बिग बॉस जिंकणरी रूबीना कोण आहे माहितेय का? या कारणामुळे राखी सावंतशी झालं होतं कडाक्याचं भांडण!

मूळची शिमल्याची असलेल्या रूबीनानं २००८ साली झी टीव्हीवरील 'छोटी बहू' या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने सास बिना ससुराल, देवों के देव महादेव, पुनर्विवाह या मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. २०१६ मध्ये तिनं कलर्स वाहिनीवरील 'शक्ती- अस्तित्त्व के एहसास की' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली.

  बिग बॉस १४ वा सीझन अभिनेत्री रूबीना दिलैकनं जिंकला. तर गायक राहुल वैद्य फर्स्ट रनर अप ठरला. या आधीही इंडियन आयडॉल या गाण्याच्या रिअलिटी शोमध्येही तो उपविजेता ठरला होता.

  ‘बिग बॉस’च्या चौदाव्या सीझनमध्ये अभिनव आणि रुबीना स्पर्धक म्हणून घरात आले. पहिल्या दिवसापासून हे कपल ‘बिग बॉस’च्या घरात होतं, तर राखी सावंत वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे घरात आली होती. घरात आल्यानंतर राखीने अभिनव शुक्लासोबत ‘फ्लर्ट’ करायला सुरूवात केली. सुरूवातीला हे सगळं गमतीत आणि हसत-खेळत सुरू होतं. मात्र एकदा राखीने लिपस्टिकने आपल्या अंगभर ‘I love ABhinav’ लिहिलं आणि घरभर फिरत होती. आपल्याला अभिनव आवडतो असंही ती सातत्यानं सांगायला लागली.

  एका टास्कदरम्यान तर तिने अभिनवच्या शॉर्ट्सची नाडीच ओढली. हा प्रकार अभिनव आणि रूबीनाला आवडला नाही. इतकंच नाही एका टास्कमध्ये मदत केली नाही, म्हणून घरात जाऊन राखीने अभिनवची अंतर्वस्त्रच कात्रीने कापली. राखीच्या या वर्तनामुळे रुबीनाने ‘एन्टरटेन्मेंटच्या नावाखाली असं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही. एका मर्यादेत राहणं चांगलं’ असं तिला बजावलं होतं. एकदा तिने राखीच्या अंगावर पाणीही फेकलं होतं. सोशल मीडियावर या घटनांनंतर रुबीनाला समर्थन मिळालं होतं, तर राखी सावंतला ट्रोल व्हावं लागलं होतं.

  कोण आहे रुबीना दिलैक?

  मूळची शिमल्याची असलेल्या रूबीनानं २००८ साली झी टीव्हीवरील ‘छोटी बहू’ या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने सास बिना ससुराल, देवों के देव महादेव, पुनर्विवाह या मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. २०१६ मध्ये तिनं कलर्स वाहिनीवरील ‘शक्ती- अस्तित्त्व के एहसास की’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. यात तिनं ट्रान्सजेंडर व्यक्तिची भूमिका केली होती. २०१८ साली रूबीना अभिनेता अभिनव शुक्लासोबत विवाहबद्ध झाली.

  लग्नाबद्दलचा ‘तो’ गौप्यस्फोट

  बिग बॉसच्या घरात रूबीनानं आपल्या लग्नाबद्दल केलेल्या खुलाशानंतरही खळबळ उडाली होती. आपल्या लग्नात तणाव होते. अभिनव आणि आपलं नातं घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलं होतं, असं रुबीनानं म्हटलं होतं. आपल्या नात्याला एक संधी देण्याच्या विचारानंच आपण बिग बॉसमध्ये आल्याचंही रुबीना आणि अभिनवनं स्पष्ट केलं होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिनव शुक्लानं माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आता आपल्या नात्यात सगळं सुरळीत असल्याचं म्हटलं.