सुशांतसिंह राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच! एम्सच्या विशेष पथकाचा दावा

सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे (CBI) सुपूर्द केल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्याप्रकरणी एम्च्या विशेष पथकाने एक मोठा दावा केला आहे. सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे (CBI) सुपूर्द केल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईच्या कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. मात्र, या शवविच्छेदन अहवालात योग्य माहिती न देण्यात आल्याने कूपर रुग्णालयाच्या या अहवालावरदेखील संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे एम्सच्या डॉक्टरांचे एक विशेष पथक नेमून या अहवालाचा पुन्हा अभ्यास केला गेला. एम्सच्या (AIIMS) या विशेष पथकाने सुशांतचा व्हिसेरा अहवाल सादर केला.

या अहवालानुसार सुशांतवर कुठलाही विषप्रयोग करण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर त्यांनी आता सुशांतच्या हत्येची शक्यताही नाकारली आहे. सगळ्या तपासाअंती सुशांतची हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, तर सगळ्या गोष्टी त्याने आत्महत्या केली असावी याकडेच इशारा करतात, असे त्यांनी म्हटले आहे.

एम्सच्या अहवालानुसार, सुशांत प्रकरणात कूपर रुग्णालयाने निष्काळजीपणा केला आहे. सुशांत सिंह राजपूतचे (Sushant Singh Rajput) शवविच्छेदन कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी केले होते. ज्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. कूपर रुग्णालयाने दिलेल्या शवविच्छेदन अहवालात, सुशांतच्या गळ्यावरील खुणांबाबत काहीही नमूद केलेले नसून, सुशांतच्या मृत्यूची वेळही नमूद केलेली नव्हती.

आत्महत्येच्या दिशेने तपास सुरू होणार?

एम्सचा अहवाल मिळाल्यानंतर आता सीबीआय आत्महत्येचा मुद्दा लक्षात घेऊन या प्रकरणाची चौकशी करणार आहे. म्हणजेच पुढील तपासात, सुशांतने आत्महत्या केली असेल तर त्याचे कारण काय होते? त्याला कोणी आत्महत्येस प्रवृत्त केले? त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण काय?, या प्रश्नांची उत्तरे शोधली जाणार आहेत.