Chavat Bhaiyas Malvani comedy Malvani Bhaiya on YouTube
चावट भैय्याची मालवणी कॉमेडी “मालवणी भैय्या” यूट्यूबवर

“एक चावट मधुचंद्र”, “अभी तो हम जवान है”, “सनी तूच माझ्या मनी” हया नाटकातून रसिकांचे मनोरंजन करणारा चावट भैय्या रमेश वारंग आता कोकणात तळ ठोकून मालवणी भैय्या (Malvani Bhaiya) बनला आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून प्रसिद्ध असलेला रमेश वारंग (Ramesh Warang) हा मूळचा कोकणातला सुपुत्र असून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वैभववाडी तालुक्यातील करूल गावचा रहिवाशी आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या (corona virus) लॉकडाऊनमुळे (lockdown) सर्वजण घरी आहेत. लॉकडाऊन आणि अनलॉकच्या काळात रसिकांचे घरबसल्या मनोरंजन व्हावे व मनोरंजनातून समाज प्रबोधन व्हावे हया हेतूने त्यांनी “मालवणी भैय्या” हे यूट्युब चॅनल (youtube) सुरू केले आहे.

“मालवणी भैय्या” हया यूट्युब चॅनलमध्ये अभिनेता रमेश वारंग मालवणी भैय्याच्या भूमिकेत दिसणार असून कोकणकन्या ट्रेन मधील धम्माल किस्से सांगत कोकणातील निसर्गरम्य पर्यटन स्थळे, कोकणातील शेती विषयक माहिती, कोकणातील कमी वर्षात उत्पन्न देणारी वनस्पती आणि त्याचे फायदे याची माहिती हा मालवणी भैय्या आपल्या शैलीत देणार आहे. विशेष म्हणजे यात बांबू या लागवडीविषयी खास माहिती देण्यात येणार आहे. कारण येणार्‍या काळात बायो डिझेल जे आपल्याला इतर देशातून मागवावे लागते. त्याची निर्मिती या बांबूपासून होणार आहे. कोकणातील प्रत्येक माणसाने उद्योजक व्हावे हयाचे मार्गदर्शन ही हया चॅनल द्वारे करण्यात येणार असून यात कोकणातील स्थानिक कलाकारांना अभिनयाची संधी देण्यात येणार आहे. मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश आणि समाज प्रबोधन व्हावे हा हया चॅनलचा मुख्य उद्देश असून कोकणचे वैशिष्ट्य घरबसल्या रसिकांना पाहता येणार आहे.

रमेश वारंग यांनी याआधी “एक चावट मधुचंद्र”, “अभी तो हम जवान है”, “सनी तूच माझ्या मनी”, “छोटयांची लोकधारा”, “जंगल बूक”, “ही स्वामींची इच्छा” यांसारख्या अनेक नाटकाची निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. तसेच कोकणात खेडोपाडी जाऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पथनाट्यातून समाज प्रबोधनही केले आहे. “मालवणी भैय्या” हया चॅनलची निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखन रमेश वारंग यांनी केले असून सहकलाकार हितल नितिन शिंदे, साहिल प्रकाश होळकर, श्रुतिका सोहनी तसेच सनीभूषण मुणगेकर, अभय राणे, अमित माळकर, संतोष सावंत, सचिन मानगावकर, शेखर दाते यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.