‘बालभारती नाट्यशाळा’ एक अभिनव प्रयोग

मुंबई: अनंत काळापासून म्हणजे अगदी महाकवी कालिदासाच्या पर्वापासून ते आजपर्यंत नाटक हा कला आविष्कार सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून भावणारा आहे. नाट्यकलेला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सध्याच्या संगणक, तंत्रज्ञान, भ्रमणध्वनीच्या या डिजिटल युगात नाट्यकला घट्ट पाय रोवून उभी आहे. ‌ती केवळ नाट्यप्रेमी रसिकांमुळे‌ व त्यामध्ये ‌काम करणाऱ्या कलाकारांमुळेच होय. तद्वत या कलेची जोपासना करणारे रसिकजन जेव्हा मनोभावे नाट्य कलेला जीवित ठेवू इच्छितात तेव्हा त्यांच्याकडून अशा प्रकारच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाते. ‘बालभारती नाटयशाळा’ ही नवनिर्मिती व कलेला पुरस्कृत करणारी एक अभिनव प्रवृत्ती आहे.

‘बालभारती नाट्यशाळा’ या संस्थेला जानेवारी २०२० मध्ये एक वर्ष पूर्ण झाले आहे.पश्चिम उपनगरातील कांदिवली येथे नाट्यप्रेमींना एक पर्वणी आहे. बालभारती संस्थेचे विश्वस्त हेमांग तन्ना यांनी नाट्यकलेची आवड जोपासण्यसाठी बालभारती नाट्यशाळेची निर्मिती केली. त्यासाठी अत्यंत कल्पक बुद्धीने महाविद्यालयातील एका छोटेखानी हॉलचे रूपांतर त्यांनी छोट्या रंगमंचामध्ये केले. आपल्याकडे जे काही आहे त्याचा उपयोग समाजासाठी करावा याचा वारसा त्यांनी त्यांचे वडील व  बालभारती संस्थेचे प्रणेते प्रमोद तन्ना यांच्याकडून घेतला आहे. अत्यंत चोखंदळपणे त्यांनी विविध नाटकांचे सादरीकरण केले.

सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करून घेतले. त्यांना विविध नाटक पाहण्याची,ज्येष्ठ कलाकारांना भेटण्याची, त्यांच्याकडून शिकण्याची व्यवस्था निर्माण केली. त्याचबरोबर नाटकातून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. या नाट्यशाळेतर्फे दर शनिवार व रविवारी गुजराती, मराठी, हिंदी आणि हिंग्लिश भाषेतून नाटक सादर केले जाते. 

दिनकर जोशी,दिनेश रावल लिखित गुजराती नाटक धर्म अधर्म, महेश जोशी लिखित मराठी नाटक प्रवाह, मुमताज नियासी हिंदी संगीत नाटक कैफियत  – ए -कैफी, हेमांग तन्ना लिखित गुजराती नाटक एक रमत , कागडो, मोहन नो मसालो,हार्दिक शाह दिग्दर्शित किस ऑफ स्पायडर वूमन . या आणि अशा विविध नाटकातून  सामाजिक, कौटुंबिक,विषयांवर तसेच आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य  करणारे विषय सादर केले जातात. नाटक हे समाज प्रबोधनाचे एक उत्तम माध्यम आहे असे हेमांग तन्ना यांचे ठाम मत आहे. साहजिकच यांचा आस्वाद रसिकांना घेता येत आहे. वर्षभरात बालभारती नाट्यशाळेने ६०हून अधिक नाटके प्रस्तुत केली. अनेक मान्यवर  कलाकारांनी त्यांची कला सादर केली.पश्चिम उपनगरात कांदिवली पश्चिमेला बालभारती ही एक नामवंत शैक्षणिक संस्था आहे,त्याची स्थापना १९७५ रोजी  प्रमोद तन्ना यांनी त्यांच्या सहअनुयायांसोबत केली. आजमितीला या संस्थेत सुमारे तीन ते चार हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांचे कलागुण व सर्जनशीलता विकसित करण्याचा वसा बालभारती संस्थेद्वारे घेण्यात आला आहे.