photo of an old movie projector
photo of an old movie projector

कोट्यवधींची आकडेमोड अगदी सहजपणे करणारं बॉलिवूड जणू स्वत:च्याच मायाजाळात अडकल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

  बॉलिवूड आणि इथली कोट्यवधींची गणितं सर्वांनाच ऐकून तरी ठाऊक असतील. ‘पैसा पैसे को खींचता है’ या डायलॅागनुसार कोट्यवधी रुपये खर्चून बनवलेले चित्रपट त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने पैसे कमवतात. मागच्या वर्षापर्यंत तरी असंच चित्र होतं, पण २०२०मध्ये कोव्हिडनं बॉलिवूडला असं काही ग्रहण लावलं ग्रहण की ते अद्याप संपायचं नाव घेत नाही. याच कारणामुळं कोट्यवधींची आकडेमोड अगदी सहजपणे करणारं बॉलिवूड जणू स्वत:च्याच मायाजाळात अडकल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

  हिंदी सिनेसृष्टी ही भारतातील अग्रगण्य इंडस्ट्रीजपैकी एक मानली जाते. इथली कोट्यवधींची उलाढाल आणि त्याच्याशी निगडीत असलेले आकडे आश्चर्यचकित करणारे आहेत, पण ही सर्व गणितं सध्या शून्याच्या गर्तेत सापडल्याचं पहायला मिळतं. मागच्या वर्षाप्रमाणं यंदाही बॉलिवूडचं कॅलेंडर फेल होत असल्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे. यंदा मार्च महिन्यात बंद झालेली चित्रपटगृहं अद्याप उघडलेली नाहीत. त्यामुळं बिग बजेट चित्रपटांना ओटीटीशिवाय पर्याय राहिलेला नाही. आगामी चित्रपटांमध्ये अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ २७ जुलै रोजी रिलीज होणार होता, पण आता तो स्वातंत्र्यदिनाच्या आठवडयात प्रदर्शित होणार आहे. याच आठवड्यात अजय देवगणचा ‘भुज’ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे सर्व पाहता बॉलिवूड सध्या ‘वेट अँड वॅाच’ मोडमध्ये गेल्याचं चित्रपट जाणकारांचं म्हणणं आहे. आज जरी बॉलिवूडमध्ये नवीन चित्रपटांच्या घोषणा होत असल्या तरी ते वेळेवर पूर्ण होतीलच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. प्रदर्शनासाठी तयार असलेल्या चित्रपटांमध्ये बॉलिवूडकरांचे १८०० कोटींहून अधिक रुपये अडकल्याची माहिती मिळाली आहे. हा आकडा काही ठराविक मोठ्या चित्रपटांचा आहे. इतर काही कारणांमुळे रखडलेले चित्रपट मिळून हा आकडा खूप मोठा होऊ शकतो.

  अद्यापही थिएटर्स बंद असल्यानं चित्रपटांना ओटीटीशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यामुळं मोठ्या नफ्याच्या अपेक्षेनं बनवलेल्या चित्रपटांनी निर्मात्यांना निराश केलं आहे. कोव्हिडच्या निर्बंधांमुळं सध्या प्रोडक्शन खूप धीम्या गतीनं सुरू आहे. त्यामुळं भविष्यात जेव्हा सिनेमागृहं पूर्ण क्षमतेनं ओपन होतील आणि प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांचा ओव्हर फ्लो संपेल तेव्हा थिएटरमध्ये चित्रपटांची कमतरताही भासण्याची भीतीही जाणकार व्यक्त करत आहेत. या सर्व परिस्थितीचा फटका केवळ बॉलिवूडलाच बसणार नसून, आज संकटात सापडलेल्या थिएटर इंडस्ट्रीलाही बसणार आहे. सिनेमागृहं सुरू करण्याची परवानगी मिळताच त्याचा मेन्टेनन्सचा मुद्दा समोर येणारच. यात मल्टिप्लेक्सच्या तुलनेत एकेरी चित्रपटगृहांची अक्षरश: दुर्दशा झाल्याचं दिसतं. इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणी वालीच उरलेला नाही. आता जरी सिनेमागृहं उघडण्याची परवानगी मिळाली तरी लगेच कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. कारण प्रॅापर प्लॅनिंग आणि प्रमोशनशिवाय आज कोणतंही प्रोडक्शन हाऊस आपला चित्रपट प्रदर्शित करत नाही. त्यामुळं किमान महिनाभर तरी प्रमोशन केल्यानंतरच सिनेमागृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रक्रिया सुरळीतपणं सुरू होईल.

  लॅाकडाऊनला निसर्गाची साथ
  सध्या जरी प्रोडक्शन सुरू असलं तरी ते नेहमीच्या तुलनेत फार अल्प आहे. हा आकडा केवळ पाच टक्के असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. कारण फिल्म इंडस्ट्रीचं मूळ असणाऱ्या मुंबईवर आजही निर्बंधांची लटकती तलवार आहे. त्यामुळं मोठी प्रोडक्शन हाऊसेस आपले अर्धवट राहिलेले किंवा घोषित केलेले सिनेमे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी घाई करत आहेत. कारण अद्याप तिसऱ्या लाटेचा धोका टळलेला नाही. केवळ लॅाकडाऊनचाच नव्हे, तर वादळांचा फटकाही सिनेसृष्टीला बसला आहे. वादळानं उद्ध्वस्त झालेले काही सेट्स पुन्हा उभारावे लागले, तर चांगल्या स्थितीत असलेले काही भव्य सेट्स केवळ भाडं परवडत नसल्यानं तोडावे लागले होते. ते पुन्हा उभारण्यासाठी निर्मात्यांना पुन्हा पैसे खर्च करावे लागत आहेत.

  तारखांचं वेळापत्रक कोलमडलं
  गत वर्षी अचानक लागलेल्या लॅाकडाऊनमुळं मोठ्या काय आणि लहान काय सर्वच कलाकारांचं वेळापत्रक कोलमडून गेलं. यंदा गाडी पुन्हा रुळावर येत असल्यासारखं वाटत असतानाच पुन्हा निर्बंधांची कुऱ्हाड पडली आणि उरली सुरली आशाही धुळीस मिळाली. आज एक अॅक्टर दोन किंवा तीन चित्रपटांमध्ये बिझी आहे. त्यांच्यासोबत काम करणारे सहकलाकारही एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये बिझी आहेत. त्यामुळं दोघांच्या तारखा मॅच करण्याची कसरत करून मग शूटिंगचं शेड्यूल आखावं लागत आहे. यात कलाकारांचीही कोंडी होत आहे. कोणत्या चित्रपटाला प्राधान्य द्यायचं आणि कोणाला मागे ठेवायचं या द्विधा मन:स्थितीत कलाकार आहेत. कलाकारांच्या तारखांची जुळवाजुळव करताना प्रोडक्शन हाऊसच्या नाकी नऊ येत आहेत.

  … अन्यथा बॉलिवूड संकटात
  मागच्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सर्व नॅार्मल होत असल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. त्यामुळं बऱ्याच चित्रपटांच्या तारखाही घोषित करण्यात आल्या होत्या, पण दुसऱ्या लाटेनं पुन्हा सर्व धुवून नेलं. दुसऱ्या लाटेमुळं चित्रपट प्रदर्शित होऊ न शकल्यानं निर्मात्यांवर वारंवार प्रदर्शनाच्या तारखा बदलण्याची वेळ आली. पुन: पुन्हा तारखा बदलाव्या लागू नयेत यासाठी त्यांनी आता थोडं थांबणं पसंत केलं आहे. या सर्व गदारोळात काही निर्मात्यांनी नवीन चित्रपटांची घोषणा करणं थांबवलेलं नाही. त्यामुळं साइनिंग अमाऊंड देऊन कलाकारांना बुक करण्याचा फंडा सुरू झाला. कितीही संकटं आली तरी हा शो बिझनेस कधी थांबत नाही, पण कोरोनां मात्र याच्या पायातही बेड्या अडकवल्या. आज ओटीटीच्या माध्यमातून का होईना पण चित्रपटांची गाडी धीम्या गतीनं सुरू आहे. निर्बंध काहीसे शिथिल झाल्यानं पोस्ट प्रोडक्शनच्या कामाला गती मिळाली आहे. चित्रपट तयार झाल्यानंतर ते ओटीटीवर का होईना प्रदर्शित करण्याकडं काही निर्मात्यांचा कल आहे. काही मोठे चित्रपट मात्र थिएटरमध्ये मोठा गल्ला जमवण्याच्या आशेनं थांबले आहेत. सध्याचं चित्र पाहता परिस्थिती नॅार्मल व्हायला आणि चित्रपटगृहांची कवाडं उघडायला दिवाळी येणार असल्याचं चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचं मत आहे. इतकंच नाही तर चित्रपटगृहं सुरू झाल्यावर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांची हाऊसफुल गर्दी व्हायला त्यानंतर किमान दोन-तीन महिने तरी जातील असा अंदाज वर्तवला जात आहे. आॅगस्टमध्ये चित्रपट प्रदर्शित व्हायला सुरुवात झाली, तर दिवाळीला बॅाक्स आॅफिसवर फटाके फुटण्याची शक्यता आहे. अन्यथा बॉलिवूड संकटात सापडणार आहे.

  प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले चित्रपट
  लॅाकडाऊनमुळं चित्रपटगृहांना टाळं असल्यानं प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांची संख्या जवळपास दोन डझनच्या आसपास आहे. यात अक्षय कुमारच्या ‘बेल बॅाटम’, ‘अतरंगी रे’, ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांसोबत अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’, ‘चेहरे’, प्रभासचा ‘राधे श्याम’, जॅान अब्राहमचे ‘सत्यमेव जयते २’, ‘अॅटॅक’, आयुष्मान खुरानाचे ‘अनेक’, ‘चंदीगढ करे आशिकी’, सैफ अली खानचा ‘बंटी और बबली २’, रणवीर सिंहचे ‘८३’, ‘जयेशभाई जोरदार’, शाहिद कपूरचा ‘जर्सी’, अहान शेट्टीचा ‘तडप’, विजयचा ‘लायगर’, आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’, तापसी पन्नूचा ‘लूप लपेटा’, कंगना रणौतचा ‘थलैवी’, ऋषी कपूर यांचा ‘शर्माजी नमकीन वाले’, अर्जुन रामपालचा ‘दी बॅटल आॅफ भीमा कोरेगाव’ आणि आर. माधवनचा ‘रॅाकेट्री’ यांचा समावेश आहे.

  प्रोडक्शन सुरू असलेले चित्रपट
  सध्या जवळपास दोन डझन चित्रपटांचं प्रोडक्शन अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. यात अक्षय कुमारचे ‘पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’, ‘रक्षाबंधन’, ‘राम सेतू’, अजय देवगणचे ‘मे डे’, ‘मैदान’, ‘थँक गॅाड’, रणबीर कपूरचे ‘समशेरा’, ‘ब्रम्हास्त्र’, शाहरुख खानचा ‘पठान’, अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’, सलमान खानचे ‘अंतिम’, ‘टायगर ३’, आमिर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’, प्रभासचा ‘आदिपुरुष’, जॅान अब्राहम-अर्जुन कपूरचा ‘एक व्हिलन २’, विकी कौशलचा ‘मि. लेले’, जान्हवी कपूरचा ‘दोस्ताना २’, टायगर श्रॅाफचा ‘हिरोपंती २’, आलिया भट्टचा ‘डार्लिंग्ज’, कंगना रणौतचा ‘तेजस’, ‘धाकड’, वरुण धवनचा ‘भेडीया’, कार्तिक आर्यनचा ‘भुल भुलैया २’ या चित्रपटांचा समावेश आहे.

  नुकतेच घोषित झालेले…
  कोरोनाचा कहर थांबेल आणि परिस्थिती सामान्य होईल या आशेनं काही प्रोडक्शन हाऊसेसनी नवीन चित्रपटांची घोषणा केली आहे. यात सलमान खानचे ‘कभी ईद कभी दिवाली’, ‘किक २’, रणवीर सिंगचा ‘रॅाकी अँड रानी की प्रेम कहानी’, रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’, कार्तिक आर्यनचा ‘सत्यनारायण की कथा’, करण जोहरचा ‘दी अनटोल्ड स्टोरी आॅफ सी. शंकरन नायर’, ऋतिक रोशनचे ‘फायटर’, ‘विक्रम वेदा’, सान्या मल्होत्राचा ‘हिट’, यामी गौतमचा ‘लॅास्ट’, हंसलम मेहतांच्या दिग्दर्शनाखाली बनणारा जहान कपूरचा निनावी चित्रपट, अशोक पंडीत यांचा ‘पिंकी प्रामाणिक’, कंगना रणौतचा ‘टीकू वेडस शेरू’ या चित्रपटांना सध्या तरी घोषणेवरच समाधान मानावं लागलं आहे.