अजयचा आलिम हकिम लुक बघून, चाहते झाले चकीत!

आपण वास्तवात जसे आहोत तसेच लोकांसमोर यायला हवं असं त्याला वाटत असावं. याच अनोख्या शैलीमुळं असंख्य चाहते अजयवर मनापासून प्रेम करतात.

    रुपेरी पडद्यावरील कलाकारांना आपण नेहमीच नवनवीन रूपात पहात असतो. यासाठी त्यांना बरीच मेहनतही घ्यावी लागते, पण काही वेळा त्यांचा वास्तवातील लुकही चाहत्यांना चकीत करणारा ठरतो. चित्रपटातील कॅरेक्टरच्या मागणीनुसार स्वत:चा लुक चेंज करणारे कलाकार जेव्हा वास्तवात आपला मेकओव्हर करतात तेव्हाही आपोआप लक्ष वेधून घेतात. अजय देवगणबाबत बोलायचं तर तो फार स्टाइल वगैरे करण्याच्या फंदात पडत नाही.

    आपण वास्तवात जसे आहोत तसेच लोकांसमोर यायला हवं असं त्याला वाटत असावं. याच अनोख्या शैलीमुळं असंख्य चाहते अजयवर मनापासून प्रेम करतात. यावेळी मात्र अजयनं आपल्या चाहत्यांना सुखद धक्का देत लुक बदलला आहे. अजयचा ट्रीम हेअर आणि दाढीतील स्पेशल लुक समोर आला आहे. सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट आलिम हकीमनं अजयचा हा लुक डिझाइन करत त्याला एका अनोख्या रूपात सादर केलं आहे.

    प्रेक्षकांनी अजयला आजवर कधीही या रूपात पाहिलेलं नसेल. आता अजयचा हा लुक एखाद्या आगामी चित्रपटासाठी आहे की केवळ हौस म्हणून केला गेला हे सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. लवकरच यावरूनही पडदा उठेल.