मिथिला समाजातील मच्छिमारांचे जीवन कॅनव्हासवर,बसंत – एक्सप्रेशन ऑफ आर्ट’चे भव्य प्रदर्शन!

मी स्वतः मच्छीमार समाजाच्या जीवनाचे कटु सत्य, त्यांचा आनंद, त्यांची दु;ख जवळून अनुभवले आहे. इतक्या संघर्षमय वातावरणातही ते प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेतात, अभिमानाने जगतात.

    मत्सकन्या हि दिसायला जितकी सुंदर असते त्याच्या अगदी विरुद्ध मच्छिमारांचे आयुष्य कठीण असते. मासेमारी करणाऱ्यांच्या आयुष्याचा हाच विरोधाभास मांडणारे ‘बसंत – एक्सप्रेशनऑफ आर्ट’ चित्रांचे प्रदर्शन कलाकार संतोष कुमार साहनी यांनी साकारले आहे. बिहार दरभंगामधील मिथिला समाज हा मासेमारी करण्यात कार्यरत असून त्यांच्या सामाजिक-आर्थिक जीवनावर भाष्य करणारी मॉडर्न आर्टची चित्र संतोष यांनी साकारली आहेत. या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे २३ ते २९ मार्च २०२१ दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान पाहता येईल. मासेमारी करणाऱ्यांच्या जीवनाचे वास्तव मांडणारे संतोष यांचे हे मुंबईमधील पहिलेच चित्र प्रदर्शन आहे. नौका, मासेमारीची जाळी या गोष्टी केवळ उत्पन्नाचे साधन नसून जगण्याचा मुख्य स्रोत आहेत, मत्सकन्या, मासेमारी करणाऱ्या महिलांचे आयुष्य…या सर्व विषयांचा अनोखा संगम साधून ही चित्र रेखाटण्यात आली आहेत.

    मासेमारीसाठी खोल समुद्रात जाणं, मासेमारीची जाळी तयारी करणं, किना-यावर मासे आणून टाकल्यानंतर त्यांची विक्री…अशा अनेक गोष्टी एकाच वेळी करणा-या मच्छिमारांचे आयुष्य धकाधकीचे असते. “माझ्या चित्र प्रदर्शनाचा विषय मच्छीमार आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनावर आधारित आहे. मी स्वतः मच्छीमार कुटुंबातील असल्याने या सर्व गोष्टींना मी जवळून अनुभवलं आहे. हेच अनुभव मी माझ्या चित्रांतून प्रतिबिंबित केले आहेत.” असे संतोषकुमार साहनी म्हणाले. ”माझ्यासाठी चित्र हे केवळ कॅनव्हासवर ब्रश स्ट्रोक किंवा रंगांचे मिश्रण करणे नाही. तर हे एक असे प्रभावी माध्यम आहे जे समाजातील सर्व स्तरावर प्रेम, त्याग, शांती, सौंदर्य, अध्यात्म, ऐक्य यांचा संदेश देते. मी स्वतः मच्छीमार समाजाच्या जीवनाचे कटु सत्य, त्यांचा आनंद, त्यांची दु;ख जवळून अनुभवले आहे. इतक्या संघर्षमय वातावरणातही ते प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेतात, अभिमानाने जगतात. मत्स्यपालन आणि इतर बर्‍याच मार्गांनी अन्न मिळवतात. त्यांचा हा प्रवास मी माझ्या चित्रातून मांडला आहे” असेही ते पुढे म्हणाले.

    संतोष हे मूळचे मासेमारी करण्यात कार्यरत असणाऱ्या मल्लाह समाजातील आहेत. लहानपणी सण -उत्सवादरम्यान संतोष त्यांचे घर रंगवायचे. तिथूनच त्यांची रंगांसाठी आवड निर्माण झाली. या आधी संतोष यांनी गजगामिनी, शक्ती, लाईफबोट, कश्ती, जननी, स्नेह अशा शीर्षकांतर्गत अनेक चित्र साकारली आहेत. त्यांचे ऑस्ट्रेलिया, बँकॉक, कॅनडा, लॉस एंजिलिस, नेपाळ, फ्रांस, मॉस्को या ठिकाणी चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

    [read_also content=”अबब…प्रियांकाच्या घडाळ्याने – ड्रेसने वेधलं सगळ्यांच लक्ष, ३२ लाखांच्या या घडाळ्यात आहेत खास गोष्टी, जाणून घ्या!~https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/priyanka-chopra-wears-rs-32-lakh-alligator-strap-watch-for-oscars-2021-nominations-with-nick-jonas-nrst-103332/”