चिन्मय मांडलेकरने सांगितले ‘फत्तेशिकस्त’च्या शुटींगदरम्यानचे किस्से

 ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात शिवरायांच्या गनिमी काव्याचा रुपेरी विस्तार अधिक व्यापक पद्धतीने मांडण्यात आला आहे. या चित्रपटाला चित्रपटगृहात चांगला प्रतिसाद मिळाला. लवकरच हा चित्रपट झी टॉकीजवर दाखविण्यात येणार आहे. त्या निमित्ताने फत्तेशिकस्तमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका निभावणाऱ्या चिन्मय मांडलेकर यांनी या चित्रपटाबाबतचे काही किस्से शेअर केले आहेत.

 चिन्मय मांडलेकर म्हणाले, फत्तेशिकस्त चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान खूप महत्वाच्या गोष्टी घडल्या. त्यातली अविस्मरणीय गोष्ट म्हणजे आम्ही  राजगडावर केलेलं शूटिंग. राजगडावर एक नेढे आहे, त्या नेढ्यात बसून आम्ही एक सीन केला होता. खूप उंचावर डोंगराच्या मधोमध आपोआप झालेलं एक भगदाड आहे ते. मला उंच ठिकाणांची भीती आहे. पण आम्ही तिथे जेव्हा शूटिंग केलं तेव्हा माझी संपूर्ण भीती निघून गेली. हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता.

 मांडलेकर चित्रपटाची आणखी एक आठवण शेअर करताना म्हणाले की, चित्रपटात  मोहिमेवर निघण्याआधी माझं एक भाषण आहे. ते दिग्पालने ऐनवेळी बदललं. आधीचं भाषण त्याला फारस आवडलं नव्हतं. त्याने नंतर लिहलेलं भाषण फारच सुंदर होतं. क्वचितच एखाद्या अभिनेत्याच्या वाट्याला इतकं सुंदर भाषण सिनेमामध्ये करण्याची संधी येते. त्याने ज्या कागदावर मला ते भाषण लिहून दिल  होतं त्यावर मी त्याची सही घेतली होती. अजूनही तो कागद मी जपून ठेवलेला आहे.