चहावाल्या बाळूच्या नाटकाचं चांगभलं!

नाट्यकर्मींचा लाडका शिवाजी नाट्यगृहामधील बाळू चहावाला आहे, जो नाटयगृहं बंद असल्यानं मायानगरीतून थेट गावाकडं फेकला गेला आहे.

  कोणतं नाटक चालणार, रसिकांना आवडणार, हाऊसफुल्ल होणार हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. तो रसिकांचा कौल असतो. रसिकांना कधी, काय आवडेल हे लेखकालाही सांगता येत नाही की, नाटकात जीव ओतण्यासाठी धडपडणाऱ्या दिग्दर्शक आणि कलांकारांनाही नाही… पण एक व्यक्ती मात्र कोणतं नाटक चालणार आणि कोणतं जाणार, कोणतं गर्दी खेचणार आणि कोणतं खुर्च्या रिकामी ठेवणार हे अचूकपणे सांगते. या व्यक्तीचं नाव आहे बाळू चहावाला… होय, हा तोच नाट्यकर्मींचा लाडका शिवाजी नाट्यगृहामधील बाळू चहावाला आहे, जो नाटयगृहं बंद असल्यानं मायानगरीतून थेट गावाकडं फेकला गेला आहे.

  पहिला लॅाकडाऊन लागल्याबरोबर बाळू वासकरनं थेट गावची वाट धरत कोल्हापूर गाठलं. मागील दीड वर्षांपासून बाळू कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील आपल्या बोळावी या मूळ गावी आहे. शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये प्रयोग असल्यावर नाट्यकर्मींना चहा देणं हे बाळूचं काम. या बदल्यात नाट्यकर्मी बाळूची प्रतिक्रिया जाणून घ्यायचे. आपलं नाटक कसं झालंय याची पावती बाळूकडून घ्यायचे. कारण आजवर बाळूचं प्रेडिक्शन कधीही चुकलेलं नाही. प्रभाकर पणशीकर – डॅा. श्रीराम लागूंपासून आजच्या काळातील प्रशांत दामले – भरत जाधवपर्यंत सर्वच नाट्यकर्मींनी आपल्या नव्या कोऱ्या नाटकाचा रिव्ह्यू बाळूकडून घेतलेला आहे. एखादं नाटक चालणार की नाही हे कधी पहिल्याच प्रयोगाला, तर कधी पाच-सहा प्रयोगांनंतर सांगणारा बाळू आज मुंबईतून गायब झाला आहे. बाळूसारखे असंख्य बॅक स्टेज आर्टिस्ट कुठे गेले ते कोणलाच समजलेलं नाही. याच बाळूनं ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह संवाद साधत आपली वर्तमान परिस्थिती कथन केली.

  लॅाकडाऊनमुळं हाताला काम नाही, डोक्याला खुराक नाही आणि खिशात पैसे नाहीत अशा अवस्थेत मुंबईत राहून करणार तरी काय? हा बाळूला पडलेला प्रश्न पडद्यामागं राहून लहान सहान कामं करणाऱ्या अनेकांना सतावू लागला. आता आपल्याला मुंबई परवडणारी नसल्याचं जाणवलं आणि त्यांनी गावची वाट धरली. याबाबत बाळू म्हणाला की, परिस्थिती अत्यंत वाईट आणि हालाखीची आहे. दिवसेंदिवस अधिकच बिकट बनत चालली आहे. त्यामुळं कसं जगायचं हा सवाल आहे. मागील ४० वर्षांपासून मी शिवाजी मंदिरमध्ये कलाकार-तंत्रज्ञांना चहा देण्याचं काम करतोय. मुंबई सोडली तो दिवस आजही लख्खपणे आठवतो आहे. १४ मार्च २०२० या दिवशी शनिवार होता. प्रशांत दामले यांचं ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग होणार होता. सरकारी आदेश आला आणि दामलेंच्या नाटकाचा शो रद्द झाला. त्यानंतर मी लगेचच गावी येण्याचा निर्णय घेतला. कारण मुंबईत राहून करायचं काय? आणि खायचं काय? हा यक्षप्रश्न डोळ्यांसमोर उभा होता.

  कलाकारांचा आर्थिक मदतीचा हात
  गावी घरीच बसून आहे. आमची बऱ्यापैकी शेती आहे, पण शेतीची कामं जमत नाहीत. इतर काही ना काही लहान-सहान कामं करत असतो. मुलगा अनिकेत बारावी शिकलेला आहे. तो नोकरीला लागणार तेव्हाच लॅाकडाऊन झाला. आज आमच्या कुटुंबाकडे अर्थार्जनाचं साधन नाही. मला कोणाकडे पैसे मागायला आवडत नाही. ते माझ्या नीतीमूल्यांना पटतही नाही. आजवर मेहनतीनं कमवलं, पण आज कोरोना आणि लॅाकडाऊनमुळं माझ्यासारखे अनेकजण देशोधडीला लागले आहेत. सोनाली कुलकर्णी (मोठी), प्रशांत दामले, निर्माते दिलीप जाधव यांनी मी गावी असल्याचं समजल्यावर मोठ्या मनातं न सांगता पैसे पाठवले. मागच्या वर्षी नाट्य परिषदेनंही आर्थिक मदत केली. भरत जाधव, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे, अंकुश चौधरी यांनी फोन करून आपुलकीनं विचारपूस केली. काही मदत हवी असल्यास केव्हाही रात्री-अपरात्री नि:संकोचपणे सांगा हे त्यांचं आपुलकीचं बोलणं खूप धीर देऊन गेलं. कितीही वाईट दिवस आले तरी स्वत:हून कोणापुढं हात पसरण्यातला माझा पिंड नसल्यानं त्यांच्याकडे पैसे मागितले नाहीत. वरचेवर आमचं बोलणं सुरू असतं. त्या सर्वांनी मला मुंबईला बोलावलं आहे.

  नानाशेठच्या रूपात देव धावून आला
  शिवाजी मंदिरमधील कॅन्टिनचे मालक नाना काळोखे यांनी लॅाकडाऊन सुरू झाल्यापासून अर्धा पगार दिल्यानं पोटाला दोन वेळचं अन्न तरी खायला मिळत आहे. नाहीतर मा

  झ्यासारख्याची खूप वाईट अवस्था झाली असती. आज दीड वर्षे होत आलं नानाशेठ घरी बसून आम्हा सहा कामगारांना अर्धा पगार देत आहेत. हे त्यांच्या मनाचं मोठेपण आहे. कारण अजून हा कालावधी किती वाढणार आहे हे कोणीही सांगू शकत नाही. आज कोणताही मालक अशा प्रकारे पगार देणार नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये सिक्युरीटीचं काम करण्याची आॅफर होती, पण नानाशेठ म्हणाले की, सध्या कुठे काही काम वगैरे बघू नकोस. थिएटर सुरू झाल्यावर एकदमच ये, पण त्यानंतर सुट्टी मागू नकोस. मला जमेल तोपर्यंत पैसे पाठवतो. काही काळजी करू नकोस. नानाशेठचे हे धीराचे बोल मनाला दिलासा देऊन गेले.

  इतरांची अवस्था खूपच बिकट
  प्रेमळ स्वभाव, कलाकारांशी असलेलं जिव्हाळयाचं नातं, प्रामाणिकपणा आणि पूर्व पुण्याई यामुळं आजवर तग धरून आहे, पण आज याच नाटकाची अवस्था बिकट झाल्याचं पहावत नाही. मध्यंतरी लॅाकडाऊन उठल्यावर नाटक पुन्हा सुरू झालं, पण परत कोरोनाची दुसरी लाट आली आणि परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. पडद्यामागचे बरेच कामगार या परिस्थितीमुळं हालाखीचं जीवन जगत आहेत. मी गावी असल्यानं सर्वांशी संपर्क तुटला आहे, पण कधीतरी कोणाकडून तरी सर्वांची माहिती मिळते. काही निर्मात्यांसोबत संघटनांनी पडद्यामागच्या कलाकारांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तू दिल्या, पण त्यादेखील किती दिवस पुरणार? मलाही धान्य घेण्यासाठी फोन आले होते, पण माझ्या वाट्याचं दुसऱ्या कोणाला तरी द्या असं सांगितलं. धान्य घ्यायला मी मुंबईला येणार नाही. बिचाऱ्या एखाद्या गरीबाचं पोट भरेल.

  एक लाख रुपयांचा पुरस्कार
  कोणत्याही नाटकाचे सुरुवातीचे काही प्रयोग तालिमीप्रमाणे असतात. त्यामुळं पाच-सहा प्रयोगांनंतर जे खरं आहे ते मी सांगतो. माझ्या आयुष्यातील कलाकारांची ही मी तिसरी पिढी पहात आहे. प्रभाकर पणशीकर, डॅा. श्रीराम लागू, निळू फुले, राम नगरकर, अरुण सरनाईक, यशवंत दत्त, राजाभाऊ परांजपे, शरद तळवलकर, पद्मा चव्हाण, भक्ती बर्वे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर या मागच्या पिढीतील कलाकारांपासून आजच्या पिढीतील भरत जाधव, प्रशांत दामले, सिद्धार्थ जाधव, केदार शिंदे, मकरंद अनासपुरे अशा सर्वच मंडळींनी माझं कौतुक केलं आहे. मुलगी अश्विनीच्या लग्नासाठी रमेश भाटकर, अरुण नलावडे, मोहन जोशी, कांचन भट या कलाकारांनी आर्थिक मदत केली होती. कलाकारांची सेवा, चांगली वर्तणूक, उलट बोलणं नसल्यानं आनंद भालेकर यांनी एक लाख रुपये आणि मानचिन्ह देऊन माझा सत्कार केला आहे.