धम्माचा पाया

धम्माचा पाया हा सीलवर आधारित आहे. आणि निब्बाणाच्या दिशेकडे जात असताना सील भक्कम असल्याशिवाय समाधि साध्य होत नाही आणि समाधिशिवाय पञा विकसित होत नाही. जोपर्यंत ‘यथा भूतं’ अर्थात ‘जसे आहे तसे’ पाहता येत नाही, तोपर्यंत दुक्खमुक्ती अशक्य. दुक्खमुक्तीच्या वाटेवर चालत असताना अगोदर त्या वाटेवरील काटे, कचरा, खाचखळगे दूर करावे लागतात. निब्बाणाच्या मार्गातील खाचखळगे दूर करणे म्हणजे सीलाचे आचरण करणे होय. बुद्धांनी या सीलांची वर्गवारी उपासक आणि भिक्खु अशाप्रकारे केली आहे. उपासकांची पञ्च आणि अट्ठसील व भिक्खुंसाठी दससील प्रतिपादीत केले आहेत. हे सील भक्कम होण्यासाठी अगोदर त्याची ओळख होणे आवश्यक आहे. सीलाचा पाया भक्कम करण्यासाठी अकुशल काय आहे, याची ओळख होणे गरजेचे आहे.

दहा दुचरित्त अर्थात दुषित आचरण आहेत, हे काया, वाचा आणि मनामध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्राणीहत्या, चोरी, व्याभिचार हे कायाच्या अनुषंगाने दुचरित्त, मुसावादा अर्थात खोटे बोलणे, कठोर बोलणे, व्यर्थ बडबड आणि चुगली करणे हे वाणीच्या अनुषंगाने दुचरित्त आणि अभिज्झा म्हणजे प्रज्ञा नसणे, जागृत नसणे, मिच्छादिठ्ठी म्हणजे मित्थ्यादृष्टी आणि व्यापाद अर्थात अपार क्रोध हे दहा दुचरित्त आहेत, यापासून स्वत:चा बचाव केला पाहिजे. 

  पाणातिपाता म्हणजे काय?

ज्याच्या श्वासाचा जीवितइंद्रियाशी संपर्क तुटला नाही, अशा जीवितइंद्रियांचा उपच्छेद करणे अर्थात त्यांना नष्ट करणे. वध करण्याच्या इरादा ठेऊन हत्या करणे म्हणजे पाणातिपाता होय.[i] अर्थात जीवितइंद्रियांचा उपच्छेद केल्यास पाणातिपाता सील तुटते असे स्प्ष्ट आहे, परंतु, मनामधूनही एखाद्याची हत्या केल्यास देखील पाणातिपाता सील तुटते. पाणातिपाता शील का तुटते? मनामध्ये द्वेषाची भावना असल्यामुळे पाणातिपाता सील तुटत असते. 

 अदिन्नादाना म्हणजे काय?

अशी एखादी वस्तू जी आपल्याशी संलग्नित नाही, आणि ती कोणी आपल्याला दिलीही नाही, अशा वस्तुचा उपभोग घेण्याच्या अनुषंगाने ती बाळगणे अर्थात जे दिले गेले नाही, ते घणे म्हणजेच चोरी करणे म्हणजे अदिन्नादाना होय.

  कामेसुमिच्छाचारा म्हणजे काय ?

आईने रक्षित ठेवलेली, वडिलांनी रक्षित ठेवलेली, आई-वडिलांनी रक्षित ठेवलेली, भावाने रक्षित ठेवलेली, बहिनीने रक्षित ठेवलेली व नातेवाईकांनी रक्षित ठेवलेली स्त्रीसोबत दुव्यवहार करणे तसेच दुसऱ्याच्या पत्नी सोबत दुव्यवहार करणे म्हणजे कामेसुमिच्छाचारा होय.[ii] कामेसुमिच्छाचारा हे सील गृहस्थांच्या अनुषंगाने आहे. परंतु, जेव्हा एखाद गृहस्थ गृहत्याग करून प्रवज्जा घेतो तेव्हा त्याला कामेसुमिच्छाचारा ऐवजी ‘अब्रम्हचरिया’ हे सील येते.अशावेळी कोणत्याही स्त्रीसोबत संबंध ठेवणे हे वर्ज आहे.किंबहुना स्त्रीला स्पर्श करणे देखील वर्ज आहे.

  भिक्खुंसाठी कामवासना वर्ज

जर एखादा भिक्खु मैथुन धर्मा करतो अर्थात शारिरिक संबंध प्रस्तापित करतो, तर त्याला संघातून थेट बाहेर काढले जाते.भिक्खुंसाठी स्त्रीला स्पर्श करणे हादेखील एकप्रकारे दोष असून त्यामुळे संघ संबंधित भिक्खुला संघदिसेस देतो.अर्थात त्याला संघातून काही काळ बाहेर काढले जाते.ही त्याची शिक्षा असते.स्त्रीयांना स्पर्श करणे, स्त्रीयांसोबत अश्लिल वार्तालाप करणे, स्त्रीयांना अयोग्यप्रकारे सेवा करण्यास सांगणे, हे सर्व वर्ज ठरविण्यात आले आहे.आणि मैथून करणे तर फार मोठा अपराध असून जो मैथून करतो, त्याला पुन्हा संघामध्ये स्थान राहत नाही.

‘‘योपन भिक्खु मेथुनं धम्मं पटिसेवेय्य, पाराजिको होति असंवासो’’ति।

४४. ‘‘यो पन भिक्खु भिक्खूनं सिक्खासाजीवसमापन्नो सिक्खं अपच्चक्खाय दुब्बल्यं अनाविकत्वा मेथुनं धम्मं पटिसेवेय्य अन्तमसो तिरच्छानगतायपि, पाराजिको होति असंवासो’’ति।[iii]

जो भिक्खु मैथून धर्माचे सेवन करतो, त्याला पारजिक दोष होतो. म्हणजेचे अशा भिक्खुला पुन्हा संघात स्थान राहत नाही आणि तो मृत्यूनंतर त्याची गती तिरच्छानयोनीत होते. त्याचा जन्म हा प्राण्यांच्या योनीत होता. त्याची दुर्गती होते.

  संघातून बाहेर काढण्याचे कारण

पाराजिक केल्यास संघातून का बाहेर काढले जाते? एखादा भिक्खु मैथून धर्म करतो, तेव्हा तो इतरांच्या ब्रह्मचरियेमध्ये बाधा उत्पन्न करतो. त्यामुळे इतरांचे नुकसान होत असते. केवळ मनुष्य निब्बाणाचा साक्षात्कार करू शकतो, पण जेव्हा एखाद्या मनुष्याची हत्या केली जाते, तेव्हा त्या मनुष्याची निब्बाणाकडे जाणारी संधी हिरावून घेतली जाते. चोरी केल्यामुळे इतरांच्या संपत्तीचा ऱ्हास करत असतो, चोरी केल्यामुळे इतरांची वित्तहानी होत असते. दिव्य शक्तीचे प्रदर्शन केल्यास, हे पाहून प्रवजित होणारे दिव्यशक्तीचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने प्रवजित होतील, आणि मूळ निब्बाणाचा हेतू मागे राहिल, म्हणून या चार बाबी पाराजिक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

  मुसावादा म्हणजे काय?

जे सत्य आहे, त्याच्या विपरित कथन करणे म्हणजे मुसावादा होय. अर्थात खोटे बोलणे.उदा, एखादा सभेत, परिषदेत, न्यायदान कक्षेत, नातेवाईकांमध्ये जे सत्य आहे, त्याच्या विपरित कथन करतो, म्हणजे तो मुसावादा करतो. हे तो स्व:हित अथवा परहितासाठी करत असतो.

 ·           पिसुणावाचा म्हणजे चुगली करणे होय. दोघांमध्ये भांडण लावण्याचा उद्देशाने चुगली करणे.

  ·           फरुसावाचा म्हणजे कठोर, असभ्य, कानाला चांगले वाटणार नाही, अशी भाषा बोलणे.

   ·           सम्फप्पलापा म्हणजे व्यर्थ बडबड, त्या वाणीचा काही अर्थही नसतो.

वरील कायाचे आणि वाचीचे दुचरित्त हे सीलाच्या अनुषंगाने आले आहेत. यालाच चूळशील देखील संबोधण्यात येते. भिक्खुंच्या अनुषंगाने सीलांची चूळसील, मज्झिमसील आणि महासील अशी वर्गवारी करण्यात आली आहे. जे काया वाचाने अकुशल कर्म आहेत, त्यांची गणना चूळशीलमध्ये होते.  

भिक्खुंसाठीचे जे दहा सील आहेत, त्याची शिक्षा (शिकवण) ग्रहण करायची. या शिकवणीचे निरंतर पालन करायचे, त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही. त्याला एका विशिष्ट्य उंचीवर नेऊन ठेवायचे. अशा सीलांचे आता पुन्हा पतन होणार नाही, म्हणजे सीलयुक्त होणे होय.

तत्थ कतमं पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं? यस्मिं समये कामावचरं कुसलं चित्तं उप्पन्नं होति सोमनस्ससहगतं ञाणसम्पयुत्तं पाणातिपाता विरमन्तस्स, या तस्मिं समये पाणातिपाता आरति विरति पटिविरति वेरमणी अकिरिया अकरणं अनज्झापत्ति वेलाअनतिक्कमो सेतुघातो – इदं वुच्चति ‘‘पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं’’।[v]

पाणातिपाता वेरणमी सिक्खापदानि कसे आहे? ज्यावेळीस कामावचर कुशल चित्त उत्पन्न होते, तेव्हा चित्त शांत होते. ञाणाने युक्त असते. पाणातिपातापासून खुपच लांब असते. त्यावेळेस पाणातिपातापासून दूर असता, खूपच दूर असता. पाणातिपाता करत नाही, करणार देखील नाही. न करताच लांब राहता. पाणातिपाता करण्यापासून पलिकडे जाता आणि (पुन्हा) करण्याच्या सेतूचा घात करता.(आता पुन्हा पाणातिपाताकडे जाता येणार नाही, अशी अवस्था निर्माण करता.) असे करणे म्हणजे पाणातिपातापासून लांब राहण्याची शिक्षा ग्रहण करणे होय. हीच व्याख्या सर्व शीलांच्या बाबतीत लागू होते आणि चित्ताची अशी अवस्था जेथे एखादे सील तुटण्याचा आधार नष्ट होतो. एखादे सील तोडण्यासाठी पलिकडे जाणाऱ्या सेतूचाच घात केला जातो, अशी अवस्था निर्माण होणे म्हणजे सीलसम्पादीत अर्थात सीलयुक्त होणे होय. असे सीलयुक्त होणे हे निब्बाणाच्या मार्गातील पहिला टप्पा आहे. पण येथेच न थांबता समाधिचा अभ्यास केला पाहिजे.

 

[१]भिक्खुंचे विनय (मैथून, मनुष्य हत्या, चोरी, दिव्य शक्तीचे प्रदर्शन)

[२]शारिरिक संबंध प्रस्थापित करणे

[i]खुद्दकनिकाय, खुद्दकपाथ अट्ठकथा, सिक्खापदानि

[ii] मज्झिमनिकाय, मुळपण्णासपाळि, चूळयमकवग्गो, सालोय्यसुत्तं

[iii]पाराजिककण्डं १. पठमपाराजिकं सन्थतभाणवारो

[iv] सामञ्ञफलसुत्त, दीघनिकाय

[v]अभिधम्मपिटक, विभङ्गपाळि, १४. सिक्खापदविभङ्गो

– विजेंद्र जाधव