alia-bhatt

आलिया इथवरच थांबली नसून, आता ती हॅालिवूडकरांच्या पंक्तीत विराजमान झाल्याची बातमी आली आहे. आलियानं कोणताही हॅालिवूडपट वगैरे साईन केलेला नाही.

    सिनेसृष्टीत दाखल झाल्यापासून एक-एक पायरी चढत आलिया भट्टनं स्वत:ला सिद्ध केलं आहे. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर तिनं महेश भट्टची मुलगी हा स्टॅम्प पुसण्यात यश मिळवलं आहे. सुरुवातीला तिला आपल्या वडीलांच्या नावाचा फायदा झाला, पण त्यानंतर आज आलियानं आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच बळावर संजय लीला भन्साळींसारख्या नावाजलेल्या फिल्ममेकरच्या ‘गंगूबाई काठीयावाडी’ या महत्त्वाच्या चित्रपटात तिनं टायटल रोल मिळवला आहे.

    आलिया इथवरच थांबली नसून, आता ती हॅालिवूडकरांच्या पंक्तीत विराजमान झाल्याची बातमी आली आहे. आलियानं कोणताही हॅालिवूडपट वगैरे साईन केलेला नसून, डब्ल्यूएमई या इंटरनॅशनल टॅलेंट एजन्सीनं आलियाला करारबद्ध केलं आहे. डब्ल्यूएमईसाठी करारबद्ध होत आलियानं आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. यामुळं केवळ तिच्या अभिनयाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होणार नसून, हॅालिवूडच्या दिग्दर्शकांचंही ती लक्ष वेधून घेणार आहे.

    कारण डब्ल्यूएमई ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील आघाडीची टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी आहे. गॅल गॅडोट, एम्मा स्टोन, आॅप्रा विन्फ्रे यांसारखे हॅालिवूडमधील आघाडीचे चेहरे या एजन्सीचं प्रतिनिधीत्व करतात. याबाबतची उत्सुकता आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आलियानं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही गोड बातमी दिली आहे. तिनं केवळ ‘ये’ हे कॅप्शन दिलं आहे.