अभिनेत्रीच्या निधनाच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर शेअर केला फोटो, चाहत्यांना उलगडलं मृत्यूचं कोडं!

मिनाक्षी यांनी १९८३ साली निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा तेव्हाचा ब्लॉकबस्टर सिनेमा होता.

    अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांनी ९० च्या दशकात बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण करिअर यशाच्या शिखरावर असताना त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. आता सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र स्वत: मिनाक्षी यांनी फोटो शेअर करत या सर्व अफवा असल्याचं सांगितलं आहे.

    गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री मिनाक्षी यांचे कोरोनामुळे निधन झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या पाहून मिनाक्षी यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत या सर्व चर्चा खोट्या असल्याचं सिद्ध केलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या गार्डनमध्ये बसल्याचे दिसत आहे. दरम्यान त्यांनी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘डान्स पोज’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या मिनाक्षी या अमेरिकेतील टेक्सास शहरात राहतात. तेथे त्या पती हरीश मैसूर आणि दोन मुलांसोबत राहतात.

    मिनाक्षी यांनी १९८३ साली निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा तेव्हाचा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. या सिनेमामुळे मिनाक्षी या एका रात्रीत स्टार झाल्या होत्या. त्यांनी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत ‘दामिनी’ चित्रपटात काम केले होते.