‘करोडपती’च्या मंचावर बच्चन-खेडेकरांची भेट!

योगायोग म्हणजे नुकतीच खेडेकरांनी बच्चन यांची 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर भेट घेतली. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं चित्रीकरण मुंबई फिल्मसिटीमध्ये सुरू आहे.

    हिंदीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या अनोख्या सूत्रसंचालनाच्या शैलीमुळं गाजलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचं मराठी व्हर्जन असलेला ‘कोण होणार करोडपती’ हा सोनी मराठीवर प्रसारीत होणारा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा शो सुरू होण्यापूर्वी ‘नवराष्ट्र’नं घेतलेल्या एक्सक्लुझीव्ह मुलाखतीत बिग बींना मराठी करोडपतीच्या हॅाट सीटवर बोलावण्याबाबत सचिन खेडेकरांना प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांनी ही संकल्पना खूप छान असल्याचं म्हणत कौतुक केलं होतं.

    योगायोग म्हणजे नुकतीच खेडेकरांनी बच्चन यांची ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर भेट घेतली. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं चित्रीकरण मुंबई फिल्मसिटीमध्ये सुरू आहे. ‘कोण होणार करोडपती’ आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमांचं चित्रीकरण शेजारी-शेजारी असलेल्या सेट्सवर सुरू आहे. या निमित्तानं खेडेकरांना बच्चन यांना भेटण्याची संधी मिळाली.

    खेडेकर ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर जाऊन बच्चन यांना भेटले. यावेळी अमिताभ यांनी ‘कोण होणार करोडपती’चं भरभरून कौतुक केलं आणि हा कार्यक्रम पाहिल्याचा आवर्जून उल्लेखही केला. या भेटीनंतर एखाद्या दिवशी खरोखरच बच्चन ‘कोण होणार करोडपती’मध्ये हॅाटसीटवर बसलेले दिसले तर नवल वाटणार नाही.