेरे जीवन साथी चित्रपटातील ‘चला जाता हूँ’ गाण्यावर परफॉर्म करून सगळ्यांना थक्क करून सोडले.

     शिल्पा शेट्टी कुंद्राने दोघांचा हा परफॉर्मन्स खूप वाखाणला, विशेषतः सुपर गुरु आकाशचे तिने कौतुक केले. ती म्हणाली, “हा परफॉर्मन्स म्हणजे जणू मला मिळालेली भेटच होती. या परफॉर्मन्समध्ये अनीशची जादू काही आगळीच होती.” अनीशच्या तो ऊर्जेने सळसळणारा परफॉर्मन्स पाहून तनुजा थक्क झाली होती. इतक्या लहान वयात तो ज्या सराईतपणे नाचतो हे पाहून तिला खूप आश्चर्य वाटले.

     त्यांच्या अॅक्टनंतर अनीशच्या आईने तनुजाला तिच्या आणि नूतनच्या नात्याबद्दल विचारले. त्यावर तनुजा म्हणाली, “नूतन माझ्यापेक्षा साडेसात वर्षं मोठी होती. त्यामुळे आमच्यात कधीच भांडण झाले नाही. कारण ती मला माझ्या आईसारखी होती. मी घरातले शेंडेफळ होते. सगळे जण माझे लाड करत.”

     आपल्या बहिणीशी आपले नाते कसे होते हे सांगताना तनुजाने एक किस्सा सांगितला की, नूतन एका चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना तिने तनुजाला धडा शिकवण्यासाठी बारा केळी खायला लावली होती आणि खरं तर तनुजाला केळी जराही आवडत नसत. यावर पुस्ती जोडत ती म्हणाली, “आम्ही वाद घालायचो, झगडायचो पण आमचे एकमेकींवर प्रेम होते. जसे सगळ्या भावंडांचे असते तसेच आमचे नाते होते. काजोल आणि तनिशाचे देखील असेच आहे. त्यांच्या वादावादी सतत चालू असतात आणि मला त्या त्यामध्ये हस्तक्षेप करू देत नाहीत, कारण त्यांच्या मते तो त्या दोघींचा प्रश्न आहे आणि त्या दोघी तो सोडवू शकतात.”