‘या’ अटी शर्तीसह सुशांतचा मित्र सिध्दार्थ पिठानीला जामीन मंजूर, लग्नानंतर पुन्हा करणार सरेंडर!

२६ जूनला सिद्धार्थचे लग्न अगोदरच ठरले होते. त्यामुळे त्याला अंतरिम जामिन देण्यात यावा. जेणेकरून तो लग्न करू शकेल. लग्नानंतर तो पुन्हा सरेंडर करेल.

    दिवंगत अभिनेताचा सुशांतसिंग राजपूत संबंधित अंमली पदार्थ प्रकरणातील संशयित आरोपी आणि सुशांतचा फ्लॅटमेट असलेल्या सिद्धार्थ पिठानीला स्वतःच्या लग्नात हजर राहण्यासाठी एनडीपीएसच्या विशेष सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. ५० हजारांच्या जातमुचलक्यावर अटी शर्तींसह सिद्धार्थला १५ दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

    सुशांतच्या आत्महत्येनंतर सदर प्रकरणात अंमल पदार्थांशी निगडित बाजू समोर आल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान रिया चक्रवर्तीसह अनेक ड्रग्स पेडलर्सना अटक करण्यात आली. त्यातच एनसीबीने सिद्धार्थला त्याच्या सोशल मिडियावरील पोस्टच्या माध्यमातून हैद्राबाद येथून २८ मे रोजी नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत अटक केली. त्यानंतर त्याला १४ दिवसांच्या एनसीबी कोठडीत ठोठावण्यात आली होती. त्यातच २६ जूनला लग्नासाठी अंतरिम जामीन देण्यात यावा, अशी विनंती करणारा अर्ज सिद्धार्थच्यावतीने विशेष सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. सिद्धार्थ अटक करण्याच्या एक आठवडाआधीच त्याचा साखरपुडा झाला होता. तसेच २६ जूनला सिद्धार्थचे लग्न अगोदरच ठरले होते. त्यामुळे त्याला अंतरिम जामिन देण्यात यावा. जेणेकरून तो लग्न करू शकेल. लग्नानंतर तो पुन्हा सरेंडर करेल. असे सिद्धार्थच्यावतीने याचिकेतून नमूद करण्यात आले आहे. सदर याचिकेवर विशेष एनडीपीएस न्यायालयात न्या. व्ही.व्ही. विद्वांस यांच्यासमोर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान, पिठानीची अद्याप चौकशी सुरू आहे. तसेच त्याच्याकडून ड्रग्स प्रकरणात महत्वाची माहिती मिळू शकते असे सपष्ट करत एनसीबीच्यावतीने सिद्धार्थच्या अर्जाला विरोध करण्यात आला. त्याला जामीन मिळाल्यास खटल्यासंबंधित पुरव्यांशी छेडछाड होऊ शकते, प्रकरणाशी संबंधित व्यक्तीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. असा युक्तिवादही यावेळी करण्यात आला. अशा खटल्या संबंधित आरोपींना फक्त वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात येतो. असा उच्च न्यायालायातील खटल्याचा दाखला देत लग्न हे काही जामीनाचे कराण असू शकत नाही असेही एनसीबीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

    दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने सिद्धार्थला ५० हजारांच्या जातमुचलक्यावर १५ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र, खटल्याशी संबंधित पुराव्यांशी छेडछाड करू नये, साक्षीदारांवर दबाव आणण्याच्या प्रयत्न न करणे, त्याच्या संपर्कात असलेल्या मित्र किंवा नातेवाईकांचे फोन नंबर तसेच माहितीही एनसीबीला देणे, या अंतरिम जामिनानंतर पुन्हा मुदतवाढीची मागणी करू नये, जामीनाची अंतिम ताऱीख २ जुलै २०२१ रोजी पुन्हा मुंबई एनडीपीएस न्यायालयात हजर रहावे, तसेच कोणत्याही अटींचा भंग केल्यास जामीन रद्द करण्यात यावा आणि जामिनाची रोख रक्कम जप्त करण्याच्या अटी शर्तींसह सिद्दार्थला जामीन मंजूर करण्यात आला आहे.