Apna Time Bhi Aayega Tanaaz Irani will play the character of the villain for the first time
‘अपना टाइम भी आएगा’ मध्ये 'ही' अभिनेत्री प्रथमच रंगविणार खलनायिकेची व्यक्तिरेखा!

मुंबई : आगामी ऑक्टोबर महिन्यात आपल्याकडील प्रचंड साठ्यातून प्रेक्षकांसाठी आल्हाददायक आणि उत्साहजनक कार्यक्रम प्रसारित करण्याचा विचार ‘झी टीव्ही’ Zee Tv ही वाहिनी करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जयपूरमधील एका श्रीमंत घरात मुख्य नोकर म्हणून काम करणाऱ्या माणसाच्या एका मुलीची कथा या वाहिनीवर लवकरच सादर केली जाणार आहे.

ही मुलगी आपल्या वडिलांच्या या सामाजिक स्थानामुळे आलेली बंधने मानण्यास नकार देत सामाजिक स्तरावर वर जाण्यासाठी प्रयत्न करते. आपल्या या प्रयत्नात ती आपले नशीब आपल्या हातांनी घडविते आणि समाजातील प्रतिष्ठित वर्तुळात सन्मानाने प्रवेश मिळविते आणि तिच्या वडिलांनी तिला प्रेमाने दिलेले ‘राणी’ हे नाव सार्थ करून दाखविते.

नियतीशी संघर्ष करणाऱ्या या मुलीची ही कथा भारतीय समाजात खोलवर रुजलेल्या जातीपातीच्या व्यवस्थेलाच नाकारते आणि या व्यवस्थेनुसार ठरविण्यात आलेल्या प्रत्येकाच्या सामाजिक स्थानाच्या (औकात) कल्पनेला आव्हान देते. कारण या समाजमान्य व्यवस्थेमुळे कथित कनिष्ठ जातीतील किंवा स्थानावरील व्यक्तींना आपल्या नशिबात बदल करण्याचा आणि आपल्या ठरलेल्या स्थानापासून वर उठण्याचा मार्गच बंद होतो. या मालिकेचे ‘अपना टाइम भी आएगा’ (Apna Time Bhi Aayega) हे शीर्षक तिच्या संकल्पनेचे सार यथार्थपणे प्रतीत करणारे असून त्यात नामवंत अभिनेत्री तनाझ इराणी (Tanaz Irani) ही महाराणी राजेश्वरी सिंह रावत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. जयपूरच्या प्रतिष्ठित राजावत खानदानाची ही महाराणी आहे. तनाझने आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या असल्या, तरी आपल्या उच्च खानदानाचा गर्व असलेल्या एका प्रतिष्ठित महिलेची भूमिका ती प्रथमच साकारणार आहे.

या व्यक्तिरेखेबद्दल तनाझ इराणी म्हणाली, “या भूमिकेला असलेल्या भव्यदिव्यतेचा माझ्यावर प्रभाव पडला. मी रंगभूमीवर खलप्रवृत्तीच्या अनेक भूमिका साकारल्या असल्या, तरी टीव्हीवर अशा प्रकारची भूमिका मी प्रथमच साकारणार आहे. मी आजवर बर्‍्याच आनंदी, स्वच्छंदी आणि बडबड्या स्वभावाच्या मुलीच्या भूमिका उभ्या केल्या असल्या, तरी आपल्या भूमिकेसाठी प्रयोग करण्याची संधी मिळत असेल, तर त्याचं समाधान काही वेगळंच असतं. महाराणी राजेश्वरी सिंह रावत हिला सहजासहजी कोणत्याही गोष्टीसाठी राजी करता येत नाही. तिला आपल्या सामाजिक दर्जाचं खूपच भान असतं आणि त्यावर तिचा विशेष कटाक्ष असतो. आपण राजघराण्यातील असल्याचा तिला प्रचंड गर्व असतो.”

अर्थात यात तनाझ खलनायिकेची भूमिका साकारीत असली, तरी तिची वेशभूषा ही साचेबध्द खलनायिकेसारखी नाही. या व्यक्तिरेखेच्या लूकबद्दल तनाझने सांगितले, “महाराणी राजेश्वरी सिंह रावत हिच्यादृष्टीने आलिशान, भव्यता हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग असतो. तिच्या व्यक्तिरेखेत खल प्रवृत्तीच्या छटा असल्या, तरी मी नेहमीच्या खलनायिकांसारखी अगदी बारीक रेषांसारख्या कोरलेल्या भुवया, लांब रंगविलेली नखे आणि भडक मेक-अप केलेली स्त्री दिसणार नाही. मी त्यात शाही पेहरावात दिसणार असून मला तसे कपडे घालणं अतिशय आवडतं. प्रेक्षकांनी मला अशा अवतारात पूर्वी कधीच पाहिलेलं नाही. त्यामुळे माझ्या चाहत्यांसाठी ही एक सुंदर नेत्रपर्वणी असेल आणि त्यांना मला अशा आलिशान, उंची पेहरावात पाहायला नक्कीच आवडेल. त्यातील माझ्या साड्या या बहुतांशी रेशमी, ऑरगांझा या वस्त्रांपासून केलेल्या असून त्याला जड कुंदन दागिन्यांची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे माझा अवतार अधिक उंची आणि शाही दिसेल.”

२० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.०० वाजता तनाझ इराणीला महाराणी राजेश्वरी सिंह रावतच्या भूमिकेत पाहा ‘अपना टाइम भी आएगा’मध्ये फक्त ‘झी टीव्ही’वर!