alok rajwade

राष्ट्रीय पारितोषिकावर आपली मोहोर उमटवत ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या सुवर्ण कमळ पुरस्कारावर आपलं नाव कोरणारा ‘कासव’(Kasav) हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आलोक राजवाडे (Alok Rajwade Interview)या तरुण अभिनेता-दिग्दर्शकानं या चित्रपटात साकारलेल्या मानवचं खूप कौतुक झालं आहे. ‘कासव’च्या प्रदर्शनाचं औचित्य साधत आलोकनं ‘नवराष्ट्र’शी विशेष संवाद साधला.

  दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कासव’ची निर्मिती भावे-सुकथनकर यांनी डॉ. मोहन आगाशे यांच्या साथीनं विचित्र निर्मिती या होम प्रोडक्शन हाऊसमध्ये केली आहे. आता हा चित्रपट सोनी लिव्हवर प्रदर्शित होण्याबाबत आलोक म्हणाला की, ‘कासव’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये लिमिटेड रिलीज झाला होता. पुण्यातील सिटीप्राईड कोथरूडमध्ये बरेच दिवस होता, पण संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला नव्हता. आता हा चित्रपट सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार असल्याचा आनंद आहे. ओटीटीवर रिलीज होण्याचा फायदा असा आहे की या माध्यमातून ‘कासव’सारखा खऱ्या अर्थानं आशयघन असलेला चित्रपट सर्वदूर पोहोचणार आहे. आता तो कोणत्याही जागेत बंदिस्त राहणार नाही. त्यामुळं जगाच्या पाठीवर कुठंही पाहिला जाऊ शकतो. ओटीटीमुळं ‘कासव’ पुण्याबाहेर थेट सातासमुद्रापार जाणार असून, कोणालाही बघता येईल, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा भाग आहे. सुमित्रा भावे म्हणजेच आम्हा सर्वांच्या सुमित्रामावशी आणि सुनीलसरांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. आज मावशी आपल्यात नाहीत. त्यामुळंसुद्धा या चित्रपटाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. मावशींच्या पश्चात हा चित्रपट ओटीटीवर येणार असून, प्रेक्षकांच्या प्रतिक्रीया ऐकण्यासाठी त्या आपल्यात नसल्याची मनाला चुटपूट लागली आहे.

  स्वतंत्र विचार मांडण्याचं बळ
  आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा भेटतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्याला वरवर समजते, पण जेव्हा तिच्यासोबत राहतो, तेव्हा तिच्यातील पैलू हळूहळू उलगडू लागतात. मावशींच्याबाबतीतही मी असंच म्हणेन. त्यांच्यासोबत काम करताना त्यांचा स्वभाव, काम करण्याची शैली, शिस्त पाहिल्यावर एकूणच त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप प्रभावी होतं. असंख्य तरुण दिग्दर्शकांना, कलाकारांना त्यांनी खूप प्रेरणा दिली आहे. या क्षेत्राचे काही ठोकताळे आहेत की सिनेमा असा बनवायचा असतो, अभिनेत्यांनी असं वागायचं असतं, दिग्दर्शकांनी अशा पद्धतीनं काम करायचं असतं. यामध्ये बऱ्याचदा स्वत:चा सूर हरवला जातो, पण मावशींनी सदैव स्वत:च्या टर्म्सवर, हव्या असलेल्या सिस्टिममध्ये आणि मनाला पटेल असेच चित्रपट बनवले आहेत. आपल्याला ज्या गोष्टी वाटतात त्या जशाच्या तशा पडद्यावर मांडायचं बळ मावशींनी अनेकांना दिलं आहे. बऱ्याचदा आहे त्या सरधोपट स्ट्रक्चरमध्ये मिसळून जाण्यासाठी खूप धडपड होते. त्यात आपल्याला नक्की काय वाटतं हा विचार हरवून जातो. अशा परिस्थितीत स्वत:चा स्वतंत्र विचार मांडण्याचं बळ मावशींनी दिलं आहे.

  वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी
  ‘कासव’ या चित्रपटात बऱ्याच गोष्टी आहेत, पण मानसिक आरोग्याशी निगडीत असलेला भाग मुख्य आहे. यात मी साकारलेलं मानव हे कॅरेक्टर डिप्रेशनच्या फेजमधून जात आहे. त्याचं असणं, त्याचं वाटणं आणि कासव यांची सांगड या चित्रपटात खूप सुरेख पद्धतीनं घालण्यात आली आहे. कासव हे या चित्रपटात रूपक म्हणून घेण्यात आलं आहे. इरावती हर्षे यांनी साकारलेली जानकी एका प्रोजेक्ट संदर्भात कोकणात गेलेली असते. काही कारणांमुळं मानव तिच्याकडे राहतोय. जानकी आणि मानवचं नातं व त्या बरोबरीनं कासव हे निसर्गाचं रूप सिनेमात येतं. कासवाप्रमाणे एका बाजूला गोष्ट उलगडत जाते आणि दुसऱ्या बाजूला मानवचा ताणही कमी होऊन त्याला कुठेतरी जगण्याची सकारात्मकता सापडते असं या चित्रपटात पहायला मिळतं. आपण का जगतो आहोत हा प्रश्न बऱ्याचदा सर्वांना सतावत असतो. जगायचं असलं तरी बरेच अडथळे असतात. जगायचं असतं, पण निरुत्साह वाटत असतो. ‘कासव’ हा चित्रपट या सगळ्याकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी देतो. जगण्याकडं कसं बघता येईल हा दृष्टिकोन मुख्य आहे.

  कुठेतरी तो सांधा जोडला गेला
  अभिनेता म्हणून नेहमीच विविध भूमिका करतच असतो. त्यामुळं त्या त्या भूमिकेमध्ये तो तो भाग करणं आलंच. समाजात वावरताना अभिनेत्याच्या नजरेतून आजूबाजूला बऱ्याच गोष्टी बघत असतो. एका मर्यादेनंतर सर्वांच्या भावभावना सारख्याच असतात. त्यामुळं मानवच्या कॅरेक्टरमधलं आणि आपला कुठेतरी सांधा जोडलेला असतो. तो शोधणं आवश्यक असतं. त्यासाठी मला दिग्दर्शकांची मोलाची साथ लाभली. ‘कासव’ बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये मानवचं कॅरेक्टर घडून गेलं असं म्हणूया. त्याच्या चेहऱ्यावरील भाव, पेशन्स आणि स्तब्धता सादर करताना मनावर खूप संयम ठेवावा लागला, पण एकदा कॅरेक्टरमध्ये शिरणं जमलं की ते होऊन जातं. तसं ते झालं.

  …याचं प्रतिनिधीत्व करणारा मानव
  मानवच्या मनात दाटून आलेलं खूप आहे, पण बोलण्याचा किंवा व्यक्त होण्याचा मार्ग त्याला सापडत नाही. व्यक्त झालो तरी कशासाठी हे सगळं असं म्हणणारा हा आताच्या काळातील तरुण आहे. त्यामुळं दुर्दैवानं तो अनेकांना जवळचा वाटेल. त्याची घुसमट लोकांना आपलीशी वाटेल असं वाटतंय. घुसमट विविध कारणांमुळं होत असते. केवळ वैयक्तीक नव्हे, तर सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा बऱ्याच कारणांमुळं घुसमट होत असते. या चारही कारणांमधून होणारी जी घुसमट अनेकांना जाणवते त्याचं एका अर्थानं प्रतिनिधीत्व करणारं मानव हे कॅरेक्टर आहे.

  चित्रपट व आयुष्य भिन्न नाही
  सुमित्रामावशीसोबत दिग्दर्शन करताना सुनीलसर हे त्यांच्या सर्व चित्रपटांमधली गाणी लिहितात. ते उत्तम कवी आहेत. काही गोष्टी मावशी करतात, तर काही सुनील सर. त्यामुळं आजवर जोडी म्हणूनच त्यांचं काम सुरू होतं. आता मावशींच्या जाण्यामुळं ही जोडी तुटली आहे. दोघांचं काम वेगळं करून पहाणं तसं अवघड आहे. ‘कासव’ या चित्रपटासंदर्भात फक्त सुनील सरांबाबत बोलणं थोडं अवघड आहे. तरीही मला असं वाटतं की सुनीलसर हे माणूस म्हणून खूप रेअर आहेत. त्यांच्यासाठी चित्रपट बनवणं आणि आपलं आयुष्य या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. एखाद्या कुटुंबप्रमुखासारखे ते अत्यंत प्रेमानं अख्खा सेटअप करतात. बरीच वर्षे ते हे काम करत आहेत. त्यामुळं चित्रपटाचं युनीट कुटुंबासारखं वाटण्याचं श्रेय सुनीलसरांना जातं.

  इराताई, डॉ. मोहन आगाशे, किशोर कदम आणि ओमकार घाडी हा बालकलाकार यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. इराताईंनी साकारलेली जानकी स्वत: या अनुभवातून गेलेली आहे. त्यामुळं ती त्या चष्म्यातून मानवकडे बघतेय की, मला हा अनुभव येऊन गेलाय. त्यामुळं मानवबाबत तिला सहानुभूती आहे. मानव यातून बाहेर येईल याची तिला खात्री असते. आगाशेसर हे इराताई ज्या प्रोजेक्टवर काम करत असते त्याचे प्रमुख आहेत. निसर्गाचं संवर्धन करणारं असं हे एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. किशोरदादा हे इराताई रहात असलेल्या संपूर्ण जागेची काळजी घेणारा अतिशय स्पष्ट बोलणारा माणूस आहे. सुरुवातीला त्याच्या आणि मानवच्या नात्यात थोडा ताण पहायला मिळतो. नंतर हळूहळू दोघांचं नातं कसं फुलत जातं हा महत्त्वाचा फॅक्टर यात आहे. कुठल्याही प्रकारची बुद्धिमत्ता ही कोणाची मक्तेदारी नसते हे सांगणारी व्यक्तिरेखा ओमकारनं साकारली आहे. साध्या लोकांकडूनही आपल्याला जीवनाचं तत्त्वज्ञान समजू शकतं हे सांगणारं हे कॅरेक्टर आहे. ओमकार त्याच्या पातळीवर अनपेक्षितपणे काही महत्त्वाच्या गोष्टी बोलून जातो, ज्याचा नकळतपणे मानवला फायदा होतो.