Sharad ponkshe 1

पहिली आवृत्ती संपल्यानं दुसऱ्या आवृत्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे. या पुस्तकामुळं पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आलेल्या शरद पोंक्षे यांनी 'नवराष्ट्र'शी विशेष संवाद साधत 'मी आणि नथुराम' लिहिण्यामागील कारणं सांगत पुस्तकात नेमकं काय दडलंय ते सांगितलं.

  – संजय घावरे

  मुहूर्तापासून नेहमीच वादाचा विषय बनलेलं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक आज जरी बंद झालेलं असलं तरी कोणीही नक्कीच विसरलेलं मात्र नाही. अभिनेते शरद पोंक्षे यांनी या नाटकात साकारलेली नथुरामची व्यक्तिरेखा आणि त्याला झालेला विरोध प्रत्येक नाटयरसिकाला ठाऊक आहे. रंगभूमीवर २० वर्षे नथुराम रंगवताना पोंक्षे यांना खूपवेळा अत्यंत वाईट अनुभवांचा सामना करावा लागला आहे. हे अनुभव शब्दबद्ध करून त्यांनी ‘मी आणि नथुराम’ हे पुस्तक लिहीलं आहे. शब्दामृत प्रकाशनच्या वतीनं हे प्रकाशित करण्यात येणार आहे. प्रकाशनपूर्व सवलत मूल्यात या पुस्तकांच्या प्रतींची जोरदार विक्री सुरू आहे. पहिली आवृत्ती संपल्यानं दुसऱ्या आवृत्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे. या पुस्तकामुळं पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आलेल्या शरद पोंक्षे यांनी ‘नवराष्ट्र’शी विशेष संवाद साधत ‘मी आणि नथुराम’ लिहिण्यामागील कारणं सांगत पुस्तकात नेमकं काय दडलंय ते सांगितलं.

  शरद पोंक्षे यांनी मागील २० वर्षे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक केलं असून, रंगभूमीवर ११०० प्रयोग केले आहेत. या नाटकाच्या अनुभवाबाबत पोंक्षे म्हणाले की, २० वर्षे नाटकाचे प्रयोग करत असताना प्रचंड संघर्ष करावा लागला. चांगले-वाईट अनुभव आले. काही अतिशय चांगले अनुभव आले, तर काही वेळा खूपच घाणेरडे अनुभवही आले. मला प्रचंड विरोध झाला. माझा उद्धार करण्यात आला. स्वत:च्या मुर्दाबादच्या घोषणा मी ऐकल्या. हे सर्व अनुभव कोणत्याही कलावंताला प्रेरणादायी ठरू शकतात. एखादी भूमिका आपण केवळ अडीच तास रंगभूमीवर किंवा नाटकात करत नाही, तर त्या व्यतिरीक्तही त्याला बऱ्याच गोष्टींशी संघर्ष करावा लागतो. अशी एखादी भूमिका आल्यानंतर काय-काय करावं लागतं आणि किती समर्थपणं उभं रहावं लागतं हे माझ्यापेक्षा जास्त कोणी अनुभवलेलं नसेल. जाळण्यापासून ते ठार मारण्यापर्यंत बरेच प्रसंग माझ्यावर ओढवले होते. त्या कुठल्याही संकटासमोर न डगमगता २० वर्षे ही व्यक्तिरेखा साकारणं हा खूप मोठा अनुभव आहे. याबद्दल जर मी लिहीलं नाही तर तो अनुधव माझ्याबरोबरच संपून जाईल. हे सर्व अनुभव पुस्तक रूपानं एक संचित कायम रहावं या विचारातून हा प्रयत्न केला आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांचा यालाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशन

  शरद पोंक्षे आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी सोशल मीडियाच्या ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाबाबत आवाहन केल्यानंतर याची पहिली आवृत्ती प्रकाशन होण्यापूर्वीच संपली आहे. आता दुसऱ्या आवृत्तीचं काम सुरू आहे. या पुस्तकाबद्दल पोंक्षे म्हणाले की, ही नथुरामची गोष्ट नाही. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक करताना आलेल्या अनुभवांची गोष्ट आहे. हे सर्व अनुभव मला लिहायचे होते. नाटक मार्च २०१८ मध्ये बंद केलं. मध्यंतरीच्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये हे अनुभव लिहायचं डोक्यात होतं. आता फायनली त्याला अंतिम स्वरूप येत आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच १३ एप्रिल २०२१ रोजी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येणार आहे.

  त्यानं पाठ सोडलीच नाही

  हे पुस्तक लिहीण्यासाठी प्रोत्साहित करणारी बरीच माणसं आहेत. लेखकाचं मनोगतामध्ये मी त्यांची नावं लिहिली आहेत. यात अनेक लोकांचा समावेश आहे. मला स्वत:लाही पुस्तक लिहावंसं वाटलं. बऱ्याच लोकांनी प्रवृत्तही केलं, मदतही केली. शब्दामृत या संस्थेच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. पुण्यातील संभाजीनगरमध्ये राहणारा पार्थ बाविस्कर हा तरुण मुलगा पुस्तकाचा प्रकाशक आहे. मागील वर्षभर तो भयंकर चिकाटीनं माझ्या मागं लागला. माझी पाठच सोडली नाही. कधी-कधी नकोसं वाटायचं, पण त्यानं चिकाटी आणि जिद्द सोडली नाही. त्याचं कौतुक वाटतं. त्याच्यामुळं हे पुस्तक पूर्ण झालं. याच कारणामुळं मोठमोठ्या प्रकाशकांना देण्यापेक्षा त्या मुलानं मेहनत घेतलीय, त्याचं स्वत:चं प्रकाशन आहे म्हणून त्याला म्हटलं तूच प्रकाशित कर.

  काय आहे या पुस्तकात?

  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा किंवा कुठल्याही व्यक्तिरेखेचा या पुस्तकाशी काहीही संबंध नाही. या पुस्तकात नथुराम नाही, सावरकर नाहीत. यात असलं काही नाही. २० वर्षांपूर्वी नाटकात मला नथुरामची भूमिका मिळाल्यापासून ते शेवटचा प्रयोग करेपर्यंत २० वर्षे केलेला भयानक संघर्ष, थरारक अनुभव यात आहेत. हे पुस्तक वाचताना कधी डोळे ओले होतील, कधी चीड येईल, कधी खूप आश्चर्य वाटेल, कधी धक्का बसेल. एवढं असं सगळं घडलंय, अरे बापरे… असं पुस्तक वाचल्यावर वाटेल. ही कुणाचीही गोष्ट नाही. यात सावरकर किंवा नथुरामचे विचार अजिबात नाहीत. हे पुस्तक कुणावरही नाही. हा माझा शरद पोंक्षेंनी एक भूमिका करतानाचा आलेला अनुभव आहे.

  अहिंसेच्या पुजाऱ्याच्या अनुयायांचे हिंसक मार्ग

  २० वर्षांमध्ये ११०० प्रयोग ही या नाटकाची फार मोठी अॅचिव्हमेंट नव्हे. आपल्याकडं पाच-पाच हजार प्रयोग झालेली नाटकं आहेत, पण ११०० प्रयोगांमधील ९०० प्रयोग हे ‘शरद पोंक्षे मुर्दाबाद’, ‘बापू हम शरमिंदा है, तुम्हारा कातील जिंदा है’ अशी नारेबाजी करणाऱ्या लोकांच्या मधून रंगभूमीवर प्रवेश करूनही डोकं शांत ठेवून केलेले आहेत. हे अजिबात सोपं नाही. एकदा स्टेजवर ५० जणांचा घोळका आला. मला घेराव घातला, माझ्या फाईल तोडल्या, टेबलावर लाथ मारली, अंगावर शाईच्या बाटल्या मारल्या तरीही त्याच मन:स्थितीत प्रयोग करायचा. हिंसेचा कुठलाही मार्ग अहिंसेच्या पुजाऱ्याच्या अनुयायांनी सोडला नाही. हे त्यातील फार मोठं वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे लोकशाहीनं निषेध नोंदवण्याचे अनेक मार्ग दिले आहेत, पण त्यापैकी त्यांनी कोणतेच अवलंबले नाहीत. त्यांनी सर्व हिंसक मार्ग अवलंबले ही फार मोठी गंमत आहे.

  हे पुस्तक रसिक-मायबापासाठी

  हे पुस्तक मी कोणाला धडा देण्यासाठी लिहिलेलं नाही. ज्यांनी २० वर्षे माझ्यावर अतोनात प्रेम केलं, या भूमिकेवर मनापासून प्रेम केलं त्या रसिक प्रेक्षकांसाठी आहे. कोण विरोध करतोय, कोणाच्या डोळ्यात अंजन वगैरे काही नाही. मला याच्याशी काही घेणं-देणं नाही. कोणी वाचो किंवा पुस्तक जाळो त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी माझे अनुभव लिहिले आहेत. ज्यांना वाचायचे आहेत ते विकत घेऊन वाचतील. ज्याला आवडेल त्याला आवडेल. ज्याला नाही आवडेल त्याला नाही आवडणार. याबाबत मी विचार केलेला नाही. कारण कुठलीही कलाकृती ५० टक्के लोकांना आवडते आणि ५० टक्क्यांना आवडत नाही. कोणाला आवडावं म्हणून मी हे करत नाही, तर माझ्या मनाला समाधान मिळावं म्हणून करत आहे.