ओटीटीवर घुमणार अजितचा ‘साई’गजर!

'सबका साई' च्या पहिल्या सीझनमध्ये रसिकांना दहा एपिसोडस पहायला मिळणार आहेत. या नव्या कोऱ्या वेब सिरीजचं औचित्य साधत अजितनं 'नवराष्ट्र'सोबत एक्सक्लुझीव्ह गप्पा माऱल्या.

  पंढरीच्या वारीवर आधारित ‘गजर’ चित्रपट बनवणाऱ्या अजित भैरवकर या मराठमोळ्या दिग्दर्शकानं आता ‘सबका साई’ ही काहीशी वेगळ्या दृष्टिकोनातून साईबाबांकडे पाहण्याची दृष्टी देणारी वेब सिरीज बनवली आहे. ओटीटीवर येणाऱ्या वेब सिरीज या आध्यात्म सादर करण्यासाठीही उपयोगी ठरू शकतात हा नवा मंत्र जपत अजितनं बनवलेली ‘सबका साई’ २६ आॅगस्ट रोजी एमएक्स प्लेअरवर रिलीज होणार आहे. पहिल्या सीझनमध्ये रसिकांना दहा एपिसोडस पहायला मिळणार आहेत. या नव्या कोऱ्या वेब सिरीजचं औचित्य साधत अजितनं ‘नवराष्ट्र’सोबत एक्सक्लुझीव्ह गप्पा माऱल्या.

  वारीचा ‘गजर’नंतर आता साई’गजर’ सादर करण्याबाबत अजित म्हणाला की, २०१२ मध्ये ‘गजर’ चित्रपट केल्यानंतर २०१४ मध्ये त्याचा हिंदी चित्रपट ‘मोक्ष’ रिलीज झाला. त्यानंतर मला कमीत कमी नऊ चित्रपटांच्या आॅफर्स आल्या, पण संकल्पना न आवडल्यानं त्या रिजेक्ट केले. माझे बाबा बँकर आहेत. त्यांनी मला एक प्रश्न विचारला की, तू असं का करतोय? त्यावर मला काहीतरी इंटरेस्टींगच करायचं असल्याचं मी त्यांना सांगितलं. कोणत्याही प्रोजेक्टमध्ये वेगळा अँगल असायला हवा. त्यानंतर एका मोठ्या हिंदी चित्रपटाचं लेखन केलं. सर्व प्लॅनिंग सुरू होतं, पण नंतर काही अडचणी आल्या आणि तो प्रोजेक्ट थांबला. या दरम्यान माझ्या एका मित्राचं रोड अपघातात निधन झालं. त्यावर चित्रपट बनवला. मग ‘भावलीचं लगीन’ नावाचा मराठी चित्रपट बनवला, पण तो कोरोनामुळं रिलीज होऊ शकलेला नाही. यात मराठीतील आघाडीचे स्टार्स आहेत. या दरम्यानच्या काळात मला शिर्डीला जाण्याचा योग आला, तेव्हा वेब सिरीज बनवण्याचा विचार मनात घोळू लागला. माझ्या मनातील विचार मी बॅाबी बेदी यांच्यासोबत शेअर केला. आजवर बऱ्याच दिग्दर्शकांनी जरी साईबाबा सादर केले असले, तरी त्यातील काही गोष्टी आणि डिटेलिंग अद्याप समोर आलेलं नाही. यासाठी साईचरीत्र वाचलं आणि पुन्हा शिर्डीला गेलो. साईबाबांवर रिसर्च सुरू केला. या सब्जेक्टवर काम करण्याचा निर्णय घेतला. मागील तीन वर्षांपासून मी या वेब सिरीजवर काम करतोय. डिसेंबर २०१९ मध्ये आम्ही पहिल्यांदा कॅमेरा रोल केला, पण त्यानंतर लॅाकडाऊनमुळं थेट एक वर्षानं सेकंड शेड्यूल करावं लागलं. हा सर्व काळ खूप टफ होता. लॅाकडाऊनमध्ये शूट करताना जास्त ज्युनिअर आर्टिस्टना न बोलावण्याचं बंधन होतं. याखेरीज इतरही बरीच बंधनं होती. टीमची कोरोना टेस्ट करताना खूप टेन्शन यायचं. एखादी व्यक्ती किंवा स्वत: मीच पॅाझिटीव्ह निघालो, तर काय होईल या विचारानं भीती वाटायची, पण सर्व साईबाबांच्या आशीर्वादामुळं शक्य झालं.

  साईबाबांच्या भूमिकेसाठी राज अर्जुन यांच्या निवडीबाबत अजित म्हणाला की, साईबाबांच्या रूपात कोणत्या कलाकाराला सादर करायचं हे खूप मोठं चॅलेंज होतं. या रोलसाठी सुरुवातीला मी, कास्टिंग डायरेक्टर, निर्माते आणि एमएक्स प्लेअरच्या वतीनं १० कलाकारांच्या नावांची यादी तयार केली होती. त्यातून तीन नावं शॅार्टलिस्ट केली. यासाठी मेकअप आर्टिस्ट विक्रमदादा गायकवाड यांचाही सल्ला घेऊन अखेर सर्वानुमते राज अर्जुन यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं. विक्रमदादांनीही राज यांच्याच नावाला दुजोरा दिला. त्यांचा फेसकट, डोळे आणि नाक बऱ्यापैकी साईबाबांशी सिमीलर असल्याचं विक्रमदादांचं मत होतं. त्यानंतर राजनीही खूप मेहनत घेतली. मेडिटेशन सुरू केलं. दिग्दर्शक म्हणून मला असं वाटतं की, कलाकारानं जर एखाद्या भूमिकेचा आत्मा पकडला, तर बॅाडीलँग्वेज आणि परफॅार्मंसमध्ये ती व्यक्तिरेखा आपोआप उतरत जाते. तो कलाकार ते कॅरेक्टर जगू लागतो. व्हॅाईस मोड्युलेशन सर्वच जण करतात, पण सोल खूप महत्त्वाचा असतो.

  अब्दुलबाबांच्या नातवाचे कौतुकाचे बोल
  ‘सबका साई’या ट्रेलरला आता जो रिस्पॅान्स मिळतोय तो पाहता मी असं म्हणेन की हे जितकं ग्रँड दिसतंय तितकंच ते रिअलही आहे. सिनेमॅटीक दृष्टिकोनातून बोलायचं तर प्रत्येक अंग मजबूत आहे. म्युझिक अप्रतिम आहे. ‘इतनी शक्ती हमे देना दाता…’ फेम गीतकार अभिलाष यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांनी लिहिलेलं ‘सबका साई साई, ईश्वर साई अल्ला साई…’ हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. निशी शर्मा या तरुण गीतकारासोबत जितेंद्र जोशीनंही ‘सबका साई’साठी गीतलेखन केलं आहे. शैलेंद्र बर्वेचं संगीत आहे. प्रसाद बर्वेनं कॅमेरा हाताळला आहे. कलाकारांचे परफॅार्मंसेसही खूप छान झाले आहेत. म्हाळसापतीच्या रूपात दिपक दामले आहेत. ही सर्व कॅरेक्टर्स वास्तवात होऊन गेलेल्या रिअल व्यक्तींसारखी वाटणारी आणि भावणारी आहेत. शिर्डीतील झोपडी असलेल्या अब्दुलबाबांचा नातू सलीमभाई यांनीही फोन करून प्रोमोचं कौतुक केलं. साई खूप रिअल वाटत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

  साईबाबांसाठी मीच का?
  राज अर्जुन यांनी आजवर बऱ्याच हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटांमध्ये निगेटीव्ह आणि कॅरेक्टर रोल्स केले आहेत. त्यांना जेव्हा साईबाबा साकारण्याबाबत विचारलं तेव्हा ते खूप न्यूट्रल होते. या भूमिकेसाठी मीच का? असा त्यांना प्रश्न पडला होता. त्यांना सुरुवातीला सांगितलं अद्याप कन्फर्म नाही. आपण आॅडीशन घेऊ, त्या गेटअपमध्ये तुम्हाला पाहून निर्णय घेणार आहोत असं सांगितलं. त्या प्रक्रियेनंतर राजसुद्धा या प्रोजेक्टमध्ये खूप इन्व्हॅाल्व्ह झाले. खूप ड्राफ्ट्स बनवले. कारण साईचरित्रामध्येही खूप विस्कळीत माहिती आहे. त्यामुळं मी याचं सादरीकरण लिनीयर पद्धतीनं केलं नाही. याची स्टोरी टेलिंग खूप वेगळी आहे. आतापर्यंत साईबाबांचं लहानपण कोणी दाखवलेलं नाही. त्यामुळं साईभक्तांना खूप डिटेलिंग पहायला मिळेल.

  बालसाईंसोबतच किशोरवयीन साई
  मी पहिला सिनेमा वारीवर केला. योगायोग असा आहे की, माझ्या आईचं माहेर पंढरपूर आहे आणि बाबांचं गाव शिर्डी आहे. शिर्डी हे माझं जन्मस्थळ आहे. मी, पंढरपूर आणि शिर्डी यात सुपर कनेक्शन आहे. त्यामुळं बाबांनीच ‘सबका साई’ ही वेब मालिका करण्याची बुद्धी दिली असावी किंवा ते माझ्याकडून हे काम करवून घेत असावेत. साईबाबांची जितकी मोठी मंदिर आणि ट्रस्ट आहेत त्यांच्याशी संपर्क साधून ही मालिका तळागाळातील साईभक्तापर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न आहे. यात आम्हाला साई नक्कीच यश देतील. यात किशोरवयीन साईंच्या रूपात ‘तुंबाड’ फेम मोहम्मद समाद दिसणार आहे. यात त्यानं १४ ते २० वर्षांच्या साईंची भूमिका साकारली आहे. त्याहीपेक्षा लहान वयातील साई आम्ही दाखवले आहेत, जे अद्याप कोणी दाखवललेले नाहीत.

  साईंचा मानवता धर्म…
  आजवर साईबाबांना देव किंवा संत म्हणून खूप लोकांनी दाखवलं आहे. लेखक-दिग्दर्शक म्हणून काम करताना मला साईबाबा हे माणूस म्हणून कसे होते हे दाखवायचं आहे. ते लोकांमध्ये इतके मिसळले होते की ते प्रत्येकाला आपल्या कुटुंबातीलच वाटायचे. बाबा, भाऊ, मुलगा, मित्र, मुलगा, आजोबा अशी त्यांची आपल्या भक्तांशी नाती होती. साईबाबांच्या या ह्यूमन रिलेशनवर मी जास्त फोकस केला आहे. त्यानंतर त्याच्या सुपरपॅावरकडे लक्ष वेधलं आहे. त्यांची सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे त्यांचे दोन मंत्र. मानवता धर्मावर जर आपण विश्वास ठेवला तर कोणतेच प्रॅाब्लेम्स येणार नाहीत. श्रद्धा आणि सबूरी हे आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे. या शस्त्राच्या आधारे तुम्ही काणतीही लढाई जिंकू शकता.

  चमत्कारांपेक्षा शिकवण महत्त्वाची
  साईबाबांनी चमत्कार केले हे सर्वांनाच ठाऊक आहे, पण चमत्कारांपेक्षा त्या मागची शिकवण खूप महत्त्वाची आहे. त्यांनी कशा प्रकारे भक्तांना मदत केली, त्यांचं दु:ख निवारण केलं, त्यातून त्यांना काय सांगायचं होतं, त्यांना अखिल मानवजातीला काय संदेश द्यायचा होता. साईबाबांचे दोन मंत्र सर्वांनाच ठाऊक आहेत. एक म्हणजे सबका मालिक एक आणि श्रद्धा व सबूरी. श्रद्धा आणि सबूरी हा मंत्र नेमका आला कुठून यामागची स्टोरी मला फिल्ममेकर म्हणून दाखवायची आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. याचा अॅडिशनल स्क्रीनप्ले मी लिहीला असून, सुजाता सबनीस यांनी स्क्रीनप्ले आणि डायलॅाग्ज लिहिले आहेत. या वेब शोमध्ये गुल्की जोशी, मनोज कोल्हटकर, आशिष कपूर, रोहित फाळके, प्रसन्न केतकर, देविका दफ्तरदार, वीणा जामकर, दीपक दामले, अवधूत गांधी, अतुल कासवा, गौरी कांगो आदी कलाकारांनी अभिनय केला आहे.