भाग्यश्रीच्या रूपात ज्योतीचा सोन्याच्या पावलांनी प्रवेश!

मालिकेत ज्योती निमसे ही अभिनेत्री मुख्य भुमिकेत झळकणार आहे. ज्योतीचा भाग्यश्रीपर्यंतचा प्रवास तीने नवराष्ट्रबरोबर शेअर केला आहे.

  घरातली मुलगी किंवा त्या घरातली सून ही त्या घरातली लक्ष्मी असते असं म्हणतात. नवी नवरी सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीप्रमाणे घरात आली आणि सासरच्या अंगणात भरभराट झाली. अशीच काहीशी कहाणी कलर्स मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘सोन्याची पावलं’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेतून दोन नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेत ज्योती निमसे ही अभिनेत्री मुख्य भुमिकेत झळकणार आहे. ज्योतीचा भाग्यश्रीपर्यंतचा प्रवास तीने नवराष्ट्रबरोबर शेअर केला आहे.

  लहानपणापासून अभिनयाची आवड असणाऱ्या ज्योतीने अगदी अडीच वर्षाची असल्यापासून नाटकांमध्ये काम करायला सुरूवात केली. त्यानंतर जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेत तीने १२वीत असताना ‘जान तेरे नाम’ हे आपलं पहिलं व्यवसायिक नाटक केलं. कल्याण वाघमारे यांनी त्या नाटकांच दिग्दर्शन केलं होतं. या नाटकापासून ज्योतीचा खऱ्या अर्थाने अभिनयातील प्रवास सुरू झाला. त्यानंतर एस.के.सोमय्या कॉलेजमध्ये असताना ज्योतीने अभिनयात अनेक बक्षीस मिळवली. ‘जोगीया’ नाटकाला ज्योतीला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचं पारितोषीक मिळालं.  त्यानंतर ज्योतीने पुर्णपणे अभिनयक्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. यासाठी अनेक ऑडिशन्स तिने दिल्या. अखेर छोटी का होईना पण ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत ज्योतीला भूमिका मिळाली. त्यानंतर ‘फुलपाखरू’ या मालिकेत निगेटीव्ह भूमिकेतही ज्योती झळकली. त्यानंतर ‘आनंदी जग हे सारं’ यामालिकेतही तीने भूमिका केल्या आहेत.

  ….आणि मुख्य भूमिका मिळाली

  आजपर्यंत अनेक मालिकांमधील छोट्या छोट्या भूमिका करणाऱ्या ज्योतीला तिच्या मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे सोन्याची पावलं या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. आपल्या भूमिकेविषयी बोलताना ज्योती म्हणाली, लॉकडाऊनमध्ये तुझ्या इश्काचा नाद खुळा ही मालिका सुरू होती. या मालिकेत तीन- चार महिने माझं कॅरेक्टर नव्हतं. त्यामुळे मला गॅप होता. पण मला एवढे दिवस घरी बसायचं नव्हतं. याच दरम्यान माझ्या वडिलांचीही बायपास झाली. त्यामुळे कुठेतरी काम मिळावं यासाठी पुन्हा धडपड सुरू केली. याचवेळेच मला या मालिकेबद्दल समजल. या मालिकेसाठी जीव तोडून ऑडिशन द्यायची असं ठरवलं आणि ऑडिशन शूट करून पाठवली. दोन दिवसांनी मला एक स्क्रीप्ट आली आणि मी पुन्हा एक ऑडिशन शूट करून पाठवली. ही ऑडिशन लीड कॅरेक्टरसाठी हे समजल्यावर मी जीव तोडून प्रयत्न केला कारण मला ही संधी गमवायची नव्हती. या संधीची मी खूप दिवस वाट बघितली होती. अखेर माझी या मुख्य भूमिकेसाठी निवड झाली.

  या मालिकेत मी भाग्यश्री ही खूप गोड आणि गुणी मुलगी आहे. तिच्यावरचं आईचं छत्र लहानपणीच हरवलेलं असतं त्यामुळे सावत्र आईच्या जाचाखाली ती वाढलेली असते. पण तिच्यावर कोणती जबाबदारी दिली तर कितीही संकट आली तरी ती पार पाडते. ती तिच्या कुटूंबासाठी वाट्टेल ते करायला तयार होते. हा एक फॅमिली ड्रामा आहे. त्याचबरोबर एक लव्हस्टोरीही यात बघायला मिळणार आहे. या मालिकेतील भाग्यश्रीच्या नशिबात इनामदारांची सून होणं लिहिलेलच होतं म्हणून तिची भेट दुष्यंतशी झाली आणि ते अपघाताने लग्नबंधनात अडकले. पण लग्नानंतर भाग्यश्रीचं आयुष्य पूर्णतः बदललं. तिला ‘वाहिनीसाहेब’ हा मान मिळाला. ज्यामुळे भाग्यश्रीला वाहिनीसाहेब हा मान मिळाला त्या सोन्याच्या पावलांचा आणि भाग्यश्रीचा काय संबंध आहे ? इनामदार घराण्यातील वडीलोपार्जित सोन्याची पावलं याचं काय रहस्य आहे? हे तुम्हाला मालिका बघितल्यावरच समजणार आहे.

  भाग्यश्री आणि माझ्यात मोठा फरक

  ज्योती आणि भाग्यश्री काहीशी सारख्या आहेत. पण खूप मोठा फरक या दोघींमध्ये आहे. भाग्यश्री एवढी सहनशीलता ज्योतीमध्ये अजिबातच नाहीये. पण खूप पटकन टेन्शन घेते. हायपर होते. मी फार न विचार करता पटकन निर्णय घेऊन मोकळी होते. त्यामुळे ही भूमिका साकारताना माझ्यासमोर हा एकप्रकारे टास्कच होता. कारण मी जशी नाहीये तशी भूमिका मला साकारायची होती. त्यामुळे भाग्यश्रीकडून मला खूप शिकायला मिळालं आहे. तिच्यामुळे नक्कीच माझ्यात खूप फरक पडत आहे. मला खात्री आहे हळूहळू भाग्यश्री आणि ज्योतीमध्ये काहीच फरक राहणार नाही. भाग्यश्री करताना मला खूप मज्जा येत आहे. आमच्या निर्मात्या श्रावधी देवधर, सई देवधर या दोघींनीही मला खूप जास्त मदत केली.

  सहकलाकरामुळे कामाची मज्जा वेगळी

  मालिकेमधील सहकलाकार खूप छान आहेत. सगळेच एकमेकांना खूप सांभाळून घेतात. प्रत्येकाची भूमिका चांगली व्हावी यासाठी सगळेच प्रयत्न करतात. आदित्यबरोबर एक काम करताना एक वेगळा कम्फर्ट मिळतो. आम्ही एकत्रच सीनची रिहर्सल करतो. एकमेकांच्या सीनमधल्या चूक सांगतो जेणेकरून तो सीन अधिक उठावदार होईल. त्यामुळेच आमचे सीन जास्त खुलून येतात. तो खूप चांगला को- अक्टर आहे. स्टोवरचा प्रत्येकजण पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचा प्रयत्न करत असतो. यात आमचा दिग्दर्शक, निर्माता या सगळ्यांची आम्हाला खूप मदत होते. त्यामुळे सेटवरच खूप पॉझिटीव्ह वातावरण असतं. आमचं एक कुटुंब आता तयार झालं आहे. मालिकेमध्ये वहिनीसाहेब जी निगेटीव्ह भूमिका करतेय. तीची आणि माझी खूप छान मैत्री झाली आहे. ऑनस्क्रीनजरी आम्ही एकमेकांच्या विरूद्ध असलो तरी ऑफस्क्रीन आम्ही खूप चांगल्या मैत्रीणी झाल्या आहोत. त्याचबरोबर सई देवधर यांच्याबरोबर एक वेगळा बॉण्ड तयार झाला आहे. मला काहीही अडचण असली तरी मी त्यांच्याकडे जाते. त्या नेहमी मला मदत करयला तयार असतात.