अक्षयच्या ‘पृथ्वीराज’ला करणीसेनेचा विरोध, केल्या ‘या’ दोन प्रमुख मागण्या!

सिनेमाच्या नावातही पृथ्वीराज चौहान यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख केला जावा आणि त्यांचा आदर करण्यात यावा, असे सुरजीत सिंह यांनी म्हटले आहे.

    करणी सेना गतकाळात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांविरोधात रस्त्यावर उतरलेली  आहे. पद्मावत, मणिकर्णिका या सिनेमांविरोधात करणी सेनेने दंड थोपटले होते. आता बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा करणी सेनेच्या निशाण्यावर आला आहे. या सिनेमाचे नाव आहे, ‘पृथ्वीराज’. अक्षय कुमारच्या या आगामी सिनेमाच्या नावाला करणी सेनेने विरोध करत नाव बदलण्याची मागणी केली आहे.

    पृथ्वीराज चौहान एक महान योद्धा होते. अक्षय कुमारचा आगामी सिनेमा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. मग सिनेमाचे नाव ‘पृथ्वीराज’ कसे? सिनेमाच्या नावातही पृथ्वीराज चौहान यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख केला जावा आणि त्यांचा आदर करण्यात यावा, असे सुरजीत सिंह यांनी म्हटले आहे.

    इतकेच नाही करणी सेनेने या चित्रपटासाठी आणखीही एक अट ठेवली आहे. अक्षयचा हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी करणी सेनेसाठी या सिनेमाचे स्क्रीनिंग करण्यात यावे, अशी अटही त्यांनी ठेवली आहे. मेकर्सनी आमचा सल्ला मानला नाही तर त्यांना वाईट परिणामांचा सामना करावा लागेल.

    अक्षय कुमारने २०१९ साली त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सिनेमाची घोषणा केली होती. ‘पृथ्वीराज’मध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री मानुषी छिल्लर झळकणार आहे.