‘बंदिश बँडीट्स’मध्ये आहे पंडित रविशंकर यांची कहाणी ?

अमेझॉन प्राइम व्हिडिओची आगामी सीरिज  ‘बंदिश बँडीट्स’चा ट्रेलर २० जुलै रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने प्रेक्षकांकडून प्रचंड वाहवा मिळवली. शास्त्रीय संगीतासाठी आयुष्य समर्पित केलेला राधे आणि भारताची पहिली आंतरराष्ट्रीय पॉपस्टार बनू इच्छित असलेल्या तमन्ना यांच्या प्रेमकथेभोवती हे कथानक फिरते. तमन्नाला सुपरस्टारडम साध्य करण्यात मदत करणे आणि स्वत:च्या संगीताशी प्रामाणिक राहणे यामधील राधे याच्या संघर्षाविषयीची ही कथा आहे.

वरवर पाहता ही कहाणी पंडित रविशंकर यांच्या वास्तविक जीवनाशी मिळती-जुळती वाटत आहे. रविशंकर एक ‘सितार वादक’ आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार. त्यांची पूर्व पत्नी अन्नपूर्णा देवी. दोघांनाही संगीताबद्दल समान आस्था होती. रविशंकर, उस्ताद अलाउद्दीन खान यांचे विद्यार्थी, जे मैहर घराण्याचे नेतृत्व करत होते आणि अन्नपूर्णा देवी यांचे ते पिता होते.  अलाउद्दीन खान, अन्नपूर्णा यांना संगीत शिकवण्यासाठी इच्छुक नव्हते मात्र त्यांच्या समर्पणाला बघून त्यांचे मन परिवर्तन झाले. रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी संगीत शिकत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांनी जगभरात परफॉर्म करायला सुरुवात केली तेव्हा अन्नपूर्णा देवी यांना रविशंकर यांच्याहून अधिक प्रशंसा मिळू लागली. यामुळे रविशंकर यांना असुरक्षित वाटू लागली आणि यामुळे अन्नपूर्णा देवी यांनी सार्वजनिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला होता. ‘बंदिश बँडीट्स’ रविशंकर यांच्या आयुष्यावर आधारित असल्याची चर्चा आहे. मात्र हे खरे आहे की नाही ते ४ ऑगस्टला सीरिज रिलीज झाल्यानंतरच कळू शकेल.

या सीरिजमध्ये श्रेया चौधरी आणि रित्विक भौमिक हे मुख्य कलाकार असून नसीरुद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, अमित मिस्त्री, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, कुणाल रॉय कपूर आणि राहुल कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अमृतपालसिंग बिंद्रा निर्मित आणि आनंद तिवारी दिग्दर्शित ही सीरिज जोधपुरमध्ये तयार झाली आहे. बंदिश बॅंडिट्समध्ये शंकर-एहसान-लॉय यांनी बनवलेले साऊंडट्रॅक आहेत. या शोद्वारे शंकर-एहसान-लॉय  डिजिटल डेब्यू करत आहेत. ही सीरिज १० भागांची असेल.