राज कुंद्राला तात्पुरता दिलासा, आठवड्याभरासाठी अटकेपासून मिळाले संरक्षण!

पोर्नोग्राफी प्रकरणी कोठडीत असलेल्या राज कुंद्राविरोधात सायबर पोलिसांनी गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पोर्नोग्राफीच्या आणखी एका प्रकऱणात गुन्हा दाखल केला.

    मागील वर्षीच्या पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबईतील सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांसदर्भात अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयाची पायरी चढलेल्या व्यावसायिक राज कुंद्राला न्यायालयाने आठवड्याभरासाठी अटकेपासून संरक्षण देत ताप्तुरता दिलासा दिला आहे.

    पोर्नोग्राफी प्रकरणी कोठडीत असलेल्या राज कुंद्राविरोधात सायबर पोलिसांनी गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पोर्नोग्राफीच्या आणखी एका प्रकऱणात गुन्हा दाखल केला. त्याविरोधात अटकपूर्व जामीनासाठी राज कुंद्राने मुंबई सत्र न्यायालयात जामानीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तो अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर कुंद्राने उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी सर्व कागदपत्रे, माहिती तपास अधिकाऱ्यांना देण्यात आली असून साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. तपासादरम्यान पोलिस स्थानकात जाऊन तपासात सहकार्यही केले होते. फेब्रुवारी २०२० मध्ये आर्मप्राईम मिडिया प्राईव्हेट लिमिटेड नामक कंपनीकडून आपल्याशी संपर्क साधला होता. त्या अॅपमार्फत नवोदित प्रतिभावंत कलाकारांना त्यांचा अभिनय डिजिटल माध्यमातून दाखविण्याची संधी देण्यात येणार होती. त्यांची संकल्पना आवडली आणि व्यवसायिक म्हणून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे कुंद्राने याचिकेत म्हटले आहे. फेब्रुवारी ते डिसेंबर २०१९ दरम्यान संबंधित कंपनीशी करार करण्यात आला होता. त्यादरम्यान आपला चित्रपट निर्मितीमध्ये सक्रिय सहभाग नव्हता. तसेच हॉटशॉट्स अॅपमधील पोर्नोग्राफीशीही काहीही संबंध नसून आपल्यावरील आरोप हे खोटे असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचा दावाही कुंद्राने केला आहे.

    त्या याचिकेवर बुधवारी न्या. संदीप. के. शिंदे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, या प्रकरणातील शार्लिन चोप्रा आणि पुनम पांडे यांच्या अन्यसह आरोपींनाही न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिले असून पोर्नोग्रापीच्या अन्य एका प्रकरणात आपल्याला समान कलामांतर्गत अटक करण्यात आली आहे. तसेच तपासदरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे आपल्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्याची आवश्यकता नसल्याचे कुंद्राच्यावतीने बाजू मांडताना अँड. प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. त्याला राज्य सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकिल प्राजक्ता शिंदे यांनी विरोध केला. या प्रकऱणात राज कुंद्राची भूमिका इतर आरोपींपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे तो समानतेच्या आधारावर संरक्षण मागू शकत नाही, अशा दावा करताना पुढील युक्तिवादासाठी शिंदे यांनी खंडपीठाकडे वाढीव वेळ मागितला. त्याची दखल घेत खंडपीठाने राज कुंद्राला आठवड्याभरासाठी अटकेपासून संरक्षण देत सुनावणी २५ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.