mukta barve

'अजूनही बरसात आहे' या मालिकेच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांवर प्रेमाची 'बरसात' करण्यासाठी सज्ज झालेल्या मुक्तानं 'नवराष्ट्र'शी मुक्त संवाद साधत गप्पा मारल्या.

  चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झालेली अभिनेत्री मुक्ता बर्वे पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळली आहे. सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत मुक्ता पुन्हा एकदा एका नव्या रूपात भेटणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांवर प्रेमाची ‘बरसात’ करण्यासाठी सज्ज झालेल्या मुक्तानं ‘नवराष्ट्र’शी मुक्त संवाद साधत गप्पा मारल्या.

  मुक्तानं आजवर साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखांचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या याच प्रेमाच्या बळावर मुक्ता एक प्रेमळ मालिका घेऊन येत टेलिव्हीजनवर कमबॅक करत आहे. याबाबत ती म्हणाली की, टेलिव्हीजनवर परतत असल्याची उत्सुकता आहे. कारण ‘रुद्रम’नंतर खूप दिवसांनी मालिकेत काम करतेय. खरं तर रोमँटिक शो येऊन बरीच वर्षं झाली. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’नंतर मी काही केलेलं नव्हतं. त्यामुळं एक्साइटमेंट खूप जास्त आहे. टेलिव्हीजनवर काम करण्याची इच्छा असते, पण वेळ नसतो. कॅाम्बिनेशन जमत नाही. सध्या नाटकांचे प्रयोग करत नसल्यानं तो वेळ मालिकेसाठी देणं प्रॅक्टिकली पॅासिबल झालं. याहीपेक्षा बेसिकली प्रोजेक्ट खूप चांगला आला. कारण केवळ वेळ असल्यानं मालिका स्वीकारण्यात काही अर्थ नव्हता. कमबॅक करताना काहीतरी वेगळं असायला हवं अशी माझी अपेक्षा होती. ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत तो कंटेंट जाणवला. सोनीच्या सोहा कुलकर्णींनी फोन केला आणि कॅान्सेप्ट ऐकवली. छान वाटली. त्यानंतर आयरीश प्रोडक्शनची मालिका असल्याचं समजलं. जोडीला उमेश कामत असल्यानं सर्वच इंटरस्टींग वाटलं. नाकारण्यासारखं काही नव्हतंच.

  या मालिकेचे प्रोमोज खूप पॅाप्युलर झाले आहेत. त्यामुळं या मालिकेत काय पहायला मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. याविषयी मुक्ता म्हणाली की, मालिकेत काय पहायला मिळणार हे आता सांगणं तसं अवघड आहे. रोमँटिक-कॅामेडी आहे. डेफिनेटली एक मॅच्युअर लव्हस्टोरी आहे. प्रोमो पाहिल्यावर असं समजतं की ते दोघेही एकमेकांना ओळखत आहेत. तू परत भेटतेयस का? असं विचारत आहेत. टायटल सांगतंय की ‘अजूनही बरसात आहे’ म्हणजे अजूनही त्यांच्यात प्रेम आहे. जी काही गोष्ट घडलीय ती अद्याप सुरू आहे. त्यामुळं त्यांची पुन: पुन्हा भेटही होतेय. अद्याप दोघंही अनमॅरीड आहेत. दोघेही पस्तीशीतील आहेत आणि दोघांचे घरचेही प्रयत्न करूनही ते लग्न करत नाहीत. ही या लव्हस्टोरीतली गंमत आहे. पहिलं प्रेम डेफिनेटली नाही. आम्ही त्या एज ब्रॅकेटमध्येही नाही आणि तशा प्रकारची ही लव्हस्टोरीही नाही. ही वेगळी लव्हस्टोरी असणार आहे. नेहमीपेक्षा वेगळे सीन्स, वेगळी कॅान्सेप्ट, लव्हस्टोरी असली तरी वेगळ्या प्रकारचा अॅप्रोच आहे.

  प्रेमाचा वर्षावर करणारी मालिका
  ओव्हरआॅल जी आता समाजात जी सिच्युएशन आहे. निगेटीव्हीटी आलेली आहे. कोव्हिडमुळं वातावरण काहीसं डल झालं आहे. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट यामुळं नकारात्मक किंवा त्रासदायक असं कोणालाही आता नको वाटत आहे. प्रेक्षकांनाच नव्हे, तर आम्हालाही नको वाटत आहे. त्यामुळं कोरोनाच्या लाटेमध्येही या मालिकेच्या प्रोमोजनी प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. उमेश आणि मी एकत्र काम करत आहोत, मी खूप दिवसांनी पुन्हा टेलिव्हीजनवर दिसणार याची एक्साइटमेंट आहे. यासोबतच एक काहीतरी प्लेझेंट येतंय या सर्वांचा एकत्रित परिणाम झाला आणि प्रेक्षकांना प्रोमोज खूप भावले. ‘अजूनही बरसात आहे’चे प्रोमोज प्रेक्षक उचलून धरतील अशी आम्हाला अपेक्षा होती, पण अपेक्षेपेक्षा कैक पटीनं दोन्ही प्रोमोजचं कौतुक झालं. सिरीयल संबंधातील ज्या काही पोस्ट येत आहेत त्या कमाल आहेत. हे लोकांना हवंय. आम्ही तुमची वाट बघतोय असं काहीजण म्हणतात. आता आम्ही पुन्हा केबल घेणार असल्याचं काहींचं म्हणणं आहे. तुम्हा दोघांना आम्हाला एकत्र बघायचंच होतं अशा प्रतिक्रीया येत आहेत. या प्रतिक्रीया उत्साहवर्धक ठरत आहेत. टेलिकास्ट होण्याआधीच हा प्रतिसाद पाहून आम्हालाही जोश आलाय.

  लव्हस्टोरी एका डॅाक्टरची
  यात मी मीरा देसाई नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. ही डॅाक्टर आहे. हे या कॅरेक्टरमधील वेगळेपण आहे. डॅाक्टरच्या लव्हस्टोरीवर आधारित काही मालिका आलेल्या आहेत, पण यात दोघेही डॅाक्टर आहेत. त्यामुळं दोघांची पार्श्वभूमी काय आहे? पूर्वी नेमकं काय घडलं होतं? या सर्व गोष्टी भूतकाळात नेत दोघांचा फ्लॅशबॅकही दाखवणार आहेत. त्यामुळं आम्ही थोडे तरुण भूमिकेतही समोर येणार आहोत. ती एक गंमत पहायला मिळणार आहे. हे दोन्ही रंग कशाप्रकारे समोर येतात याबाबत आम्हालाही उत्सुकता आहे. हेच या कॅरेक्टरमधील वेगळेपण आहे. मी नेहमी लिमिटेड एपिसोडचीच सिरीयल करते, पण ही मोठ्या लांबीची मालिका असेल. आतापर्यंत सिनेमाचं शूटिंग आणि नाटकांचे प्रयोग असायचे त्यामुळं आधी मी लिमिटेड सिरीजच स्वीकारायचे. पहिल्यांदाच मी अशी मोठी सिरीयल करतेय. ‘अग्निहोत्र’ सारख्या सिरीयलमध्ये मी पहिल्या दिवसापासून नव्हते. मी उशीरा जॅाईन झाले आणि शेवटपर्यंत राहिले. आता ही सिरियल मला घेऊन सुरू होईल आणि माझ्या कॅरेक्टरसोबत संपेल. त्यामुळं निश्चितच हे वेगळेपण आहे.

  यापूर्वीही साकारली डॅाक्टर
  यापूर्वी विक्रम गोखलेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘आघात’ चित्रपटामध्येही मी डॅाक्टर साकारली आहे, पण ती वेगळी होती. ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतील डॅाक्टर मीरा त्यापेक्षा नक्कीच वेगळी असेल. रोमँटिक गोष्ट असल्यानं हिचंही प्रेमळ रूप पहायला मिळेल. हि प्रोफेशनली जरी डॅाक्टर असली तरी ती मुलगी आहे, बहिण आहे, घरातील कर्ती, प्रेयेसी अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्येही समोर येणार आहे. या मालिकेला बऱ्याच गोष्टींचा फायदाही होणार आहे. या मालिकेतील अॅक्टर्सचाच नव्हे, तर लेखक-दिग्दर्शकांचाही वेगळा चाहता वर्ग आहे. रोहिणीताई लेखन करत असून, मुग्धा डायलॅाग्ज लिहितेय. रोहिणीताईंच्या शोजचे वेगळे चाहते आहेत. केदार वैद्य या मालिकेचं दिग्दर्शन करतोय. त्यानं आतापर्यंत काही महत्त्वपूर्ण आणि गाजलेल्या मालिका केल्या आहेत. आयरीश प्रोडक्शन आणि सोनी मराठीचे काही चाहते असतील. त्यामुळं या सर्वांचा मिळून एक प्रेक्षकवर्ग तयार होईल, जो या मालिकेवर प्रेम करेल.

  पुन्हा उमेशसोबत काम करण्याचा योग
  उमेशसोबत काम करण्याचा एक्सपिरीयन्स नेहमीच प्लेझेंट असतो. उमेशला जराही गर्व नाही. माणूस म्हणून तो खूप छान आहे. मेहनती आणि खूप चांगला सहकलाकार आहे. त्यामुळं त्याच्यासोबत काम करताना खूप छान अनुभव मिळतो. आम्ही बऱ्याचदा एकत्र काहीतरी करूया असं म्हणायचो, पण जमत नव्हतं. एखादं नाटक तरी एकत्र करू असं म्हणायचो, पण या मालिकेनं तो योग जुळून आणला. एखादी मालिका आम्हा दोघांना एकत्र आणेल हे दोघांनाही कधी वाटलं नव्हतं. अचानक अशी संधी समोर आल्यानं आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत होतो. अबीर आणि राधा या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. प्रेक्षकांनी आता ती नावं लिहिल्यानं आमच्याही लक्षात आलं. त्या मालिकेत एक छोटासा रोमँटिक ट्रॅक होता. त्यामुळं आमची जोडी लोकांना पुन्हा एकदा पहायची होती. यात त्यांना आमची पूर्ण लव्हस्टोरी पहायला मिळणार आहे.

  प्रेक्षकांना वेगळं सांगायची गरज नाही
  ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेच्या प्रोमोजना मिळालेल्या प्रतिसादानंतर प्रेक्षकांना काही वेगळं आवाहन वगैरे करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. त्यांनी दिलेल्या प्रतिसादानंतर आता आमची जबाबदारी वाढली आहे. कारण त्यांनी इतका उत्साह दाखवला आणि इतक्या पॅशनेटली ते शो बघायला तयार आहेत. त्यांचा उत्साह कायम टिकून राहील असं प्रोडक्ट आम्हाला द्यायचं आहे. कारण डेली सोपमध्ये तो एक मोठा टास्क असतो. चित्रपट किंवा नाटकात एकदा ते क्रिएशन झालं की त्याच्या पुन:प्रत्ययाचा आनंद आपण देत असतो. पण इथं रोज काहीतरी नवीन घडतं. आता सिच्युएशन्समुळे, वेळेच्या बंधनांमुळे, आजारपणांमुळे बऱ्याच समस्या येत आहेत. या सर्वांना सामोरं जात चांगलं प्रोडक्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आहे. जेवढं प्रेम करताय तेवढं प्रेम तुम्ही करत रहा आणि आम्ही तुमचं छान मनोरंजन करत राहू इतकंच सांगेन