…तरच पायउतार होईन ,अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी मांडली भूमिका!

नाट्य परिषदेचे सहकार्यवाह सतीश लोटके यांनी अध्यक्षांविरोधात न्यायालयीन खटला दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाची बाजूही महत्त्वाची ठरणार आहे.

  संजय घावरे

  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत़. नाट्य परिषदेची  निवडणूक नसताना काहीसा अजब प्रकार घडल्याने सध्या नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये धुसमूस सुरू आहे. कार्यकारीणीतीलच काही सदस्यांनी अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. त्यांनी अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे यासाठी दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे. मीडियामध्ये मागील काही दिवसांपासून याबाबत बरीच उलटसुलट चर्चा सुरू असल्याने प्रसाद कांबळी यांनी यशवंत नाट्यगृहात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे.

  आजवर नाट्य संमेलन किंवा निवडणूकांवेळी चर्चेत असणारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सध्या अंतर्गत राजकारणाचा बळी ठरत आहे. प्रसाद कांबळी यांना अध्यक्षपदासाठी निवडून देणा-या कार्यकारीणीतील ६४ सभासदांपैकी ३६ जण नाराज झाले असून, त्यांनी अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा आग्रह धरला आहे. यासाठी ३६ जणांच्या एका पत्रावर स्वाक्षर्या घेण्यात आल्या आहेत़. त्या पत्राला उत्तर देण्यासाठी प्रसाद कांबळी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आजवर केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. आपण कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केलेला नसल्याचे स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या काळात नाट्य परिषदेच्या माध्यमातून रंगकर्मींपर्यंत पोहोचवलेल्या मदतीबाबतही विस्तृतपणे सांगितल़े.

  कांबळी म्हणाले की, आजवर आमच्या कार्यकारिणीने घटनेच्या चौकटीत राहून सर्व कामं केली आहेत़. कोणतेही घटनाबाह्य काम केलेले नाही. त्यामुळे कोणालाही बोट दाखवायला जागा नाही. आता जे सदस्य आमच्या विरोधात कुभांड रचत आहेत़ त्यांचा माझ्या कार्यशैलीवर आक्षेप असू शकेल़, पण मी कोणत्याही प्रकारचा घोटाळा केलेला नाही. त्यांनी जर तो सिद्ध केला तर मी पायउतार व्हायला तयार आहे. आम्ही आमच्या कार्यकाळात नाट्य परिषदेसोबतच नाट्यसंकुलासाठीही काम केलेले आहे. जे सदस्य विरोधात उभे आहेत़ त्यांचा थोडा गैरसमज झालेला आहे. काही जणांनी दाबावाखाली येऊन स्वाक्ष-या केल्या असतील, पण ज्यांना आपली चूक उमजत आहे ते आमच्याशी संपर्क साधून आम्हाला सहकार्य करायला तयार आहेत़. कोणी आपल्या वैयक्तीक फायद्यासाठी नाट्य परिषदेच्या पदाचा गैरवापर करून काही करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही.

  नाट्य परिषदेचे सहकार्यवाह सतीश लोटके यांनी अध्यक्षांविरोधात न्यायालयीन खटला दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाची बाजूही महत्त्वाची ठरणार आहे. लोटके यांनी एकदा मध्यरात्री मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत नाट्य परिषदेच्या कार्यालयात वास्तव्य करण्यासाठी वॉचमनकडे चावी मागितली. त्यावेळी चावी न दिल्याने अहंकार दुखावलेल्या लोटके यांनी आपल्या विरोधात अशा प्रकारचे पाऊल उचलत इतर सदस्यांनाही सोबत घेतल्याचेही कांबळी यांचे म्हणणे आहे.

  नाट्य संमेलनाला मुहूर्त नाही

  कोरोनाचा कहर काही अंशी कमी झाला असला तरी पूर्णपणे ओसरला नसल्याने तूर्तास तरी नाट्य संमेलन घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत प्रसाद कांबळी यांनी दिले आहेत़. याबाबत तहहयात विश्वस्त शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर नाट्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आता पुढील सूचना मिळाल्यानंतर संरकारच्या आदेशाचे पालन करून नाट्य संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे.