‘या’ मराठी अभिनेत्यामुळे एकता कपूर बनली प्रसिद्ध निर्माती, आजही मानते त्यांचे आभार!

एकतानं १९९५  साली ‘पडोसन’ या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेला फारसं यश मिळालं नाही. पण मग तिनं ‘कॅप्टन हाऊस’ आणि ‘मानो या ना मानो’ अशा आणखी दोन मालिका तयार केल्या. या दोन्ही मालिका चालल्या नाहीत.

    निर्माती एकता कपूरने आजवर अनेक नवोदीत कलाकारांची करिअर घडवली आहेत. त्यामुळं तिला टीव्ही इंडस्ट्रीमधील ‘गॉडमदर’ असंही म्हटलं जातं. एकता आज यशाच्या शिखरावर आहे. परंतु याची सुरुवात झाली होती ती एका मराठी अभिनेत्यामुळं. या अभिनेत्यामुळंच एकताला निर्माती म्हणून ओळख मिळाली.

    एकतानं १९९५  साली ‘पडोसन’ या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेला फारसं यश मिळालं नाही. पण मग तिनं ‘कॅप्टन हाऊस’ आणि ‘मानो या ना मानो’ अशा आणखी दोन मालिका तयार केल्या. या दोन्ही मालिका चालल्या नाहीत. सलग दोन फ्लॉप मालिका दिल्यामुळं कोणताच निर्माता एकतासाठी पैसे गुंतवायला तयार नव्हता. यावेळी वडील जितेंद्र यांनी देखील निर्मितीचा नाद सोड आणि अभिनय वगैरे कर असा सल्ला तिला दिला होता. त्यानंतर एकताने १९९५ मध्येच एक विनोदी मालिका तयार करण्याचा निर्णय घेतला. अन त्यावेळी मराठी सुपरस्टार अशोक सराफ तिच्या मदतीला धावून आले.

    एकतानं ‘हम पांच’ नावाची मालिका तयार केली. या मालिकेत अशोक सराफ यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. पाच मुली, अन् पाचही वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या. अन् त्यामुळं वैतागलेला बाप असं या मालिकेचं स्वरुप होतं. अशोक सराफ यांची लोकप्रियता आणि धम्माल विनोद करण्याची शैली यामुळं ‘हम पांच’ सुपरहिट ठरली. अनेकदा मालिकेतील संभाषण हे सुमार दर्जाचं असायचं परंतु अशोक सराफ यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याचं विनोदात रुपांतर केलं. असं स्वत: एकता कपूरनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

    हम पांच मालिका गाजल्यामुळं एकताकडे पुरेसे पैसे आले. दिग्दर्शक म्हणून तिच्यावर पैसे गुंतवण्यास निर्माते तयार झाले. त्यानंतर एकताने एकामागे एक सुपरहिट मालिका दिल्या. ‘क्योकी सास भी कभी बहु थी’, कुसुम, कहानी घर घर की, कसौटी जिंदगी की, बडे अच्छे लगते है यांसारख्या एकामागून एक सलग सुपरहिट मालिकांची निर्मिती केली. अन् आज ती टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात अनुभवी आणि यशस्वी निर्माती म्हणून ओळखली जाते.