अखेर बॉलिवूडकरांकडून मदतीचा ओघ सुरू, सुनील शेट्टी यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात!

'सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया' या सामाजिक संस्थेबरोबर मिळून कोकणासाठी मदत करणार असल्याची माहिती त्यांनी या माध्यमातून दिली आहे.

    काही दिवसांपूर्वी कोकणासहित महाराष्ट्रात ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, महाड, या ठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. महाराष्ट्रभरातून कोकणवासीयांना सावरण्यासाठी पूरग्रस्त भागात मदत पोहचवली जात आहे. नुकतंच प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांनी आपल्या फेसबुकवरून महाराष्ट्राला आपली गरज आहे, अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे. ‘सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ या सामाजिक संस्थेबरोबर मिळून कोकणासाठी मदत करणार असल्याची माहिती त्यांनी या माध्यमातून दिली आहे.

    रायगड आणि रत्नागिरीमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. भारताचे नागरिक म्हणून आपण कोकणवासियांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, अशी भावना सुनील शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. अभिनेते सुनील शेट्टी यांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल ‘सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ संस्थेच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांनी देखील आभार व्यक्त केले आहेत. आज अस्मानी संकटामुळे कोकणवासी हतबल झाले असून त्यांचा उध्वस्त झालेला संसार पुन्हा उभा करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून पुढाकार घेणं गरजेचं आहे, असे मत चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले.