saroj khan

सरोज यांच्या प्रथम स्मृतीदिनाचं औचित्य साधत निर्माते भूषण कुमार यांनी त्यांच्या बायोपीकची घोषणा केली आहे.

    दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान यांनी आपल्या सदाबहार नृत्यशैलीच्या माध्यमातून अनेक कलाकारांचं करियर घडवलं आहे. आज त्या हयात नसल्या तरी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे झालेले, त्यांनी शिकवलेल्या धड्यांमुळे नृत्यात पारंगत झालेले बरेच कलाकार सिनेसृष्टीत नावारूपाला आले आहेत. त्यामुळेच सरोज यांची एक्झीट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली होती. बऱ्याच जणांना आजही त्या गेल्याचं खरं वाटत नाही. आता त्या खऱ्या अर्थानं चित्रपट रूपात या कलाकारांमध्ये रहाणार आहेत.

    बरोबर एक वर्षापूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानं ७१ वर्षांच्या सरोज यांनी अखेरचा श्वास घेतला होता. सरोज यांच्या प्रथम स्मृतीदिनाचं औचित्य साधत निर्माते भूषण कुमार यांनी त्यांच्या बायोपीकची घोषणा केली आहे. या चित्रपटाची इतर माहिती लवकरच घोषित करण्यात येणार आहे. सरोज यांच्या निधनानंतर फिल्ममेकर रेमो डिसूझानं त्यांच्यावर चित्रपट बनवण्यात रुची दाखवली होती.

    आपला बायोपीक बनावा अशी सरोज यांची इच्छा होती असं रेमोचं म्हणणं होतं. जर कोणी आपला बायोपीक बनवला तर त्यांना माझा डान्स आणि स्ट्रगलची जाणीव होईल असं त्या म्हणाल्या होत्या. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या सरोज यांनी ४० वर्षांच्या आपल्या कारकिर्दीमध्ये २०००पेक्षा अधिक गाण्यांची कोरिओग्राफी केली होती.