…म्हणून स्विकारली जेडी या खलनायकाची भूमिका, अतुल परचुरेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट!

प्रेक्षकांना जेडीचा राग येईल इतकी चोख भूमिका अभिनेता अतुल परचुरे हे निभावत आहेत. या भूमिकेसाठी त्यांना प्रेक्षक चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया मिळत आहेत.

    सध्या टेलिव्हिजनवरील खलनायकांमध्ये प्रेक्षकांच्या मनात माझा होशील ना या मालिकेतील ‘जेडी’ या खलनायकाने घर केलं आहे. खरोखर प्रेक्षकांना जेडीचा राग येईल इतकी चोख भूमिका अभिनेता अतुल परचुरे हे निभावत आहेत. या भूमिकेसाठी त्यांना प्रेक्षक चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया मिळत आहेत.

    या भूमिकेतबद्दल बोलताना अतुल परचुरे म्हणाले, “कधी कधी आपण फार विचार न करता एखाद्या भूमिकेला हो म्हणतो तसं काहीसं या जेडीबाबत झालं. मला आयुष्यात पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेसाठी विचारणा केली होती. त्यामुळे प्रयत्न करून बघू या असा विचार केला. जेडी साकारतानाचा अनुभव फारच मनोरंजक आणि आव्हानात्मक आहे. काम आवडतंय अशा प्रतिक्रियांबरोबरच प्रेक्षकांना जेडीचा रागही येतोय. हेच त्या भूमिकेचा यश असावं.”

    जेडीच्या भूमिकेसाठी केलेल्या तयारी बद्दल बोलताना ते म्हणाले, “वेगवेगळ्या मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्यानं चेहरेपट्टी प्रेक्षकांना माहीत झालं आहे. त्यामुळे जेडी सगळ्यांपेक्षा वेगळा वाटावा यासाठी मी प्रयत्न करतोय. सूडाची भावना माझ्यात दिसणं आवश्यक होतं. तसंच महाराष्ट्र सोडून २० वर्षं अमराठी लोकांबरोबर राहिल्यानं त्याची भाषा बिघडली असावी. या दोन गोष्टी डोक्यात ठेवून काम करतोय.”