वडिलांच्या कविता झाल्या गहाळ, घरात बदल केल्यामुळे बिग बींना झाला मोठा मनस्ताप!

नुकतंच बिग बींनी त्यांच्या घरात बदल केल्यामुळे मोठ्या मनस्तापाला समोरं जावं लागलंय. त्यांनी ते चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे.

    बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रीय असतात. अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. ते दररोज ब्लॉग सुद्धा लिहितात आणि त्यांच्या मनातल्या व्यथा लोकांसोबत शेअर करत असतात. नुकतंच बिग बींनी त्यांच्या घरात बदल केल्यामुळे मोठ्या मनस्तापाला समोरं जावं लागलंय. त्यांनी ते चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे.

    काही दिवसांपुर्वीच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बंगल्याचं रेनोवेशन केलं होतं. यात त्यांचे वडिल हरीवंश राय बच्चन यांनी स्वतः लिहिलेल्या काही कविता मिळत नसल्यानं बिग बीं भडकले आहेत. बिग बींचे वडिल हरीवंश राय बच्चन हे महान हिंदी कव‍ी होते. त्यांनी लिहिलेल्या ‘मधुशाला’ कविता आज ही अव्वल दर्जाच्या कविता मानल्या जातात. त्यांची आठवण म्हणून बिग बींनी या कविता घरात जपून ठेवल्या होत्या. पण आता या कविता त्यांना घरात सापडत नाहीत. यामुळे नाराज होऊन बिग बींनी एक ब्लॉग लिहून आपला राग व्यक्त केलाय.

    बिग बी लिहतात,

    “वडिलांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये कित्येक कवितांचे संदर्भ दिले आहेत. वडिलांनी स्वतःच्या हाताने लिहिलेल्या त्या कविता आता मी शोधतोय तर सध्या कुठेच सापडत नाहीयेत…गेल्या काही दिवसात घरात काही बदल केले होते, त्यामुळे आता वडिलांनी लिहिलेल्या कविता सापडत नाहीत, याचा विचार करून खूप राग येतोय…हा निव्वळ निष्काळजीपणा आहे…मी थोडी सुद्धा कल्पना नव्हती की घरात केलेल्या बदलांमुळे इतका मनस्ताप होईल…तुम्ही एखादी वस्तू जपून एका ठिकाणी ठेवता आणि जेव्हा तुम्ही ती शोधायला जाता तेव्हा ती सापडत नाही किंवा मग तुम्ही विसरता.”