कोरोनाच्या संकटकाळात बॉलिवूडकर आले धावून, नागरिकांना करतायत वेगवेगळ्या पद्धतीने मदत!

लिवूडच्या काही सेलिब्रिटीजनीही यात मोलाचा वाटा उचलत जनतेसाठी मदतीचा हात पुढं केला आहे. यात अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सुनील शेट्टी, अजय देवगण, सोनू सूद, आयुष्मान खुराना, ताहिरा कश्यप, अनुपम खेर, किरण खेर, अशा बऱ्याच सुपरहिरोजचा समावेश आहे.

  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं देशभरात हाहाकार उडाला आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे रुग्णांवर उपचार करणारी सरकारी व्यवस्था अक्षरश: कोलमडली आहे. प्रत्येक रुग्णाकडे लक्ष देण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत आहे, तर बऱ्याच ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांची आॅक्सिजनसाठी, औषधांसाठी आणि रेमडेसिवीरसाठी धावाधाव सुरू आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयांना आग लागण्याचं प्रमाणही वाढलं आहे. आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाल्यानं ठिगळ लावायचं तरी कुठं अशी केंद्र आणि राज्य सरकारची अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत काही धनदांडगे मदतीचा हात पुढे करत आहेत. देशावर संकट येताच सर्वप्रथम मदतीसाठी धावणाऱ्या उद्योगपती टाटांमागोमाग भारतीय क्रिकेटर्सच्या जोडीनं परदेशी क्रिकेटर्सनीही मदतीचा ओघ सुरू केला आहे. अशा आपतकालीन परिस्थतीत जे मदतीचा हात पुढे करतात तेच खरे हिरो ठरतात. बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटीजनीही यात मोलाचा वाटा उचलत जनतेसाठी मदतीचा हात पुढं केला आहे. यात अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सुनील शेट्टी, अजय देवगण, सोनू सूद, आयुष्मान खुराना, ताहिरा कश्यप, अनुपम खेर, किरण खेर, बोनी कपूर, समीर नायर, रजनीश खानुजा, दीपक धर, तरुण राठी, अशीम प्रकाश बजाज, लीना यादव, आर. पी. यादव, लव रंजन, आनंद पंड‍ीत अशा बऱ्याच सुपरहिरोजचा समावेश आहे.

  केवळ बोलबच्चनगिरी न करता देशाला मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांमध्ये अभिनेता अक्षय कुमार नेहमीच आघाडीवर असतो. त्यामुळंच पडद्यावर खिलाडी म्हणून वावरणारा हा स्टार खऱ्या अर्थानं जनतेचा हिरो म्हणून ओळखला जातो. अक्षयनं नुकतीच क्रिकेटर गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून एक कोटी रुपयांची मदत केली आहे. इतकंच नव्हे अक्षयनं पत्नी ट्विंकलच्या साथीनं १०० ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स दान करण्याचा निर्णय घेतला आहे. लंडनमधील डॉ. द्रक्षणीका पटेल आणि डॉ. गोविंद बंकानी यांच्या इलाईट हेल्थच्या माध्यमातून दैविक फाऊंडेशन १२० ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स आणि आपल्या माध्यमातून १०० ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स अशी एकूण २२० ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स देण्यात येणार असल्याचं ट्विंकलनं सोशल मीडियावर म्हटलं आहे. मागील काही आठवड्यांपासून रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजनसाठी धावपळ सुरू आहे. हे न पहावल्यानं अखेर ट्विंकलनं पुढाकार घेत लंडनमधील डॉक्टरांच्या सहकार्यानं मदतीचा हात पुढं केला आहे. मागच्या वर्षीही कोरोनाच्या काळात अक्षयनं पीएम केअर फंडासाठी २५ कोटी रुपये दान दिले होते.

  गोरगरीबांचा कनवाळू, कृपाळू अभिनेता अशी ओळख असणाऱ्या सुनील शेट्टीनंही मदत देऊ केली आहे. केव्हीएन फाऊंडेशनच्या माध्यमातून सुनीलनं मोफत ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स दिले आहेत. सुनीलनं केव्हीएन फाऊंडेशन आणि फीड माय सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं गरजूंना घरामध्ये ऑक्सिजन पुरवण्याचं काम सुरू केलं आहे. कोरोनाची दुसरी लाट भयानक असून ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. बरेच रुग्ण ऑक्सिजनअभावी दगावत आहेत. या कसोटीच्या क्षणी एकमेकांना सहाय्य करणं हाच एक आशेचा किरण असल्याचं सुनीलनं म्हटलं आहे. केव्हीएन फाऊंडेशनच्या फिड माय सिटीरूपी उपक्रमामुळं ऑक्सिजनरूपी मदत पोहोचवत असल्याचं सुनीलनं लिहीलं आहे. यासोबतच त्यानं आपल्या मित्रांसोबतच चाहत्यांनाही आवाहन केलं आहे. जर कोणी मदत करू इच्छित असेल किंवा कोणाला मदत हवी असेल, तर कृपया सूचना द्यावी. आम्ही तात्काळ मदत पोहोचवू. सध्या मुंबई आणि बंगलूरूपुरतीच मर्यादित सेवा सुरू असल्याचंही सुनीलनं म्हटलं आहे. या जोडीला किरण खेर यांनी कोरोनाबाधितांना आॅक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी १ कोटी रुपये दान केले आहेत.

  ‘सिंघम’च्या पुढाकारानं एचडीयू

  रुपेरी पडद्यावर ‘सिंघम’ बनून कायद्याची भाषा समजावणारा अजय देवगणही मदतीच्या या यज्ञात आहुती देण्यासाठी पुढे आला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येनं त्याच्यासारख्या संवेदनशील कलावंताला हेलावून टाकलं आहे. बॉलिवूडमधील आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं अजयनं बृहन्मुंबई महानगर पालिकेला कोव्िाड आयसीयू बेडसाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवरील भारत स्काऊटस अँड गाईडस हॉलमध्ये २० रुग्‍णशय्या क्षमतेचं ‘कोविड एचडीयू’ (हाय डि‍पेन्‍डन्‍सी युनिट) रुग्‍णालय उभारलं आहे. अजयनं एनवाय फाऊंडेशनच्या माध्यमातून बीएमसीला ही मदत दिली आहे. या कोविड आयसीयू केंद्रामध्ये पॅरा-मॉनिटर्स, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन सपोर्टसह पी. डी. हिंदूजा रुग्णालयातील डॉक्टर्स रुग्णांच्या सेवेत तत्पर असणार आहेत. शिवाजी पार्कपासून जवळच्या अंतरावर असलेल्या हिंदूजा रुग्णालयाचे सीईओ जॉय चक्रवर्ती यांनीही याला दुजोरा दिला आहे. हिंदूजाचं विस्तारीत आयसीयू असलेल्या या केंद्रात जेवणापासून वैद्यकीय स्टाफपर्यंत सर्व सेवा मॅनेजमेंटच्या वतीने पुरवण्यात येणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यामध्‍ये अजयसह बोनी कपूर, समीर नायर, रजनीश खानुजा, दीपक धर, तरुण राठी, अशीम प्रकाश बजाज, लीना यादव, आर. पी. यादव, लव रंजन, आनंद पंड‍ीत या सर्वांनी देखील खारीचा वाटा आहे.

  गरीबांचा सुपरहिरो सोनू

  रुपेरी पडद्यावर बॅड बॉय साकारणाऱ्या सोनू सूदमधील गुड बॉयचं दर्शन मागच्या वर्षी संपूर्ण जगाला झालं आहे. पहिल्या लाटेच्या वेळी अप्रवासी मजूरांना घरापर्यंत पोहोचवणारा सोनू दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठीही पुढे सरसावला आहे. सोनूनं फ्री कोविड हेल्प लाँच केली आहे. यात डॉक्टरांच्या मोफत सल्ल्यासह कोरोनाच्या टेस्टिंगचाही समावेश करण्यात आला आहे. सोनू सूद फाऊंडेशन, हेल वेल २४ आणि क्रॅस्ना डायग्नॉटीक्स प्रा. लि.च्या संयुक्त विद्यमानं सोनूनं हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. ‘यू टेक रेस्ट, लेट मी हँडल द टेस्ट’ या घोषवाक्यासह सोनूनं फ्री कोविड हेल्प लाँच केला आहे. याशिवाय सोनूची टीम स्वतंत्ररीत्या लोकांना ऑक्सिजन सिलेंडर्ससह बेडस उपलब्ध करून देणं, तपासणी आणि औषधांची मदत करणं यांसारखी कामंही करत आहे.

  आयुष्मान-ताहिराचं मोठेपण

  नेहमीच आशयघन चित्रपटांसोबतच काहीशा वेगळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखांमध्ये दिसणारा आयुष्मान खुराना पत्नी ताहिरा कश्यपसह कोरोनाशी दोन हात कराण्यासाठी सज्ज झाला आहे. आयुष्मान-ताहिरा या दाम्पत्यानं महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढं केला आहे. दोघांनी आपल्या भावना व्यक्त करत सोशल मीडियावर लिहीलं आहे की, मागील वर्षभरापासून आपण आपल्या डोळयांनी कोरोनाचं वादळ पहात आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. अशाप्रकारे आजवर कोणालाही परिस्थितीशी झुंजताना पाहिलं नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं मदतीचा हात पुढे करत आहेत. त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. मदतीसाठी पुढे येणारा प्रत्येक हात आम्हाला आणखी काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहित करतो. आम्ही कायम थोडीफार मदत करत असतो. आता मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत केली आहे.