…म्हणून अशोक सराफ शर्टाचे पहिले बटण उघडे ठेवायचे!

त्यांना अनेक चित्रपटांमध्ये शर्टाचे पहिले बटण कायम उघडे का असायचे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले होते.

    आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृषटीत राज्य करणाऱ्या आणि आपल्या भन्नाट विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक सराफ यांचा आज ४ जूनला वाढदिवस. ते मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. अशोक सराफ यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. पण यातही त्यांनी आपली स्वत:ची शैली निर्माण केली.  अनेक चित्रपटांमध्ये त्यांचे शर्टाचे पहिले बटण कायम उघडे असायचे. या मागचे कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशोक सराफ यांनी स्वत: एका मुलाखतीत यामागचे कारण सांगितले आहे.

    त्यांना अनेक चित्रपटांमध्ये शर्टाचे पहिले बटण कायम उघडे का असायचे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले होते. अशोक सराफ म्हणालेले, ‘शर्टाचे पहिले बटण बंद केले तर सगळा अभिनय माझ्या गळ्याशी यायचा. म्हणून मी उघडं ठेवायचो. त्यानंतर काही वर्षे मी स्टाइल म्हणून ते ठेवलं होते आणि त्यावेळी ती स्टाइल देखील होती’ असे मजेशीर उत्तर अशोक मामांनी दिले होते.

    मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशोक सराफ हे विनोदाचे बादशाह म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘गंमत जंमत’, ‘फेका फेकी’, ‘आयत्या घरात घरोबा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून आपल्या अफलातून अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही कामं केली. मराठीमध्ये विनोदी अभिनेता म्हणून ओळख असणारे मामा हिंदी चित्रपटात मात्र अनेकदा खलनायक साकारताना दिसले.