लहानग्यांनी सादर केल्या ३ ऑनलाइन लाईव्ह बालनाटिका!

या तिन्ही नाटीकांचा ऑनलाईन लाईव्ह प्रयोग असल्याने देश-विदेशातही नाट्यकृती पोहोचल्या. एक वेगळाच अनुभव साऱ्यांना मिळाला. गेल्या वर्षभरातल्या करोना काळात नाबाद शंभर प्रयोगांचा विक्रमही पार पडला आहे. पुण्यातील मराठी बालनाटीका या जगभरात पोहचल्या याची नोंद ही नाट्यक्षेत्रात निश्चितच घेण्यात येईल.

  संजय डहाळे

  मराठी रंगभूमीवर बालनाट्याची परंपरा आहे. त्यातून मुलांवर संस्कार आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना तसेच आत्मविश्वास वाढविण्यासाठी एक थेरपी म्हणून वापर होतो. मराठी रंगभूमीवर आजवर अनेक बालनाट्यातून असे प्रयत्न हे कळत – नकळत झालेत.
  मराठी बालरंगभूमीचे प्रणेते म्हणून नाटककार रत्नाकर मतकरी आणि सुधाताई करमरकर यांनी एक स्वतंत्र बालरंगभूमीचे दालन सुरू केले. मतकरी यांची ‘बालनाट्य’ संस्था तर सुधाताईंची ‘लिट्ल थिएटर’ने शेकडो बालनाट्ये मराठी व्यावसायिक रंगभूमीला दिलीत. यात मतकरींची संहिता सोबत सुधाताईंचे दिग्दर्शन असलेले ‘मधुमंजिरी’ हे खऱ्या अर्थाने पहिले बालनाट्य ठरले. त्यांनी बालरंगभूमीचा पाया मजबुतीने उभा केला. पुढे त्यात नवनवीन प्रवाह आले…

  एक काळ असा होता की, मे महिन्याची शाळा – कॉलेजला सुट्टी लागली की बालप्रेक्षकांची पावले नाट्यगृह़ाकडे हमखास वळायची. सुट्टी आणि नाटक हे अतूट नातं होतं. पण गेली दोन वर्षे मे महिना लॉकडाउन व करोना संकटामुळे घरातच कोंडला गेलाय. त्यात बालमनाची होणारी शारीरिक – मानसिक घुसमट ही लपून राहिलेली नाही. यातून मोकळी वाट करून दिलीय पुण्याचे नाट्यप्रशिक्षक बालनाटककार प्रा. देवदत्त पाठक यांनी आपल्या घरातच बसून ऑनलाइन तंत्रानं एखादं नाटक जर पद्धतशीर तालमी करून गुंफता आलं तर, मुलांचा वेळ जाईल. संपर्क राहील. आणि एका ‘हटके’ नाट्यकृतीची निर्मिती करता येईल, हा विचार त्यांच्या डोक्यात आला. सारी जुळवाजुळव सुरू झाली. संहिता तयार केली. त्यावर महिनाभर तालमी घेतल्या गेल्या. तांत्रिकदृष्ट्या सारा डाव मांडण्यात आला. पाठांतर झालं. हालचाली ठरल्या. पात्रयोजनाही पक्की झाली. वेशभूषा – रंगभूषा केली. आणि यातून साकार झाल्या ऑनलाइन लाईव्ह तीन बालनाटिका !

  पहिली नाटिका – ‘माझ्याशी पंगा’. मित्रांचा एक कंपू. त्यात अगदी नेहमीचच मौज – मस्ती, गप्पा – टप्पा सुरू असतात. पण त्यातला एक आगावू दोस्त वशिष्ठ कायम मस्ती करतो. त्रास देतो. त्याला धडा शिकवून सुधारण्याचा प्रयत्न सारे मित्र कसे काय करतात याची गोष्ट या पहिल्या छोटेखानी नाटकात मस्त मांडली आहे. दुसरी नाटिका – ‘झालं एकदाच’. घरोघरी नेहमी घडणारं नाट्य यात उभं केलंय. ठमी अभ्यासाला बसलीय पण घरातूनच एकेक अडथळे तिच्यापुढे येतात. अभ्यास पूर्ण करण्यासाठी मग ती युक्ती करते. या वनलाईनवर नाट्य गुंफलय. तिसरी नाटिका – ‘लॉक डाऊन नको रे!’ जगभरातला आजचा प्रश्न यात आहे. सध्याच्या विचित्र परिस्थितीचा सामना हा मुलं कशी काय करतात. कुठल्या दक्षता घेतात याला नाट्यरूप दिलंय. मनोरंजन तसेच अंजन सादरीकरणात आहे. त्यातील भाष्यही महत्त्वाचे ठरते. या तिन्ही नाटीका मुलांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असून, त्याच्या भावविश्वात अलगदपणे घेऊन जातात.
  रंगमंच व कॅमेरा ही दोन्ही वेगळी माध्यमे. दोघांचं तंत्र हे वेगळे. त्यावरही सहभागी मुलांना पुरेपुर कल्पना देण्यात आली. त्याचे वर्ग ‘ऑनलाइन’वर घेतले गेले. त्यातून साऱ्यांना दोन्ही माध्यमांची ताकदही कळली. ‘कॅमेरादृष्टी’ उमगली. नवं पर्व नजरेत भरलं. कलेकडे डोळसपणे बघून विविध प्रश्नांना स्पर्श करणारी ही निर्मिती ठरली.
  या तिन्ही नाटीकांचा ऑनलाईन लाईव्ह प्रयोग असल्याने देश-विदेशातही नाट्यकृती पोहोचल्या. एक वेगळाच अनुभव साऱ्यांना मिळाला. गेल्या वर्षभरातल्या करोना काळात नाबाद शंभर प्रयोगांचा विक्रमही पार पडला आहे. पुण्यातील मराठी बालनाटीका या जगभरात पोहचल्या याची नोंद ही नाट्यक्षेत्रात निश्चितच घेण्यात येईल.
  यातील कलाकारांच्या ‘टिम’मध्ये – अन्वित हर्डीकर, वसिष्ठ राऊत, वेदांत टिरवे, कैवल्य कुर्लेकर, हर्षिता सराफ, विभूती राऊत, स्वरा पावणसकर, आलोक जोगदनकर, अक्षता जोगदनकर, अर्णव जगताप, सई सोनावणे, मैत्रेयी फाटक, भार्गवी वैद्य, श्रुतीका खंदरकर, नक्षत्र खंदरकर या बालगोपाळांचा सहभाग होता. पालकांनी घरातली रंगमंच व्यवस्था चोख सांभाळली! यावर एका पालकांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, ‘या नाटकांमुळे मुलांच्या मनातलं करोनाचं भय संपून खबरदारी घेण्याचं चोख प्रत्युत्तर मिळालंय. मुलांमध्ये उत्साह वाढलाय!’ ही प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते.
  अशा बालनाट्य विषयक उपक्रमांकडे डोळेझाक करून चालणार नाही. तर उलट सर्वांनीच त्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. जगभरात ‘मुलांसाठी नाटक’ या क्षेत्राकडे अत्यंत गंभीरपणं बघितलं जातं. अमेरिकेत अभ्यासक्रमांवर नाटकं तयार करतात, ती सादर होतात. नाट्य हा बालमनावरला उपचार मानला जातो. काही प्रगत देशात वर्षभरातले काही तास नाटकांसाठी राखून ठेवले आहेत. मॅास्कोत बालकांसाठी एक इमारतच आहे. तिथे चक्क अठ्ठावीस दालनात नृत्य – नाट्य – खेळ याचा संचार असतो. मुलांची वर्दळ कायम दिसते. नार्वेतही एका इमारतीत नऊ नाट्यगृहे आहेत. तिथेही मुलांसाठी खास प्रयोग होतात… आणि आपण? आत्मचिंतनाची खरोखर गरज आहे!
  पुण्यात सुरू झालेले ऑनलाईन लाईव्ह नाटीकांचे प्रयोग ही मुलांसाठी एक प्रामाणिक धडपड आहे. त्यातून हरवलेलं बालकांचं बालपण पुन्हा एकदा सापडतंय!